Home » विरोधक नारायण राणेंना ‘कोंबडी चोर’ म्हणत का टीका करतात?

विरोधक नारायण राणेंना ‘कोंबडी चोर’ म्हणत का टीका करतात?

एकेकाळचे कट्टर शिवसैनिक नारायण राणेंना 'कोंबडी चोर' हे नाव कसं पडलं?

by Team Gajawaja
0 comment
Share

सध्या देशभरात आपल्याला दोनच गोष्टींवर चर्चा होताना दिसत आहे. एक म्हणजे आयपीएल आणि दुसरी गोष्ट म्हणजे राजकारण. निवडणुकांची रणधूमाळी विविध राज्यात पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील पक्षांमध्येही  चुरशीची लढत या निवडणुकीत पाहायला मिळणार आहे. एकीकडे महाविकास आघाडी त्यांची संपूर्ण ताकद लावत आहे तर दुसरीकडे महायुतीमध्ये अगदी शेवटच्या क्षणापर्यंत जागावाटपावरुन कुरबुरी सुरू असल्याचं समोर आलं, पण महायुतीतल्या नेत्यांना नुकतंच रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेचा तिढा सोडवण्यात यश मिळालं आहे.

 

Mahayuti

 

मागील दोन्ही निवडणुकांमध्ये ही जागा शिवसेनेने लढवली होती. शिवसेनेचे विनायक राऊत या मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले होते. शिवसेना हा पक्ष फुटल्यानंतर पक्षाचे १३ खासदार एकनाथ शिंदेंबरोबर गेले. मात्र रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांच्यासह पाच खासदारांनी उद्धव ठाकरेंबरोबर थांबण्याचा निर्णय घेतला. शिवसेना गेल्या अनेक वर्षांपासून ही जागा लढवत आली आहे.

हा शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ असल्याने यंदादेखील एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने या जागेवर दावा केला होता. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे भाऊ किरण सामंत रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्नशील होते. मात्र शिंदे गटाने निवडणुकीच्या सुरू होण्याच्या आदल्या दिवशी माघार घेतली आणि भाजपाने या मतदारसंघातून नारायण राणे यांना उमेदवारी दिली.

===

हेदेखील वाचा : इंदिरा गांधींच्या सरकारने श्रीलंकेला सोपवलेल्या कच्चातिवु बेटाची कथा

===

या बातमीनंतर राजकीय वर्तुळात पुन्हा नारायण राणे यांची चर्चा होऊ लागली. एक कट्टर शिवसैनिक ते भाजपाचे केंद्रीय मंत्री हा नारायण राणे यांचा प्रवास थक्क करणारा होता. दोन वर्षांपूर्वी नारायण राणे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल एक वादग्रस्त विधान केले होते ज्यानंतर कार्यकर्त्यांची आंदोलनं आणि राजकारणातील बॅनरबाजीला उधाण आलं होतं.

या सगळ्या बॅनरबाजी एका बॅनरने मात्र कित्येकांच्या भुवया उंचावल्या. केवळ नारायण राणे यांचा एक फोटो आणि बाजूला ‘कोंबडी चोर’ असे शब्द असलेल्या एका बॅनरचा फोटो चांगलाच व्हायरल झाला होता. महाराष्ट्राच्या राजकारणातील हा सर्वात अपमानजनक प्रकार होता. यानंतर सगळ्यांच्याच तोंडावर ‘कोंबडी चोर’ आणि नारायण राणे यांचं नाव येऊ लागलं, पण महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री असणाऱ्या नारायण राणे यांना राजकीय वर्तुळात ‘कोंबडी चोर’ म्हणून का खिजवलं जातं यामागेही एक भन्नाट गोष्ट आहे.  त्याबद्दलच आजच्या लेखातून जाणून घेणार आहोत.

 

Narayan-rane2

 

मुंबईच्या चेंबुर परिसरात एकेकाळी नारायण राणे आणि त्यांचे मित्र हनुमंत परब यांचा चांगलाच दरारा होता. तरुण वयात हे दोघेही हुल्लडबाजी करायचे अन् कित्येक लोक या म्हणण्याला दुजोरा देतानाही आपल्याला पाहायला मिळतात. याचदरम्यान त्यांनी त्यांच्या मित्रांना सोबत घेऊन कोंबड्या चोरल्या असल्याची कहाणी सांगितली जाते. नारायण राणे कोंबड्या चोरत असत आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते लीलाधर ढाके त्यांना सोडवत असत. हे तेच लीलाधर ढाके आहेत ज्यांनी नारायण राणे यांना शिवसेनेत आणलं होतं. अर्थात नारायण राणे यांच्या नावावर कोंबडी चोरल्याचा एकही गुन्हा दाखल नाही.

राणेंना पडलेल्या या नावाबद्दल अजून एक कहाणी सांगितली जाते. भांडण, हाणामाऱ्या करणं तसेच हूल्लडबाजी किंवा गुंडगिरी करणाऱ्या उनाडटप्पू व्यक्तीला कोकणात ‘कोंबडी चोर’ किंवा ‘कोंबडीच्या…’ असं म्हणतात. यामुळेच राणेंना ‘कोंबडी चोर’ म्हंटलं जातं असंही सांगितलं जातं. आज भाजपामध्ये असलेले नारायण राणे हे बाळासाहेबांच्या अत्यंत जवळच्या व्यक्तिपैकी एक होते.

 

Narayan-rane1

 

शिवसेना सोडून त्यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला अन् तिथूनच त्यांचे आणि शिवसेनेचे संबंध बिघडत गेले. त्यांच्यावर कित्येक कडव्या शिवसैनिकांकडून तसेच विरोधकांकडून आजही अशा प्रकारची टीका होते. खुद्द बाळासाहेबही मस्करीत नारायण राणेंना कोंबडी चोर म्हणत असं सांगितलं जातं. आपल्या काही सभांमध्ये बाळासाहेबांनी नारायण राणे यांचा असा उल्लेख केलेला आहे. २०१७ साली वांद्रे पोटनिवडणुकीत राणेंचा पराभव झाला होता. आता यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने कोकणात पाय रोवण्याचे भाजपाचे स्वप्न पूर्ण करण्यात नारायण राणे यांना यश मिळणार का ते येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.