Home » एकेकाळी दाऊदवर भारी पडलेला महाराष्ट्राचा ‘सुपारी किंग’

एकेकाळी दाऊदवर भारी पडलेला महाराष्ट्राचा ‘सुपारी किंग’

by Team Gajawaja
0 comment
Arun gawli
Share

१९९३ मध्ये मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणानंतर १९९४ च्या दसरा मेळाव्यातील भाषणात बाळासाहेब ठाकरेंनी “तुमच्याकडे दाऊद असेल तर आमच्याकडे गवळी आणि नाईक हे ‘हिंदू डॉन’ आहेत.” असं वक्तव्य केलं आणि या भाषणानंतर गवळी आणि नाईक हे म्हणजे दाऊदला सडतोड उत्तर हे सर्रास मानलं जाऊ लागलं, पण यानंतर अरुण गवळीचा (Arun gawli) प्रवास इतक्या वेगळ्या मार्गावर जाईल हा विचार खुद्द गवळीनेही केला नसेल.

सध्या अरुण गवळी (Arun gawli) चर्चेत आहे. २००७ मध्ये नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्येच्या आरोपाखाली गवळीसह इतर ११ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. १४ वर्षे शिक्षा भोगून झाल्यावर आता या शिक्षेतून सुटका व्हावी अशी याचिका गवळीने केली होती.

वयाची ६५ वर्षे पूर्ण केल्यानंतर जन्मठेप झालेल्या कैद्यांना प्रकृतीच्या कारणास्तव सोडण्यात येतं आणि याचाच फायदा घेऊन त्याने याचिका दाखल केली आहे. यामुळे लवकरच अरुण गवळीची (Arun gawli) सुटका होऊ शकते आणि पुन्हा एकदा तो राजकारणात येऊ शकतो अशी शक्यताही वर्तवली जात आहे.

या लेखातून आपण गिरणी कामगार ते कुख्यात डॉन असा थरारक प्रवास असणाऱ्या अरुण गवळीबद्दलच्या (Arun gawli) काही गोष्टी जाणून घेणार आहोत.

 

Arun gawli

 

अरुण गुलाब गवळीचा (Arun gawli) जन्म अहमदनगरमध्ये झाला. अरुणचे वडील मूळचे मध्यप्रदेश खांडवाचे, १९५० मध्येच नोकरीनिमित्त ते आधी अहमदनगर आणि मग मुंबई येथे स्थायिक झाले.

मिलमध्ये काम करणाऱ्या गुलाब गवळी यांची नोकरी सुटली अन् अरुणच्या शिक्षणालाही ब्रेक लागला, त्यानंतर त्याने शक्ति मिल्समध्ये काम सुरू केलं. मिलमध्ये काम सुरू केल्यापासूनच छोट्या मोठ्या बेकायदेशीर उद्योगांमध्ये अरुण सामील होऊ लागला.

याचदरम्यान मुंबईत अंडरवर्ल्डचा दबदबा निर्माण व्हायला सुरुवात झाली होती. वरदाराजन, दाऊद ईब्राहिम, करीम लाला, हाजी मस्तान या कुख्यात गुंडांची नावं प्रत्येकाच्या तोंडावर होती. अशातच अरुण गवळीने (Arun gawli) मुंबईच्या गुन्हेगारी विश्वात पाऊल ठेवलं.

===

हेदेखील वाचा : बाळासाहेब व शरद पवारांनी सुरू केलेलं एक ‘फ्लॉप’ मासिक

===

मुंबईच्या भायखळा आणि इतर परिसरातील मटका आणि दारूचे अड्डे चालवणाऱ्या कुंदन दुबे, पारसनाथ पांडे आणि मोहन सरमलकर या भायखळा कंपनीला संपवण्यात अरुण गवळी, रमा नाईक आणि बाबू रेशीम या तिघांचा हात होता. पांडेच्या हत्येनंतर या तिघांचा गुन्हेगारी विश्वातील दबदबा आणखीनच वाढला होता.

शाळेत अरुण (Arun gawli) हा रामा नाईकचा सीनियर होता. भायखळाच्या बकरी अड्डाजवळीलच एका म्युनिसिपल शाळेत दोघे एकत्र शिकायला होते. सातवीनंतर रामाने शाळा सोडली पण तरी या दोघांचे संबंध टिकून होते. बाबू रेशीम हा माजगाव डॉकच्या कँटिनमधील कामगारांचा नेता होता.

