Home » श्री बद्रीनाथ धाम यात्रेची घोषणा

श्री बद्रीनाथ धाम यात्रेची घोषणा

by Team Gajawaja
0 comment
Shree Badrinath Temple
Share

हिंदू धर्मात अतिशय पवित्र समजल्या जाणा-या चार धामयात्रेमधील एक महत्त्वाचे धाम असलेल्या श्री बद्रीनाथ धामचे दरवाजे कधी उघडणार याची तारीख जाहीर करण्यात आली आहे.  वसंत पंचमीचा शुभमुहूर्तावर टिहरी येथील राजवाड्यातून ही तारीख जाहीर करण्यात आली.  श्री बद्रीनाथ धामचे दरवाजे 12 मे रोजी सकाळी 6 वाजता ब्रह्ममुहूर्तावर उघडण्यात येतील. टिहरीचे महाराज मनुजयेंद्र शाह यांनी नरेंद्र नगर, टिहरी येथील राजवाड्यातून ही तारीख जाहीर केली.  बद्रीनाथ धामचे (Shree Badrinath Temple) दरवाजे उघडण्याची तारीख राजाच्या कुंडलीनुसार ठरवली जाते. शतकानुशतके चालत आलेल्या या परंपरेत पूर्ण विधींचे पालन केले जाते.   

वसंत पंचमीच्या शुभमुहूर्तावर नरेंद्रनगर टिहरी येथील राजदरबारात आयोजित धार्मिक कार्यक्रमात श्री बद्रीनाथ धामचे दरवाजा कधी उघडणार याची घोषणा करण्यात आली.  यावेळी महाराज मनुजेंद्र साह यांनी विधीपूर्वक पूजन केले.  त्यानंतर पंचांग बघून बद्रीनाथ धामचे दरवाजे उघडण्याची तारीख जाहीर झाली.  या सर्वात महत्त्वाचा भाग असलेला तिळाच्या तेलाने भरलेला गडू 25 एप्रिल रोजी नरेंद्रनगर राजमहालामधून बद्रीनाथ मंदिरात पाठवण्यात येणार आहे.  बद्रीनाथ धामचे दरवाजे कधी उघडणार हे जाहीर झाल्यामुळे भाविकांनी चारधाम यात्रेची तयारी सुरु केली आहे.  अर्थात या यात्रेतील महत्त्वाचा भाग असलेल्या  केदारनाथ धाम आणि गंगोत्री-यमुनोत्री धामचे दरवाजे उघडण्याच्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नाहीत. शिवरात्रीच्या मुहूर्तावर या तारखा कधी जाहीर होतील, याची घोषणा होईल.

बद्रीनाथ धाम  (Shree Badrinath Temple) हे अलकनंदा नदीच्या काठावर नर आणि नारायण या दोन पर्वतांच्या मध्ये असलेले पवित्र तिर्थस्थळ आहे.  गेल्या वर्षी विक्रमी भाविक बद्री विशालच्या दर्शनासाठी बद्रीनाथ धामला पोहोचले होते. दरवर्षी येथे येणाऱ्या भाविकांची संख्या वाढत आहे.  येथे भगवान नारायण योग मुद्रामध्ये विराजमान आहेत. या धामला भू-वैकुंठ असेही म्हणतात. सहा महिने जेव्हा बद्रिनाथ धाम बंद असते, तेव्हा त्याची पुजा देवतांकडून केली जाते, अशी मान्यता आहे.  हिवाळ्यात या ठिकाणी भगवान नारायणाच्या पुजेसाठी देवतांचा वावर असल्याची श्रद्धा आहे.   बद्रीनाथ मंदिरात मुख्य मूर्तीला स्पर्श करण्याचा अधिकार फक्त मुख्य पुजाऱ्यांना आहे.  केदारनाथ आणि बद्रीनाथ मंदिरांचे मुख्य पुजारी केरळमधील नंबूदिरी ब्राह्मण असल्याचे सांगितले जाते.  हे रावल आदि शंकराचार्यांचे वंशज आहेत. रावलांच्या पूजेची व्यवस्था खुद्द शंकराचार्यांनी केल्याची माहिती आहे.  जर हे रावल मंदिरात उपस्थित नसतील तर भगवान नारायणाची पुजा डिमरी ब्राह्मणांकडून केली जाते. बद्रीनाथमध्ये रावलची देवता म्हणून पूजा केली जाते.  त्यांना देवी पार्वतीचे रूप मानले जाते.

