Home » नीरज चोप्राचा पुन्हा ‘गोल्डन’ थ्रो !

नीरज चोप्राचा पुन्हा ‘गोल्डन’ थ्रो !

by Team Gajawaja
0 comment
Neeraj Chopra
Share

हरियाणातील खंदरा हे छोटंसं खेडंगाव. गावाच्या बाहेरील छोट्या मैदानात वेगवेगळ्या खेळांची प्रॅक्टिस चालायची. कुणी हौस म्हणून तर कुणी जिल्हा, तालुकास्तरीय स्पर्धांची तयारी करण्यासाठी त्या मैदानावर येत असे. सतीश कुमार हेदेखील आपल्या तेरा वर्षांच्या मुलाला घेऊन त्या मैदानात आले होते. मुलाला कुठला खेळ वगैरे खेळावण्याचा त्यांचा हेतू मुळीच नव्हता. आपल्या मुलाने मैदानात यावं अन थोडी शारीरिक हालचाल करावी जेणेकरून त्याचं आवाक्याबाहेर वाढणारं वजन कमी होईल हा त्यांचा हेतू होता. तो मुलगा एका जागी बसून वेगवेगळे खेळ खेळणाऱ्या त्या खेळाडूंना न्याहळत होता. सगळ्या खेळांना न्याहळत असतांनाच एका खेळाने, तो खेळ खेळणाऱ्या खेळाडूने त्या लहानग्या मुलाचं विशेष लक्ष वेधून घेतलं. (Neeraj Chopra)

जसबीर सिंग नेहमीप्रमाणे त्या मैदानात आपली भालाफेकीची प्रॅक्टिस करत होते. जसबीर यांचं एका हातात भाला घेऊन आवेशात पळत येणं, पूर्ण ताकदीने तो भाला फेकण, आपली डौलदार शरीरयष्टी घेऊन मैदानात वावरणं या सगळ्या गोष्टींची मैदानाबाहेर बसलेल्या तेरा वर्षांच्या त्या चिमुरड्या पोराला भुरळ पडली. त्याच्यासाठी हा खेळ नवीन होता. आजवर त्याने बरेच खेळ बघितले होते पण हा खेळ बघून त्याला मनातून वाटत होतं की हा खेळ आपणही खेळला पाहिजे. तो जसबीर सिंगकडे गेला, त्यांना त्या खेळाबद्दल सगळी माहिती विचारली आणि हा खेळ आपण खेळायचा, त्यासाठी योग्य ते प्रशिक्षण घ्यायचं हे मनात पक्कं करूनच तो घरी परतला. त्या चिमुरड्या मुलाच्या त्या निर्धाराने पुढे भारताचं अॅथलेटिक्समधील भविष्य उजळून टाकलं. तो मुलगा होता भारतीय अॅथलेटिक्समध्ये सुवर्णकाळ आणणारा भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्रा ! (Neeraj Chopra)

ही गोष्ट आता आठवण्याचं कारण म्हणजे बुडापेस्ट येथे सुरू असलेल्या वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये नीरज चोप्राने ऐतिहासिक कामगिरी करत पुन्हा एकदा सुवर्णपदक आपल्या नावावर केलं आहे. ८८.१७ मीटर अंतरावर भाला फेकत या स्पर्धेत सुवर्ण जिंकणारा नीरज पहिलाच भारतीय ठरला. विशेष म्हणजे स्पर्धेच्या पहिल्या फेरीत नीरज बाराव्या स्थानी होता. पहिल्या फेरीतील आपल्या कामगिरीचे जास्त दडपण न घेता त्याने दुसऱ्या आणि तिसऱ्या फेरीत आपला खेळ उंचावला आणि प्रतिस्पर्धी खेळाडूंना मागे सोडण्यात यश मिळवलं. झालं असं की पहिल्या फेरीत नीरजला (Neeraj Chopra) फाऊलचा सामना करावा लागला. पहिल्या फेरीतील या अपयशातून सावरत दुसऱ्या फेरीत त्याने ८८.१७ मीटर अंतरावर भाला फेकला. आपला हाच माइंडसेट कायम ठेवत त्याने तिसऱ्या फेरीत ८६.३२ मीटरवर भाला फेकला. दोन फेरीतील त्याच्या या अप्रतिम कामगिरीमुळे सुवर्णपदकावर शिक्कामोर्तब करण्यात त्याला यश आलं. २०१६ साली अंडर २० वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये ८६.४८ मीटर भाला फेकत नीरज चोप्रा पहिल्यांदा प्रकाशझोतात आला होता. त्यानंतर आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करत त्याने आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला. साऊथ एशियन गेम्स, एशियन गेम्स, एशियन एथलॅटिक्स चॅम्पियनशिप, कॉमनवेल्थ गेम्स, डायमंड लिग, ऑलिम्पिक गेम्स, वर्ल्ड एथलॅटिक्स चॅम्पियनशिप या सगळ्या प्रतिष्ठित स्पर्धांमध्ये गोल्ड जिंकणारा नीरज चोप्रा (Neeraj Chopra) एकमेव खेळाडू आहे.

वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये पहिल्यांदाच कुठल्यातरी भारतीय खेळाडूने सुवर्ण जिंकण्याची कामगिरी केली आहे. आपल्या चमकदार कामगिरीने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा तिरंगा फडकवण्याची नीरज चोप्राची ही काही पहिलीच वेळ नाही. टोकियो येथे पार पडलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत नीरज चोप्राने आपल्या सर्वोच्च कामगिरीचे प्रदर्शन करत गोल्ड मेडल जिंकले होते. भालाफेक या भारतात फारसं ग्लॅमर नसणाऱ्या खेळात नीरज चोप्राने मिळवलेलं गोल्ड खूप मोठी अचिव्हमेंट आहे. ऑलिंपिकच्या या यशाने जराही हुरळून न जाता नीरजने (Neeraj Chopra) आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये आपली सुवर्ण घौडदौड त्यानंतरदेखील कायम ठेवली. गेल्या वर्षी झालेल्या डायमंड लीग स्पर्धेतदेखील नीरज चोप्राने ‘सुवर्ण’वेध घेतला होता.

===========

हे देखील वाचा : पराभवानंतरही प्रज्ञानंदचे भविष्य उज्ज्वल !

===========

क्रिकेटचं वेड असणाऱ्या भारतासारख्या देशात भालाफेकी सारख्या खेळात करियर करणे, खेळाकडे पूर्णपणे लक्ष देता यावे यासाठी नववीतच शाळा सोडणे, वडील शेतकरी, घरची आर्थिक परिस्थिती जेमतेम असतानादेखील आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करत राहणे आणि सगळ्या अडचणींवर मात करत जागतिक स्तरावर आपल्या, आपल्या देशाच्या नावाचा डंका वाजवणे हे नीरज चोप्रालाच जमू शकत, त्याने ते जमवलंय अन वयाच्या पंचविशीतचं तो सर्वकालीन महान भारतीय अॅथलेटिक्सच्या यादीत जाऊन बसलाय !


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.