रामा आणि अरुण (Arun gawli) ज्या परिसरात त्यांचे अवैध उद्योगधंदे करायचे तिथेच बाबूदेखील राहायचा आणि कालांतराने तो त्यांच्यातच सामील झाला.

१९७५ मध्ये आणीबाणीनंतर MISA अंतर्गत रामा नाईकला अटक करण्यात आलं. तुरुंगात असताना त्याचा संबंध वरदाराजन मुदलियार या भाईशी आला आणि इथूनच अरुण गवळी, रामा नाईक आणि बाबू रेशीम या तिघांचा गुन्हेगारी विश्वातील दबदबा वाढायला सुरुवात केली.

वरदाराजन यानेच या तिघांच्या धाडसी स्वभावाचे कौतुक केले होते ज्यामुळे या विश्वात त्यांची सहज एंट्री झाली. या तिघांनी खंडणी, विदेशी मालाची तस्करी असे अवैध धंदे सुरू केले. याचदरम्यान डॉन् वरदाराजन चेन्नईला परत गेला तर ८५-८६ दरम्यान करीम लाला याने गुन्हेगारी विश्वाला रामराम ठोकला.

 

Karim-lala

 

यानंतर मुंबई अंडरवर्ल्डमध्ये दाऊद गँग आणि अरुण गवळी (Arun gawli) रामा गँग यांच्यातील धुसफूस वाढू लागली. पांडेच्या हत्येनंतर अरुण गवळीला (Arun gawli) अटक करण्यात आली होती पण महिन्याभरातच तो बाहेर आला आणि दगडी चाळीच्या बाहेरच त्याने एक बोर्ड लटकवला जयावर लिहिलं होतं ‘बी.आर.अ (BRA) गँग’. तुरुंगातून परतल्यावर यांची ताकद आणि वर्चस्व आणखी वाढले.

१९८८ मध्ये दाऊद दुबईमध्ये गेला आणि तिथूनच तो मुंबईवर कंट्रोल ठेवून होता. याचदरम्यान रामा नाईकला पोलिस एनकाउंटरमध्ये मारण्यात आलं. रामाला मारण्यामागे दाऊदचा हात असल्याची शंका अरुण गवळीला (Arun gawli) होती आणि यानंतरच या दोघांचे संबंध बिघडले ते कायमचेच.

===

हेदेखील वाचा : २५० वर्षं जुना, पेशवेकालीन इतिहासाची साक्ष देणारा ‘लकडी पूल’

===

९० च्या दशकात अरुण गवळीने (Arun gawli) त्याचा सारा करोबार दगडी चाळीतून चालवायला सुरुवात केली. हफ्ता वसूली, सुपारी घेऊन काटा काढणे अशा प्रकारची कामं गवळी दगडी चाळीच्या भिंतीआड बसून करत होता. अवघ्या काही वर्षात त्याला सुपारी किंग म्हणूनही ओळखले जाऊ लागले.

जेव्हा कायदा आपल्यापर्यंत पोहोचणार याची कुणकुण गवळीला (Arun gawli) लागली तेव्हा त्याने बरोबर राजकारणाचा आधार घेतला. चिंचपोकळी इथून तो विधानसभा निवडणूक लढला आणि जिंकूनही आला.

 

arun-gawli

 

परंतु २००७ दरम्यान झालेल्या शिवसेना नगरसेवकाच्या हत्येनंतर मात्र चित्र बदललं होतं, गवळीचे शिवसेनेबरोबर असलेले संबंधही बिघडले होते. याच प्रकरणात दोषी ठरवून अरुण गवळीला (Arun gawli) जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. गवळीला अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याच्या पूर्ण गँगच्या मुसक्या आवळल्या.

Maharashtra Control of Organized Crime Act (MCOCA) मकोका अॅक्ट अंतर्गत अटक झालेला, एकेकाळी दाऊदवर भारी पडलेला अरुण गवळी सध्या नागपूरच्या सेंट्रल जेलमध्ये त्याची शिक्षा भोगत आहे.

अरुण गवळीची सुटका झाल्यास त्याच्यासाठी बरेच पक्ष पायघड्या घालण्यास उत्सुक असल्याचंही सांगितलं जात आहे. आता अरुण गवळी बाहेर आल्यावर राजकारणात शिरणार की एका सामान्य माणसाचं आयुष्य जगणार हे येणारी वेळच ठरवेल.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.