बद्रीनाथ धामचे दरवाजे उघडण्याची आणि बंद करण्याची प्रक्रिया अतिशय रंजक आहे. बद्रीनाथ धामचे दरवाजे उघडण्याची तारीख राजाच्या कुंडलीनुसार ठरवली जाते.  दरवर्षी वसंत पंचमीच्या दिवशी टिहरीच्या शाही दरबारात ठरवली ही तारीख ठरवली जाते.  राजाच्या कुंडलीतील ग्रहांची अनुकूलता पाहून ही शुभ तारीख काढली जाते.  त्यानंतर महाराज ती तारीख जाहीर करतात.  टिहरी दरबारच्या राजघराण्यातून हजारो वर्षांपासून भगवान बद्रीनाथचा कलश नेण्याची प्रथा आहे. टिहरी घराण्याचा पहिला राजा सुदर्शन शाह याला लोकांनी बोलंदा बद्रीश असे नाव दिले होते. पूर्वीच्या काळी जे भक्त राजाचे दर्शन घेण्यासाठी बद्री विशालपर्यंत पोहोचू शकत नव्हते, त्यांना केवळ राजाच्या दर्शनाने धाम दर्शनासारखे पुण्य प्राप्त होते, असे मानण्यात येई.  तेव्हा या गडूलाही भाविक नमस्कार करायचे.  तेव्हापासून हा गडू तेलानं भरुन ठेवण्यात येत आहे.

 बद्रिनाथ धामचे (Shree Badrinath Temple) दरवाजे उघडण्याच्यावेळी हा गडू धाममध्ये समारंभपूर्वक नेण्यात येतो. भगवान बद्री विशाल हे टिहरी राजाचे कुलदैवत आहे.  त्यामुळेच टिहरी राजघराण्याच्या राजाची कुंडली बघून धामचे दरवाजे कधी उघडणार हे जाहीर करण्यात येते.  ही तारीख जाहीर झाली की टिहरी राजघराण्याची राणी तिळाचे तेल काढते आणि ते त्या पारंपारिक गडूमध्ये भरण्यात येते.  याआधी नरेंद्र नगर राजवाड्यात राणी राज्य लक्ष्मी शाह विवाहित महिलांसोबत उपवास करतातपिवळ्या रंगाची वस्त्रे परिधान करतात.   तिळाचे तेल काढल्यानंतर हे तेल एका घागरीत भरले जाते.  त्यालाच गडू घागरी म्हणतात.  त्यानंतर हा तेलाचा कलश डिमर गावात असलेल्या श्री लक्ष्मी नारायण मंदिरात ठेवण्यात येतो.  धामचे दरवाजे उघडण्याच्या वेळी हेच तिळाचे तेल धाममध्ये सहा महिने वापरले जाते. या तिळाच्या तेलाने अखंड ज्योती पेटवली जाते.

===========

हे देखील वाचा : पैशांची बचत करण्यासाठी या ट्रिक्स येतील कामी

===========

धामचे दरवाजे उघडण्याच्या चार दिवस आधी बद्रीनाथचे (Shree Badrinath Temple) मुख्य पुजारी रावल यांच्या नेतृत्वाखाली नरसिंह मंदिरातून आदि शंकराचार्यांचे सिंहासन,  तेल कलश यांची मिरवणूक काढण्यात येते.  या मिरवणुकीत गरुडजी, देवांचे खजिनदार कुबेरजी आणि भगवान नारायणांचे बालपणीचे मित्र उद्धवजी यांच्या गाड्यांचाही सहभाग असतो.

सई बने  

 


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.