Home » समकालीन मराठी साहित्यातील अजोड व्यक्तिमत्व – पु. शि. रेगे.

समकालीन मराठी साहित्यातील अजोड व्यक्तिमत्व – पु. शि. रेगे.

by Correspondent
0 comment
Pu. Shi. Rege | K Facts
Share

पुरुषोत्तम शिवराम रेगे अर्थात पु. शि. रेगे यांचा जन्म २ ऑगस्ट १९१० रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील मिठगाव येथे झाला. मुंबई आणि लंडन विद्यापीठामधून अर्थशास्त्राची पदवी मिळाल्यावर त्यांनी महाराष्ट् आणि गोवा येथे विविध महाविद्यालयातून अध्यापन केले. पुढे ते मुंबईच्या एल्फिस्टन महाविद्यालयातून १९७० साली निवृत्त झाले. रेगे यांनी पाश्चात्य काव्यातील लकबी म्हणा, पद्धती म्हणा मराठी काव्यात आणल्या. तसेच इटालियन कवींच्या प्रेमकविताआणि त्यातून उलगडल्या जाणाऱ्या उत्कट अशा भावभावनांनी त्यांच्या कवीमनाला आपलेसे केले.

रेगे यांच्या कवितेतून स्त्रीची वेगवेगळी रूपे समर्थपणे दिसतात. त्याचप्रमाणे त्याच्या कवितेत संस्कृतप्रचुर शब्द सुद्धा असत. साहित्याखेरीज त्यांनी शैक्षणिक पुस्तकेही लिहिली. तसेच त्यांनी केलेले एक महत्त्वाचे कार्य म्हणजे ‘छंद’ या मासिकाचे संपादन. त्यांनी छंद मासिकासाठी विपुल लेखन केले. सरकारी नोकरीत असलेल्या बंधनांमुळे त्यांनी मासिकावर संपादक म्हणून आपल्या पत्नीचे, सरिता रेगे यांचे नाव छापले.

Image result for पु. शि. रेगे.

राधा ही आपल्या साहित्यात परिपूर्ण अशी प्रेमाची प्रतिमा आहे, राधा कृष्ण यांच्या प्रेमाबद्दल खूप काही सांगितले गेले आहे. त्यांचे प्रेम हे अत्यंत पवित्र समजले जाते. त्याचप्रमाणे त्यांची ‘पुष्कळा’ कविता वाचली तर वेगळाच शब्दप्रतिभेचा आविष्कार जाणवतो. रेगे यांच्या साहित्यावर लिहावयाचे झाले तर ते अफाट होईल. रेगे यांनी अनेक नाटके, कादंबऱ्या, कविता लिहिल्या. त्यांचे काव्य आजही वाचले जाते, अभ्यासले जाते.

आपण त्यांची ‘त्रिधा राधा ‘ ही कविता पाहू त्यात विलक्षण अर्थगर्भता आहे पण ती सहज आपल्या हाती लागत नाही, अर्थ हा निसटून जातोच जातो.

आभाळ निळे तो हरि,
ती एक चांदणी राधा,
बावरी,
युगानुयुगीची मनबाधा

विस्तीर्ण भुई गोविंद,
क्षेत्र साळीचे राधा,
संसिद्ध,
युगानुयुगीची प्रियंवदा

जलवाहिनी निश्चल कृष्ण,
वन झुकले काठी राधा,
विप्रश्न,
युगानुयुगीची चिरतंद्रा

राधा म्हणजे प्रेमाचे स्वरूप हे किती विलक्षण शब्दात रेगे यांनी मांडले आहे. तशीच त्यांची पुष्कळा कविता आहे, ती पण पाहू .

पुष्कळ अंग तुझं ,
पुष्कळ पुष्कळ मन ,
पुष्कळातली पुष्कळ तू,
पुष्कळ पुष्कळ माझ्यासाठी

बघताना किती डोळे पुष्कळ तुझे,
देतानां पुष-पुष्कळ ओठ,
बाहू गळ्यात पुष्कळ पुष्कळ,
पुष्कळ उर

पुष्कळाच तू, पुष-कळावंती,
पुष्कळ पुष्कळ पुष्कळणारी

पु. शि . रेगे यांचा ‘अनिह’ हा काव्य संग्रह त्यांच्या निधनानंतर म्हणजे १९८४ मध्ये प्रकाशित झाला. त्यापूर्वी गंधरेषा, दुसरा पक्षी, दोला, पुष्कळा, प्रियाळ, फुलोरा हे काव्यसंग्रह प्रकाशित झाले. रेगे यांनी नाटकेही लिहिली त्यात कालयवन, सावित्री तसेच चित्रमारकव्यम, पालक, मध्यंतर, माधवी : एक देणे, रंगपचालिका ह्या नाटिका लिहिल्या. रेगे यांनी अवलोकिता, मातृका, रेणू, सावित्री या कादंबऱ्या लिहिल्या. रेगे यांनी एका पिढीचे कथन म्हणून आत्मचरित्र लिहिले तसेच छानसी, मर्मभेद ही समीक्षा असलेली पुस्तके लिहिली.

रेगे यांना अनेक सन्मान मिळाले. १९६९ मध्ये वर्धा येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. १९६५ मध्ये केरळ येथे झालेल्या अखिल भारतीय परिषदेचे ते उदघाटक होते तसेच रशियामधील मास्को येथे लघुकथा या विषयावर आयोजित केलेल्या परिसंवादात पु.शि.रेगे यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले होते. मराठी साहित्यावर वेगळा ठसा उमटवणाऱ्या प्रतिभावान लेखकाचे १७ फेब्रुवारी १९७८ रोजी निधन झाले.

सतीश चाफेकर


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.