Home » एथिलिन ऑक्साइड म्हणजे काय ?

एथिलिन ऑक्साइड म्हणजे काय ?

by Team Gajawaja
0 comment
Ethylene oxide
Share

जगातील सर्वात मसाला उत्पादक म्हणून आपल्या भारत देशाकडे पाहिले जाते. त्यातही भारतातील MDH आणि एव्हरेस्ट या दोन कंपन्यांचे मसाले जगभरातील सर्वच देशात वापरले जातात. मात्र या दोन कंपनींच्या काही मसाल्यावर सिंगापूर-हाँगकाँगमध्ये बंदी घातल्याची बातमी आली आणि एकच खळबळ उडाली. (Ethylene oxide)

या मसाल्यांमध्ये एथिलिन ऑक्साइडचे प्रमाण जास्त आढळल्याचे कारण देत या देशांनी मसाल्यांवर बंदी घातली. अर्थातच या दोन्हीही कंपन्यांनी आपली उत्पादने सुरक्षित असल्याचा दावा केला आहे.  तसेच सर्व तपासाअंती स्पष्ट होईल, असा विश्वासही व्यक्त केला आहे.  त्यामुळेच हे एथिलिन ऑक्साइड म्हणजे नेमकं काय ? याचा प्रश्न पडतो.  या एथिलिन ऑक्साइडचा वापर शेतात प्रामुख्यानं होतो.  शेती उत्पादनांना किड लागू नये, म्हणून वापरण्यात येणा-या या एथिलिन ऑक्साइडचे अंश तयार मसाल्यात आहेत, असा बंदी घातलेल्या देशांनी केला आहे. 

भारत हा जगातील सर्वात मोठा मसाला उत्पादक, ग्राहक आणि निर्यातदार देश आहे. २०२२-२३ या आर्थिक वर्षात देशातून सुमारे ३२००० कोटी रुपयांच्या मसाल्यांची निर्यात झाली आहे.  जगभरात भारताचा मसाला उत्पादनात दबदबा असतांना एथिलिन ऑक्साइडनं त्याला धक्का बसला आहे.  भारतातील दोन अग्रगण्य कंपन्याच्या मसाल्यावर परदेशात बंदी घातल्यानं भारताच्या मसाला व्यापाराला धक्का बसला आहे. एव्हरेस्ट आणि MDH मसाल्यांवर ही बंदी घातल्यात आली आहे. (Ethylene oxide)

या दोन्हीही कंपन्या भारतात मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहेत, तशीच त्यांची उत्पादने ही परदेशातही लोकप्रिय आहेत. MDH ची ६० हून अधिक उत्पादने बाजारात उपलब्ध आहेत. त्याच्यावरही प्रश्चचिन्ह निर्माण झाले आहे. हाँगकाँगने या दोन मसाल्यांच्या ब्रँडच्या काही उत्पादनांच्या विक्रीवर बंदी घातली आहे. MDH कंपनीच्या उत्पादनामध्ये मद्रास करी पावडर, MDH सांबार मसाला मिक्स पावडर, MDH करी मिक्स मसाला पावडर आणि एव्हरेस्ट फिश करी मसाला पावडर यांचा समावेश आहे.  सिंगापूरनेही या उत्पादनांवर बंदी घातल्यानं खळबळ उडाली आहे. या मसाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात एथिलिन ऑक्साइड आढळल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.  एथिलिन ऑक्साइड आरोग्यासाठी हानिकारक आहे आणि त्यामुळे कर्करोगाचा धोका वाढू शकतो.  

