Home » ज्येष्ठांसाठी हवाईमार्गानं धार्मिक पर्यटन….

ज्येष्ठांसाठी हवाईमार्गानं धार्मिक पर्यटन….

by Team Gajawaja
0 comment
Senior Citizens
Share

संपूर्ण भारतभर आता धार्मिक पर्यटनाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा देण्यात येत आहे. त्यासाठी भारत सरकारतर्फे विविध योजना आखण्यात येत आहेत. तसेच धार्मिक स्थळी मोठ्या प्रमाणात येणा-या भाविकांसाठी आवश्यक त्या सुविधा देण्यात येत आहेत. यामुळे धार्मिक पर्यटन मोठ्या प्रमाणात वाढले आहे. आता यात भर पडणार आहे, ती हवाई यात्रेची. मध्यप्रदेशमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांसाठी विमानानं धार्मिक यात्रांची योजना आखण्यात आली आहे. 21 मे पासून या योजनेचा शुभारंभ होणार आहे. या योजनेसाठी मध्यप्रदेश सरकारतर्फे विशेष विभागाची निर्मिती करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी उत्तरप्रदेशमध्ये प्रभू श्रीरामांच्या मंदिराच्या परिसरातही अशाच प्रकारे विमानसुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्याद्वारे प्रभूरामांचे भक्त त्यांच्या मंदिराचे विमानातूनही दर्शन घेऊ शकणार आहेत.  या योजनेला भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. आता मध्यप्रदेशमध्येही विमानद्वारे धार्मिक स्थळांना भेट देता येणार असल्यामुळे ज्येष्ठांनी आनंद व्यक्त केला आहे.  

मध्यप्रदेश सरकारने जाहीर केलेली ही योजना 21 मेपासून सुरु होणार असून याच्या पहिल्या टप्प्यात 25 जिल्ह्यातील ज्येष्ठांना संधी देण्यात येणार आहे.  धार्मिक न्यास विभागाने तीर्थ दर्शन योजनेअंतर्गत हा आदेश जारी केला आहे.  यातून राज्यातील 25 जिल्ह्यांतील 65 वर्षांवरील वृद्धांना राज्याबाहेरील तीर्थक्षेत्रांना भेट देता येईल.  21 मे ते 19 जुलै या कालावधीत या धार्मिक यात्रा काढण्यात येणार आहेत. यामुळे भोपाळ, इंदूर, अलीराजपूर, धार, राजगढ, रायसेन, सिहोर, झाबुआ, विदिशा, आगर माळवा, बैतुल, देवास, हरदा, मंदसौर, नर्मदापुरम, नीमच, दमोह, रतलाम, शाजापूर, सागर, उज्जैन, खंडवा, बरवान , बुरहानपूर आणि खरगोन या जिल्ह्यातील जेष्ठ नागरिकांना विमानातून धार्मिक स्थळांना भेट देण्याची संधी मिळणार आहे.  यासाठी राज्यसरकारनं काही नियम स्पष्ट केले आहेत.  त्यानुसार या धार्मिक यात्रेसाठी येणारे नागरिक हे 65 वर्षांपेक्षा जास्त वयाचे असावेत ही प्रमुख अट आहे. मध्यप्रदेश सरकार ही योजना इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड मार्फत राबवित आहे.  यातून प्रवासी ज्या विमानतळावरून प्रवास सुरू करतील तेथेच त्यांच्या प्रवासाचा समारोप होईल. प्रवाशांची निवड संबंधित जिल्हाधिकारी करणार आहेत.  निवड झालेल्या प्रवाशांची यादी जिल्हाधिकारी पुढील कारवाईसाठी संबंधिक कार्यालयाला देतील.  या प्रवाशांची यादी आणि कागदपत्रे यांची कायमस्वरूपी नोंद संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ठेवण्यात येणार आहे.  

या सर्व प्रवाशांना विमानतळावर आणण्याची आणि नेण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी कार्यालयावरच असणार आहे.  या सर्व प्रवासात या ज्येष्ठ नागरिकांना  जेवण आणि अन्य सुविधा देण्यात येणार आहेत.  या प्रवाशांना पंधरा किलो वजनाची सामानाची बॅग सोबत घेता येणार आहे.  मात्र यात प्रवाशांचा केअरटेकर असेल तर त्याला सोबत नेता येणार नाही. या विमानात 33 जागा असून त्यात 32 जागा या प्रवाशांसाठी असतील तर एक सरकारी अधिकारी या सर्वांसोबत असेल.  या योजनेच्या पहिल्या टप्प्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज करता येणार आहेत.   कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यलयाकडे उपलब्ध कोट्यापेक्षा जास्त अर्ज आल्यास त्याची लॉटरी पद्धतीनं निवड करण्यात येणार आहे.  तसेच भाविकांना 15 दिवस आधी संबंधित प्रवासाचे टिकीट देण्यात येणार आहे.

======

हे देखील वाचा : केदारनाथ यात्रेला जाताय; ‘हे’ नवीन नियम ठेवा लक्षात…

=====

सध्या मध्यप्रदेश सरकारतर्फे ही योजना प्रायोगिक तत्वावर सुरु करण्यात येणार आहे. इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेडतर्फे ही योजना यशस्वी झाली तर अन्य राज्यातही अशाच स्वरापाची योजना राबवावी का याचाही विचार होणार आहे. त्यामुळे वरिष्ठ नागरिकांना याचा मोठा फायदा होणार आहे.  

सई बने 


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.