Home » “भाजप – मनसे युती ही ‘हवेतील चर्चा’ की अपरिहार्यता”

“भाजप – मनसे युती ही ‘हवेतील चर्चा’ की अपरिहार्यता”

by Correspondent
0 comment
Raj thackeray Chandrakant patil | K Facts
Share

श्रीकांत नारायण

महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर करण्यासाठी भाजपतर्फे सातत्याने प्रयत्न होत असतानाच आता राज्यात भाजप आणि राज ठाकरे यांच्या मनसे पक्षाची युती होण्याची जोरदार चर्चा आहे. त्यासंदर्भात भाजपचे प्रदेश अध्यक्ष श्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी गेल्या पंधरा दिवसात मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे (Raj Thackeray) यांची दोनदा भेट घेतली. विशेष म्हणजे शुक्रवारी पाटील यांनी राज ठाकरे यांच्याशी मुंबईतील त्यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी दीर्घकाळ चर्चा केली आणि नंतर ते आणि आशिष शेलार (Ashish Shelar) थेट दिल्लीला गेल्याचे वृत्त आहे.

त्यांच्यापाठोपाठ माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे देखील दिल्लीला गेल्याचे समजते. त्यामुळे भाजप-मनसे युतीबाबत दिल्लीतील पक्षश्रेष्ठींशी चर्चा होण्याच्या शक्यतेलाही बळ मिळाले आहे. शिवसेनेने भाजपशी असलेली आपली युती तोडून म. वि. आघाडी सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतल्यामुळे भाजपची सत्ता तर गेलीच शिवाय भाजपने आपला जुना मित्र पक्षही गमावला आहे. त्यामुळे आता शिवसेनेला शह देण्यासाठी भाजपने शिवसेनेचीच ध्येयधोरणे असलेल्या मनसेशी युती करण्याचा निर्णय घेतला असावा. भाजपच्या दृष्टीने ती एक अपरिहार्यता असावी. भाजपवर ही वेळ का यावी यासाठी आधी मनसेची पार्श्वभूमी लक्षात घेण्याची गरज आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात लोकमताचा पाठिंबा दर्शविणारे जे काही प्रमुख राजकीय पक्ष आहेत त्यामध्ये श्री राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) या पक्षाचाही समावेश करावा लागेल. राज ठाकरे हे ठाकरे घराण्यातील असल्यामुळे त्यांचा पिंडच मुळी बेधडक राजकारण करण्याचा आहे आणि त्याला ठाकरे शैलीची जोड असल्यामुळे त्यांना विशेष महत्व प्राप्त झाले आहे. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Bal Thackeray) हे त्यांचे काका. श्री राज ठाकरे यांचे बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यक्तिमत्वाशी खूपच साम्य असल्यामुळे – अगदी व्यंगचित्रकारापासून ते वक्तृत्वशैलीपर्यंत – राज ठाकरे यांच्या नेतृत्वाला फार लवकर लोकमान्यता मिळाली.

वास्तविक बाळासाहेब ठाकरे हयात असतानाच राज ठाकरे यांचे नेतृत्व शिवसेनेतून पुढे आले मात्र बाळासाहेब ठाकरे यांनी जेंव्हा त्यांचे वारसदार म्हणून त्यांचे चिरंजीव उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला मान्यता दिली तेव्हा स्वयंभू नेतृत्व असलेले राज ठाकरे दुखावले गेले आणि बाळासाहेबांच्या हयातीतच त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना या स्वतंत्र राजकीय पक्षाची स्थापना केली. राज ठाकरे अधिक आक्रमक तर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मवाळ आणि संयमी. त्यामुळे साहजिकच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या नेतृत्वाबाबत परस्परांशी तुलना होऊ लागली.

