Home » श्रीलंकेतही होणार ‘रामायण यात्रा’

श्रीलंकेतही होणार ‘रामायण यात्रा’

by Team Gajawaja
0 comment
Ramayana Yatra
Share

प्रभू श्रीरामांच्या पदचिन्हांनी पावन झालेल्या स्थळांचा विकास भारतात करण्यात येत आहे. प्रभू श्रीराम, माता जानकी आणि लक्ष्मण यांच्या वनवासाच्या काळातील स्थळांचा समावेश असलेली यात्राही सुरु झाली आहे. प्रभू श्रीरामांच्या चरणांचे दर्शन घेण्यासाठी या स्थळांवर भाविकांची गर्दी असते. अशीच अनेक स्थळे श्रीलंकेतही आहेत. रावणानं माता जानकीचे हरण करुन त्यांना ज्या अशोक वाटिकेत ठेवले होते, तिथे माता जानकींच्या वास्तव्याच्या अनेक खुणा आहेत. तसेच रामभक्त हनुमानाच्या प्रचंड पावलाचे ठसेही आहेत.  त्यामुळे भारतात लोकप्रिय होत असलेल्या रामायण यात्रेच्या धर्तीवर श्रीलंकेतही ‘रामायण यात्रा‘ सुरु होणार आहे.  यासाठी श्रीलंकेतील पर्यटन विभागां नऊ ऐतिहासिक स्थानांचा विकास करण्याचे जाहीर केले आहे.  यासाठी भारत सरकारही मदत करणार आहे.  

अयोध्येत श्रीरामचंद्रांचे भव्य मंदिर उभारल्यावर रामायण यात्रा अधिक लोकप्रिय होत आहे.  प्रभू रामचंद्रांनी वनवासाच्याकाळात जिथे वास्तव्य केले होते, तिथे या यात्रेदरम्यान जाता येते.  या यात्रेला मिळणाला भाविकांचा पाठिंबा वाढत आहे.  यामुळे स्थानिकांनाही मोठ्या प्रमाणात रोजगार मिळाला आहे.  रामायण यात्रेची ही लोकप्रियता पाहून आता श्रीलंकेनंही रामायण यात्रा सुरु करण्यासाठी तयारी केली आहे. 

माता सिता ज्या अशोक वनात होती, ते स्थळ आणि प्रभू रामचंद्र आणि रावण यांचे युद्ध झाले त्या स्थळांसह अन्य अनेक स्थळांचा या योजनेअंतर्गत विकास करण्यात येणार आहे.  श्रीलंकेच्या या प्रकल्पाला भारतातर्फेही मदत करण्यात येणार आहे.  यातून मोठी आर्थिक उलाढाल होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.  यासंदर्भात श्रीलंकेतील भारताचे राजदूत संतोष झा यांनी श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. यातून श्रीलंकेतील रामायणाशी संबंधित ऐतिहासिक ठिकाणांना जोडण्यासाठी करण्यात येणा-या योजनांची माहिती देण्यात आली. 

भारतात, अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्राचे मंदिर झाल्यापासून रोज लाखो भाविक भेट देत आहेत.  या ठिकाणी परदेशी नागरिकही मोठ्या संख्येनं येत आहेत.  यामुळे या सर्व क्षेत्राचा विकास होत आहे.  सध्या श्रीलंकेची आर्थिक परिस्थिती डबघाईला आली आहे.  या परिस्थितीत रामायण यात्रा हा येथे आर्थिक नियोजनासाठी फायदेशीर होऊ शकले, असे पर्यटन विभागानं स्पष्ट केले आहे.  श्रीलंकेत येणा-या परदेशी पर्यटकांची संख्या मोठी आहे.  तेथील शांत किनारे हे पर्यटकांना आकर्षित करतात. 

त्यात रामायण यात्रा सुरु केली तर प्रभू रामचंद्रांचे भक्तही मोठ्या संख्येनं श्रीलंकेला भेट देतील आणि येथील पर्यटन व्यवसायला अधिक उभारी मिळेल हा या यात्रेमागील उद्देश आहे.  श्रीलंकेत ५२ ऐतिहासिक ठिकाणे आहेत, ज्यात रामायणाशी संबंधित कथा आहेत. यातील नऊ ठिकाणे रामायण यात्रेमध्ये जोडली जाणार आहेत.  या यात्रेसाठी येणा-या भाविकांना सर्वसुखसुविधा पुरवण्यात येणार आहेत.  यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि व्हर्च्युअल रिॲलिटी सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करुन घेण्यात येणार आहेत.  

============

हे देखील वाचा : बाळासाहेब व शरद पवारांनी सुरू केलेलं एक ‘फ्लॉप’ मासिक

============

श्रीलंकेत अशोक वनाबाबत अनेकांना उत्सुकता आहे.  रावणाने अपहरण केल्यावर माता सीता याच अशोक वनात रहात असल्याचा उल्लेख आहे.  येथील एका गुहेचे डोके कोब्रा सापासारखे पसरलेले आहे.  गुहेभोवतीचे कोरीव काम केलेले आहे.  शिवाय अनेक चित्रेही काढलेली आहेत.  ही चित्रे माता सीता यांनी काढल्याची भावना भक्तांची आहे.  त्यामुळे येथे येणा-यां पर्यटकांची संख्या मोठी आहे.  माता सीता अशोक वृक्षाखाली ज्या ठिकाणी बसायच्या ते स्थान सीता इल्या या नावाने प्रसिद्ध आहे. २००७ मध्ये, श्रीलंका सरकारच्या संशोधन समितीनेही सीता इल्या ही अशोक वाटिका असल्याची पुष्टी केली आहे. 

याशिवाय माता सीता यांना शोधण्यासाठी हनुमान जेव्हा याच अशोक वनात आले, तेव्हा त्यांचे महाकाय ठसे येथे उमटले आहेत.  या पावलांना वंदन करण्यासाठीही अनेक भक्त येथे येतात.  रामायणातील सुंदरकांड अध्यायात एक महाकाय हत्ती लंकेचे रक्षण करत असल्याचे सांगण्यात आले आहे.  या हत्तीला हनुमानाने मारल्याचा उल्लेख आहे.  श्रीलंकेच्या पुरातत्व विभागाला श्रीलंकेत अशाच प्रकारच्या हत्तींचे अवशेष सापडले आहेत.  ते पाहण्यासाठीही मोठी गर्दी होते.  सर्वात महत्त्वाचे म्हणजे, रावणाचा महाल बघण्यासाठीही अनेक उत्सुक आहेत.  श्रीलंकेतील सिगिरिया येथील उंच टेकडीवर हा रावणाचा  महल आहे.  सध्य परिस्थितीत या महलाचे अवशेष पाहता येतात.  या महलाच्या खाली अनेक गुहांचा शोध लागला आहे. भारत आणि श्रीलंकेचे संशोधक यावर मिळून संशोधन करीत आहेत.  श्रीलंकेत सुरु होणा-या रामायण यात्रेमध्ये या सर्व स्थानांचा समावेश असणार आहे.  

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.