Home » अक्षय्य तृतीयेचा सोनेरी योग

अक्षय्य तृतीयेचा सोनेरी योग

by Team Gajawaja
0 comment
Akshaya Tritiya 2024
Share

अक्षय्य तृतीया (Akshaya Tritiya 2024) ही हिंदू धर्मातील सर्वात शुभ तिथी मानली जाते. सर्वसिद्ध मुहूर्त असेही या अक्षय्य तृतीयेला म्हणतात. हा संपूर्ण दिवस शुभ असतो, त्यामुळे कुठलेही नवीन कार्य सुरु करण्यासाठी अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त निवडला जातो.  या दिवशी जे काम केले आहे, ते अक्षय्य असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे या दिवशी दान करून आशीर्वाद घेतले जातात. अक्षय्य तृतीयेला लक्ष्मी पुजून करण्यालाही महत्त्व आहे.  यावर्षी अक्षय्य तृतीया हा सण १० मे २०२४  रोजी साजरा होणार आहे. 

वैशाख शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला अक्षय्य तृतीया साजरी होते. या दिवसाला आखा तीज असेही म्हणतात. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने खरेदी केल्यास घरात भरभराट राहते,  लक्ष्मीची कृपा राहते, अशी मान्यता आहे. धुळे, जळगांव मध्ये आखातीचा उत्सवच साजरा होतो. 

अक्षय्य तृतीयेचे महत्त्व खूप आहे. भारतीय पौराणिक ग्रंथात या तिथीला घडलेल्या अनेक शुभ घटनांचा उल्लेख करण्यात आला आहे.  अक्षय्य तृतीया (Akshaya Tritiya 2024) ही भगवान परशुरामांची जयंती देखील आहे. या दिवशी सत्ययुग सुरू झाल्यामुळे तिला युगादि तिथी असेही म्हणतात.  भगवान कृष्ण आणि त्यांचा परममित्र सुदामा यांची भेट झाली तो दिवसही अक्षय्य तृतीयाच होता. त्यामुळे या दिवशी द्वारकेमध्ये मोठा उत्सव साजरा होता. बेट द्वारकेला यादिवशी भक्तांची मोठी गर्दी होते.

याशिवाय माता गंगा याच दिवशी पृथ्वीवर आल्याची मान्यता आहे. ओडीसामध्य़े भगवान जगन्नाथांच्या यात्रेसाठी जे रथ असतात, त्या रथांच्या बांधणीची सुरुवातही अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर होते. तसेच हिंदू धर्मामध्ये सर्वात पवित्र मानलेली चारधाम यात्राही याच मुहूर्तापासून सुरु होते.  

अक्षय्य तृतीयेचे महत्त्व भारतीय पौराणिक कथांमध्ये सांगण्यात आले आहे. भगावन श्रीकृष्णाने युधिष्ठिरालाही अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्ताचे महत्त्व सांगितल्याचा उल्लेख आहे. अक्षय्य तृतीयेला केलेल्या दानालाही महत्त्व आहे. या दिवशी सोने, चांदी, कपडे, घागरी, पंखा, जव, सत्तू, तांदूळ, गहू, गूळ, तूप आदी वस्तू दान देण्याची पद्धत आहे. आपापल्या परीने गरजवंताना यापैकी कसलेही दान दिल्यास ऐश्वर्यात वाढ होते, असे सांगण्यात आले आहे.  

भारतातील अनेक मंदिरांमध्ये अक्षय्य तृतीयाला (Akshaya Tritiya 2024) मोठा उत्सव होतो. उत्तराखंडमधील चारधाम क्षेत्रांचे तर यादिवशीच कपाट उघडण्यात येतात. शिवाय अक्षय्य तृतीयेला वृंदावनच्या श्री बांके बिहारी मंदिरातही भक्तांची मोठी गर्दी होते. कारण बांकेबिहारींच्या पायांचे दर्शन यावेळी भक्तांना घेता येते. वृंदावनच्या बांके बिहारी मंदिरात ठाकूरजींच्या दर्शनासाठी भाविकांची आत्तापासूनच मोठी गर्दी झालेली आहे.  यासोहळ्याची तयारीही महिनाभर आधीच सुरु झाली आहे. या सोहळ्यासाठी सुमारे १०० किलो चंदन दक्षिण भारतातील मलयगिरी येथून आणले जाते. अक्षय्य तृतीयेच्या एक महिना आधी हे चंदन आणून त्याची विधिवत पूजा करण्यात येते. मग हे चंदन उगळण्यात येते.  या चंदनाचा लेप अक्षय्य तृतीयेपासून ठाकूरजींना लावण्यात येतो. श्रीकृष्णाला उष्णतेपासून वाचवण्यासाठी ही चंदन लेप लावण्याचा सोहळा बघण्यासाठी हजारो भाविक गर्दी करतात.  

=============

हे देखील वाचा : पृथ्वीवरील सर्वात अनोखे शहर

=============

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी  गीतेच्या सर्व अध्यायांचे पठण केल्यास पितरांना मोक्ष प्राप्त होतो. जर सर्व अध्याय वाचता येत नसतील तर पितरांच्या मुक्तीशी संबंधित सातवा अध्याय वाचावा, असेही पौराणिक ग्रंथांत सांगण्यात आले आहे. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी गायीला हिरवे गवत खाऊ घालून पितरांचे आशीर्वादही घेतले जातात. या दिवशी, अन्न तयार करताना, आपण प्रथम त्याचा पहिला घास गायीसाठी बाजुला केला जातो. या दिवशी गरजूंना मदत करण्यालाही महत्त्व आहे. 

याशिवाय तुळशीची पूजा करुन तुळशीजवळ दिवा लावल्यास घरातील नकारात्मक उर्जा दूर होते. अक्षय्य तृतीया (Akshaya Tritiya 2024) हा सण साजरा करतांना घराची आणि देवघराची स्वच्छता करावी. यामुळेही घरातील नकारात्मक उर्जा कमी होते.  अक्षय्य तृतीयेच्या दिवशी माता लक्ष्मी, भगवान गणेश आणि धनाची देवता कुबेर यांची पूजा करण्यात येते. यासोबतच परशुरामजींचा जन्मही याच दिवशी झाला होतात्यामुळे या दिवशी परशुरामजींचीही पूजा केली जाते. अक्षय्य तृतीया ही सर्वात शुभ मुहूर्त म्हणून ओळखली जाते.  यादिवशी  पहाटे ५.३३ पासून रात्री १२.१८ पर्यंत  कधीही पुजा केली त्याचे शुभ फळ मिळते, अशी धारणा आहे.    

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.