Home » सौदी अरेबियामधील महिला मिस युनिव्हर्स स्पर्धेत सहभागी

सौदी अरेबियामधील महिला मिस युनिव्हर्स स्पर्धेत सहभागी

by Team Gajawaja
0 comment
Saudi Arabia
Share

कठोर कायद्यांसाठी ओळखल्या जाणा-या सौदी अरेबियामध्ये (Saudi Arabia) गेल्या काही वर्षापासून बदल होत आहेत. या देशात महिलांवर अनेक कडक कायद्याचे बंधन आहे. आता हेच बंधन कमी होत असून यावेळी सौदी अरेबियाचा झेंडा मिस युनिव्हर्समध्ये झळकणार आहे. सौदी अरेबियाची सुंदरी मिस युनिव्हर्स स्पर्धेत भाग घेणार असून ही कट्टरवाद्यांना चपराक असल्याचे संगितले जात आहे. 

२७ वर्षाची रुमी अल्काहतानी १७ सप्टेंबर रोजी मेक्सिकोमध्ये होणाऱ्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत सौदी अरेबियाच्या झेंड्यासह प्रवेश करणार आहे. सौदी अरेबियामधील महिला मिस युनिव्हर्स स्पर्धेत सहभागी होण्याची ही पहिलीच वेळ आहे. आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धेत सौदीची पहिली स्पर्धक म्हणून सहभागी होण्यासाठी रुमी जेवढी उत्सुक आहे, तेवढ्याच उत्सुक सौदीमधील अन्य तरुणी आहेत.  तिच्या या प्रवेशानं त्यांच्यासाठीही नव्या क्षेत्राची द्वारे उघडी होणार आहेत.  

कट्टर मुस्लिम देश म्हणून ओळखला जाणारा सौदी अरेबिया (Saudi Arabia) अलिकडे बदलत आहे. काही महिन्यांपूर्वी सौदी अरेबियामध्ये दारु पिण्यासंदर्भातील कडक नियमही बदलण्यात आले. आता सौदी अरेबियामधील तरुणी मिस युनिव्हर्स सारख्या स्पर्धेत सहभागी होणार आहे. सौदी अरेबियाचे हे पाऊल क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्या पुढाकाराने टाकण्यात आले आहे. क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी सौदीची धुरा हाती घेतल्यावर महिलांवरील जाचक नियम दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.  त्यातीलच हे एक पाऊल आहे.  या देशाची परंपरावादी प्रतिमा बदलण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. सौदी अरेबिया पहिल्यांदाच मिस युनिव्हर्ससाठी स्पर्धकांना पाठवणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सौदी मॉडेल रुमी अल्काहतानी काही महिन्यांपासून प्रयत्नशील होती. तिला स्वतःच्याच देशातून परवानगी मिळणे गरजेचे होते. आता सौदीने तिला आवश्यक असलेली परवानगी दिल्यामुळे रुमी सप्टेंबरला होणा-या या स्पर्धेत आपली दावेदारी सांगणार आहे. सौदीमधील कडक नियम बघता मिस युनिव्हर्समध्ये जाण्याचा तिचा दावा यापूर्वी नाकारला होता. मात्र आता देशानेच परवानगी दिल्यामुळे रुमी स्पर्धेच्या तयारीला लागली आहे.  

कुराणला देशाचे संविधान मानणा-या  सौदी अरेबियाचे हे एक ऐतिहासिक पाऊल आहे.   याबाबत स्पर्धेचे आयोजकही खुष आहेत.  त्यांनी या निर्णयाचे, सौदी अरेबियाच्या पारंपारिकपणे पुराणमतवादी समाजासाठी एक मैलाचा दगड अशा शब्दात स्वागत केले आहे.  सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान हे आधुनिक जगाबरोबर चालण्यासाठी काही क्रांतीकारी निर्णय घेत आहेत.  हा त्यापैकीच एक निर्णय आहे. (Saudi Arabia)  

रियाधमध्ये जन्मलेली रुमी अलकाहतानी ही एक मॉडेल आहे. तसेच निर्माती म्हणूनही तिची ओळख आहे. तिच्याकडे मिस सौदी अरेबियाचा (Saudi Arabia) ताज आहे. रुमीने यापूर्वी मलेशियातील मिस एशिया, मिस अरब पीस आणि मिस युरोपसह अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सौदीचे प्रतिनिधित्व केले आहे.  रुमी ही दंत चिकित्सक आहे.  तिचे इंग्रजी, फ्रेंच आणि अरबी भाषेवर प्रभुत्व आहे. रुमीचे तिच्या इंस्टाग्राम पेजवर १० लाख फॉलोअर्स असून इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही हजारो फॉलोअर्स आहेत.  रियाधमध्ये  रुमी आपली आई आणि तीन बहिणींसोबत राहते. तिला जेव्हा मिस युनिव्हर्स मध्ये भाग घेण्याची परवानगी मिळाली तेव्हा तिने हा आपल्या आय़ुष्यातील सर्वाधिक आनंदाचा क्षण असल्याचे सांगितले.  आखाती प्रदेशातील पहिली महिला ठरल्यानं तिने आनंद व्यक्त करत देशाचे आभार मानले आहेत.  

=============

हे देखील वाचा : मलिशियाच्या गायब विमानामागे एलियन

=============

सौदी क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्या व्हिजन २०३० चा भाग म्हणून रुमी अल्काहतानीचा सौंदर्य स्पर्धेतील सहभागाकडे बघितले जात आहे. प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांना सौदी अरेबियाची ओळख कट्टरतावादी देशातून बदलून मध्यम मुस्लिम देश अशी करायची आहे. त्यासाठी त्यांनी अनेक क्रांतीकारी निर्णय घेतले आहेत. प्रिन्स सलमान यांच्या पुढाकाराने सौदीमध्ये महिलांना वाहन चालवण्याची, सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये आणि कार्यांमध्ये पुरुषांच्या बरोबरीने भाग घेण्याची आणि पुरुष पालकाशिवाय पासपोर्ट मिळविण्याचा अधिकार देण्यात आला आहे.  तसेच गैर मुस्लिमांना दारुची विक्री सुरु करण्यात आली आहे.  प्रिन्स सलमान पर्यटन व्यवसाय वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहेत.  त्यांच्या या निर्णयाचे सौदीतील तरुण पिढी स्वागत करीत आहे.  

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.