Home » कसोटीचे अजिंक्यपद ऑसीकडेच !

कसोटीचे अजिंक्यपद ऑसीकडेच !

by Team Gajawaja
0 comment
WTC Final
Share

विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांचा संघर्ष मोडीत काढत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाला तब्बल २०९ धावांनी पराभव करत ऑस्ट्रेलियाने कसोटी अजिंक्यपदावर आपले नाव कोरले. भारतीय संघाला सलग दुसऱ्यांदा उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने दिलेल्या ४४४ धावांच्या लक्षाचा पाठलाग करतांना भारतीय संघाचा डाव अवघ्या २३४ धावांवर संपुष्टात आला आणि भारताने हा सामना गमावला. हे अजिंक्यपद जिंकत आयसीसीचे सर्व जेतेपद पटकावणारा ऑस्ट्रेलिया पहिलाच संघ ठरला. (WTC Final)

लंडनमधील ओव्हल येथे झालेल्या या सामन्यात भारतीय संघ पहिल्या डावात पिछाडीवर होता. त्यानंतर दुसऱ्या डावात भारतीय संघाने संघर्ष करण्याचा प्रयत्न केला. चौथ्या दिवसाअखेर भारतीय संघ मजबूत स्थितीत होता. विराट आणि रहाणेच्या संयमी फलंदाजीच्या बळावर भारतीय संघाने दिवसाअखेर ३ बाद १६४ धावांपर्यंत मजल मारली. (WTC Final)

पाचव्या आणि अखेरच्या दिवशी भारताला विजयासाठी २८० धावांची आवश्यकता होती तर सात बळी त्यांच्या हातात होते. त्यामुळे पाचव्या दिवशी भारताच्या विजयाच्या शक्यता वर्तवण्यात येत होत्या. मात्र पाचव्या दिवसाच्या सुरुवातीलाच ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज स्कॉट बोलंडने भारतीयांना दोन मोठे झटके दिले. त्याने विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांना माघारी परतवत भारताच्या विजयाच्या आशांना तडा दिला. (WTC Final)

विराट कोहली ७८ चेंडूत ४९ धावा फटकावून माघारी परतला. स्कॉट बोलंडने त्याला माघारी परतवले. विराटनंतर फलंदाजीला आलेल्या रवींद्र जडेजाचा ऑस्ट्रेलियन गोलंदाज बोलंडने खेळपट्टीवर निभाव लागू दिला नाही. खातेही न उघडता जडेजाला माघारी परतावे लागले. भारताला त्या स्थितीपासून सामना जिंकणे अवघड होऊन जाईल हे निश्चित झाले होते. पहिल्या डावातील अर्धशतकवीर अजिंक्य रहाणे याने थोडाफार प्रतिकार केला मात्र मिचेल स्टार्कने यष्टिरक्षक अलेक्स कॅरीकरवी त्याला झेलबाद करत त्याचा डाव संपुष्टात आणला. बाद होण्यापूर्वी रहाणेने १०८ चेंडूत ४६ धावांची खेळी केली.(WTC Final)

=======

हे देखील वाचा : आयपीएलमध्ये ‘या’ खेळाडूंनी जिंकले अवार्ड्स!

=======

त्यानंतर फलंदाजीला आलेल्या भारतीय फलंदाजांचा ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी खेळपट्टीवर निभाव लागू दिला नाही. शेवटच्या सात भारतीय फलंदाजांना ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी केवळ ५५ धावांच्या बदल्यात बाद केले अन डब्लूटीसीच्या दुसऱ्या सत्राच्या जेतेपदावर ऑस्ट्रेलियाने आपले नाव कोरले. यासोबतच भारतीय संघाचा आयसीसी जेतेपदाचा दुष्काळ कायम राहिला. २०१३ साली महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघाने शेवटचे जेतेपद पटकावले होते. त्यानंतर आतापर्यंत भारतीय संघाला एकाही जेतेपदाला गवसणी घालता आली नाही.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.