श्री राज ठाकरे यांची बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखीच आक्रमक शैली, स्पष्ट आणि परखड मते यामुळे सुरुवातीला मनसेला चांगला प्रतिसाद मिळत गेला. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर नाराज असलेली शिवसेनेतील काही नेतेमंडळी मनसेत सामील झाली. त्यामुळे मनसेला चांगले बळ मिळाले. प्रारंभी मुंबई, ठाणे, पुणे नाशिक सारख्या शहरांत मनसेचा चांगला प्रभाव दिसून आला. मात्र एखादा राजकीय पक्ष चालवायचा, त्याला लोकमताचा पाठिंबा सतत मिळवायचा हे आता पहिल्यासारखे सोपे राहिले नाही.

‘जनता’ आता खूपच ‘शहाणी’ झाली आहे. तसेच बदलत्या काळानुसार सध्याच्या कार्पोरेट संस्कृतीत पक्ष कार्यकर्त्यांच्याही आशा-आकांक्षा खूप वाढल्या आहेत. जुन्या काळातील सेवाभावी कार्यकर्ते आता तसे दुर्मिळ झाले आहेत. त्यामुळे पक्षकार्यकर्त्यांना सांभाळणे खूप अवघड झाले आहे. कार्यकर्ते सांभाळायचे असतील तर पक्षनेतृत्वाला त्यांच्यासाठी खूप वेळ द्यावा लागतो, इच्छा नसतानाही त्यांच्यात ‘रमावे’ लागते. अनेकवेळा काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना पाठीवरून शाबासकीची थाप द्यावी लागते.

राज ठाकरे यांची ‘स्वभावशैली’ लक्षात घेता त्यांना नेमके हेच जमले नसावे. त्यामुळे ज्या राज्यविधानसभेत एकेकाळी मनसेचे दहा-बारा आमदार होते तेथे आता फक्त एक आमदार आहे. ज्या मुंबई महापालिकेत एकेकाळी मनसेचे २५ नगरसेवक होते तेथे नंतर अवघे सात नगरसेवक निवडूनआले आणि तेही नंतर शिवसेनेत गेले. ज्या नाशिक महापालिकेत मनसेने पाच वर्षासाठी सत्ता काबीज केली होती तीही नाशिक महापालिका नंतर मनसेने गमावली.

राम कदम, प्रवीण दरेकर यांच्यासारखे मनसेचे तरुण आमदार आपल्या चांगल्या भवितव्यासाठी भाजपमध्ये जाऊन तेथे वेलसेटल झाले. थोडक्यात सुरुवातीला एकदम उभारी घेतलेल्या मनसेला लवकरच ‘उतरती कळा ‘ लागली. महाराष्ट्राच्या अनेक शहरांत तर मनसेचे अस्तित्व देखील नाही अशी सध्याची परिस्थिती आहे.

असे असले तरी श्री राज ठाकरे यांच्या आक्रमक शैलीमुळे मनसेचे अस्तित्व टिकून आहे आणि ते यापुढेही कायम राहणार आहे. सुदैवाने गेल्या दोन वर्षात महाराष्ट्राचे राजकारण खूप बदलले आहे. गेल्या तीस वर्षांपासून असलेली शिवसेना-भाजपची अभेद्य युती तुटली आहे. मुख्यमंत्रीपद मिळविण्यासाठी शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी या आपल्या विरोधी विचारसरणीच्या पक्षांशी युती करून महाराष्ट्राची सत्ता काबीज केली आहे. सत्तेमुळे नाही म्हटले तरी शिवसेनेला पुन्हा एकदा संजीवनी प्राप्त झाली आहे.

File Photo

मनसेची मात्र कोठेही सत्ता नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे आगामी काळात कार्यकर्त्यांना रोखून धरण्याचे अवघड काम राज ठाकरे यांना करावे लागणार आहे. शिवसेनेने भाजपशी युती तोडल्यामुळे भाजप आता साहजिकच मनसेशी युती करण्यास उत्सुक आहे. कारण शिवसेना आणि मनसे यांच्या ध्येयधोरणांमध्ये तसा फार काही फरक नाही.

