Home » चारधाम यात्रेमध्ये हवामानाचा अडसर

चारधाम यात्रेमध्ये हवामानाचा अडसर

by Team Gajawaja
0 comment
Chardham Yatra
Share

उत्तराखंड राज्याची अर्थव्यवस्था ज्या यात्रेवर अवलंबून आहे, त्या चारधाम यात्रेला अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर सुरुवात होत आहे. यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ येथील या पवित्र यात्रेसाठी प्रशासन गेल्या अनेक महिन्यापासून तयारी करीत आहे. यासाठी नेटवर्कचे मोठे जाळे तयार करण्यात आले आहे. ज्या भाविकांना चारधाम यात्रा करायची आहे, त्यांच्यासाठी ऑनलाईन यात्रा बुकींगची व्यवस्था सुरु करण्यात आली आहे. (Chardham Yatra)

लाखो भाविकांनी या यात्रेसाठी बुकींग केले असून यात्रेकरुंच्या सुविधेसाठी प्रशासन व्यस्त आहे. अशातच उत्तराखंडमधील बेभरवशाच्या हवामानाचा या यात्रेला फटका बसणार हे स्पष्ट झाले आहे.  चार धाम यात्रेला एक दिवस राहिला असतांनाच पूर्वी उत्तराखंडमध्ये ढगफुटी झाली आहे. यामुळे मोठा विध्वंस झाला असून जोरदार झालेल्या गारपिटीमुळे भाविकांसाठी उभारण्यात आलेल्या तंबूनाही फटका बसला आहे. 

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर चारधाम यात्रा सुरु होणार आहे. उत्तराखंडमधील  यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ या चार पवित्र स्थळांचा यात समावेश आहे.  हिमालयाच्या कुशीतली ही मंदिरे दरवर्षी सुमारे सहा महिने बंद राहतात.  मे महिन्यापासून या मंदिरांची कपाट उघडण्यात येतात. नोव्हेंबर पर्यंत ही यात्रा चालू रहाते. या यात्रेसाठी दरवर्षी लाखो भाविक उत्तराखंडमध्ये येतात,  त्यातून राज्याला मोठ्या प्रमाणात उत्पन्न होते.  तसेच स्थानिकांना रोजगार उपलब्ध होतो. (Chardham Yatra)

मात्र यावर्षीच्या यात्रेवर दोन मोठी संकटे आहेत.  एकतर उत्तराखंडमधील जंगलांना मोठ्या प्रमाणात आग लागत आहे.  या आगीच्या घटना एवढ्या वाढल्या की सुप्रिम कोर्टालाही याबाबत दखल घ्यावी लागली.  उत्तराखंड सरकारने आता जंगलामध्ये जाण्याबाबत कडक निर्बंध घातले आहेत.  तसेच व्हिडिओ, रिल बनवणा-या तरुणांनाही यासंदर्भात सक्त ताकीद दिली आहे.  शिवाय चारधाम यात्रेसाठी जे भाविक येणार आहेत, त्यांनाही जी नियमावली दिली आहे, त्यात जंगलातून प्रवास करतांना कोणताही ज्वलनशील पदार्थ नेऊ नये, अशा सूचना दिल्या आहेत.  आगीसंदर्भात उत्तराखंड प्रशासन त्रस्त असतानाच चारधाम यात्रा सुरु होण्यापूर्वी दोन दिवस उत्तराखंडमधील हवामान अचानक बदलले आहे.  या राज्यात ढगफुटीसारखा पाऊस झाला असून डोंगरावर बर्फवृष्टी झाल्यामुळे सखल भागात कडाक्याची थंडी पडली आहे.  बर्फवृष्टीमुळे जंगलातील आग आटोक्यात आली असली तरी ढगफुटीमुळे यात्रेकरुंची जी व्यवस्था केली होती, त्या सर्वांवर पाणी पडले आहे. (Chardham Yatra)

चारधाम यात्रेसाठी ज्या भाविकांनी रजिस्टर केले आहे,  ते मोठ्या संख्येनं आता उत्तराखंडमध्ये पोहचत आहेत.  यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ धामचे कपाट उघडण्यात येतात तो सोहळा बघण्यासाठी काही स्थानिकही मोठ्या संख्येनं या मंदिर परिसरात येतात.  हजारोंनी आलेल्या या भाविकांना ढगफुटीचा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी गाराही पडल्या आहेत. अल्मोडा-सोमेश्वर परिसरात ढगफुटी झाली असून अल्मोडा-कौसानी महामार्गावर डेब्रिज आले. त्यामुळे हा मार्ग काही तास बंद राहीला. आता हवामान खात्यानं या सर्वच भागात १३ मे पर्यंत पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. तशा सूचना भाविकांना त्यांच्या मोबाईलमार्फत देण्यात आल्या आहेत.  मात्र या पावसानं बागेश्वर आणि टिहरी मधील जंगलात लागलेल्या आगींना विझवल्यामुळे प्रशासनाला थोडा दिलासा मिळाला आहे.  

===========

हे देखील वाचा : तब्बल ११ वर्षांनी डॉ. नरेंद्र दाभोलकरांना मिळाला न्याय

===========

या  चार धामांची यात्रा ही हिंदू धर्मामध्ये मोठी पवित्र मानली जाते. त्यामुळे दरवर्षी या यात्रेसाठी येणा-या भाविकांची संख्या वाढत आहे.  यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथधामचे कपाट उघडण्याचा सोहळाही देखणा असतो.  यावेळी  मंदिराचे कपाट उघडण्याच्या दिवशी हेलिकॉप्टरमधून फुलांचा वर्षाव केली जाणार आहे. 

या सर्व मंदिरांच्या मार्गावर मोठ्याप्रमाणात भंडा-यांची व्यवस्था असते.  पावसानं या सर्व व्यवस्थेला फटका बसला आहे.   अर्थात कितीही पाऊस असला तरी मंदिर प्रशासनाने आपल्या कार्यक्रमांना सुरुवात केली आहे.  भगवान केदारनाथजींची पंचमुखी डोली गौरामाई मंदिर गौरीकुंड येथून निघाली आहे.  यावेळीही भाविकांची संख्या मोठी होती.  या मंदिर परिसरातही भाविक मोठ्या संख्येने येऊन थांबले आहेत.  या भागातही पावसाची शक्यता असल्यामुळे भाविकांनी योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनातर्फे कऱण्यात येत आहे.  

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.