भारतीय मसाल्यांवर बंदी घातल्यानं भारतीय मसाले मंडळाने चौकशी करणार असल्याचे जाहीर केले.  तसेच भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) देखील याबाबत चौकशी करत आहे. अन्न प्राधिकरणाने संपूर्ण देशभरातून MDH आणि एव्हरेस्टसह सर्व ब्रँडच्या मसाल्यांचे नमुने पावडर स्वरूपात घेणे सुरू केले आहे. MDH आणि एव्हरेस्ट या दोन्ही कंपन्यांचे मसाले जगातील १०० हून अधिक देशांमध्ये वापरले जातात.  या मसाल्यांच्या कारखान्यात दिवसाला ३० टनांपेक्षा जास्त मसाले तयार होतात. त्यामुळे ही बंदी म्हणजे, या कंपनीला मोठा फटका असून त्यामुळे भारताच्या मसाला उत्पादक प्रतिमेलाही धक्का बसणार आहे.  (Ethylene oxide)

यासाठी कारणीभूत ठरलेले एथिलिन ऑक्साइड हे मुख्यतः जंतुनाशक म्हणून वापरले जाते. शेतात उगवलेल्या पिकांसाठी ते कीटकनाशक म्हणून वापरले जाते. अन्नपदार्थांमध्ये त्याचा वापर करण्यास सक्त मनाई आहे. कर्करोगावरील संशोधनासाठी आंतरराष्ट्रीय एजन्सीद्वारे कर्करोगजनक म्हणून वर्गीकृत केले आहे, ज्यामध्ये स्तनाच्या कर्करोगाचा धोका आहे. 

एथिलिन ऑक्साइडचा वापर अन्न प्रक्रिया उद्योग आणि शेतकरी करतात. एथिलिन ऑक्साइड धोकादायक जीवाणू आणि बुरशीपासून मसाल्यांचे संरक्षण करते. परंतु एथिलिन ऑक्साइड हे कार्सिनोजेन आहे ज्या गोष्टी कर्करोगाचा धोका वाढवतात त्यांना कार्सिनोजेन म्हणतात. कार्सिनोजेन अनेक प्रकारच्या रसायने आणि रेडिएशनमध्ये आढळते. हे एखाद्या व्यक्तीच्या शरीरातील पेशींमध्ये प्रवेश करते आणि डीएनएच्या कार्यामध्ये अडथळा आणते. (Ethylene oxide)

=============

हे देखील वाचा : स्मोक्ड बिस्किट म्हणजे नक्की काय? बिघडू शकते आरोग्य

============

यामुळे शरीराच्या काही भागांमध्ये पेशी वेगाने वाढू लागतात, ज्यामुळे कर्करोगाचा धोका असतो.  या रसायनामुळे प्रत्येक बाबतीत कॅन्सर होत नसला तरी ते कोणत्याही उत्पादनात निर्धारित प्रमाणापेक्षा जास्त प्रमाणात मिसळल्यास कर्करोगाचा धोका वाढू शकतो.  अनेक प्रकारच्या खाद्यपदार्थांमध्ये कार्सिनोजेन्स मिसळले जातात. थंड पेये, पॅकेज केलेले पाणी, पॅकेज केलेले चिप्स हे कार्सिनोजेन्स आहेत.  यामध्ये ते गॅसच्या स्वरूपात टाकले जाते. (Ethylene oxide)

 नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या संशोधनात असे म्हटले आहे की एथिलिन ऑक्साइडच्या संपर्कात आल्याने लिम्फो-हेमॅटोपोएटिक कर्करोग, ल्युकेमिया, स्तनाचा कर्करोग होण्याचा धोका वाढू शकतो.  हेच एथिलिन ऑक्साइड  MDH आणि एव्हरेस्ट कंपनीच्या काही उत्पादनामध्ये मिळाल्यानं त्यांच्यावर बंदी घालण्यात आली आहे.  या दोन्ही कंपन्यांनी मात्र याला नकार देत, आपली उत्पादने ही सर्वोकृष्ठ असल्याचा दावा केला आहे.  अर्थातच आता या संदर्भात सर्व परिमाण वापरुन तपासणी करण्यात येईल, आणि त्यानंतरच निष्कर्ष काढण्यात येईल. 

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.