मराठी आणि हिंदुत्व या दोनच प्रश्नावर प्रामुख्याने या दोन्ही पक्षांची इमारत उभी राहिली आहे. त्यामुळे शिवसेनेची मते फोडण्यासाठी मनसेचा चांगला उपयोग होऊ शकतो. मुंबई, ठाणे, कल्याण – डोंबिवली, पुणे, नाशिक येथे होणाऱ्या आगामी महापालिका निवडणुकांमध्ये त्याचा लाभ होईल अशी शक्यता भाजपाला वाटत आहे. म्हणूनच राज्यातील भाजपचे नेते मनसेशी युती करण्याबाबत उत्सुक असावेत.

अर्थात मनसेशी युती करण्याचे सर्वाधिकार काही प्रदेश भाजप नेत्यांच्या हातात नाहीत. याबाबत अंतिम निर्णय भाजप श्रेष्ठींनाच (म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा) घ्यावा लागेल. प्रदेश भाजपचे अध्यक्ष श्री चंद्रकांत पाटील यांनी तसेत स्पष्टही केले आहे. भाजप-मनसे युती होऊ शकते मात्र परप्रांतीयांच्या मुद्यावर घोडे अडू शकते. त्याबाबत श्री राज ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी अशी भाजपची अपेक्षा आहे.

राज ठाकरे आपल्या काही मतांबाबत नेहमीच ठाम असतात. तेच त्यांचे वैशिष्ट्य आहे. वास्तविक परप्रांतीयांबाबत मनसेचे जे धोरण आहे तेच गेल्या कित्येक वर्षांपासून शिवसेनेचे आहे. खरे तर या प्रमुख प्रश्नावरच मराठी माणसांच्या हक्कासाठी शिवसेनेची स्थापना झाली आहे. मात्र तीस वर्षांपूर्वी भाजप-शिवसेना यांच्यात ज्यावेळी युती झाली त्यावेळी हा प्रश्न गौण मानला गेला. कारण एक अपरिहार्यता म्हणून दोन्ही पक्षांना युती करण्याची गरज होती.

आणि त्या युतीचा महाराष्ट्रात दोन्ही पक्षांना चांगलाच लाभ झाल्याचे दिसून आले. मात्र आता उभय पक्षांची युती तुटल्यामुळे शिवसेनेला शह देण्यासाठी त्याच पक्षाच्या ध्येयधोरणाशी मिळतेजुळते असलेल्या मनसेशी युती करण्याची गरज भाजपला निर्माण झाली आहे. राज ठाकरे यांचे परप्रांतीयांबाबतचे धोरण भाजपला मान्य नाही हे श्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच स्पष्ट केले आहे. मात्र युती करायचीच असेल तर त्याबाबत उभयपक्षी तडजोडही होऊ शकते.

राज ठाकरे यांनाही मनसेच्या वाढीची गरज आहे. त्यामुळे तेही या युतीबाबत सकारात्मक विचार करू शकतात. महापालिका निवडणुकांमध्ये जर ही युती यशस्वी होऊ शकली तर त्याचे प्रतिबिंब आगामी विधानसभा निवडणुकीतही पडू शकते. अर्थात ही युती झालीच तर त्याचा भाजपपेक्षा मनसेलाच जास्त फायदा होईल हे मात्र निश्चित. तूर्तास तरी भाजपनेच पुढे केलेल्या ‘हाता’ला राज ठाकरे ‘टाळी’ देतात की नंतर त्याची ‘टवाळी’ करतात हे पहावे लागेल.

– श्रीकांत नारायण
 (लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत)

टीप : या लेखातील माहिती आणि मते ही सर्वस्वी लेखकाची आहेत. क फॅक्टस टीम याची पुष्टी करत नाही. तसेच लेखकाच्या मतांशी आम्ही सहमत असूच असेही नाही.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.