Home » आजपासून क्रिकेटचं महायुद्ध सुरु !

आजपासून क्रिकेटचं महायुद्ध सुरु !

by Team Gajawaja
0 comment
World Cup 2023
Share

आजपासून भारतात क्रिकेटचा महासंग्राम म्हणजेच आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप (World Cup 2023) सुरु होत आहे. इंग्लंड क्रिकेटचा जन्मदाता असला तरी क्रिकेटची पंढरी भारत आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. त्यात १२ वर्षानंतर वर्ल्ड कप भारतात होतोय, ही भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणीच ! गतविजेता इंग्लंड आणि उपविजेता न्यूझीलंड दरम्यान आज जगातल्या सर्वात मोठ्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर यंदाच्या वर्ल्ड कपचा पहिला सामना रंगणार आहे. क्रिकेट वर्ल्ड कपचा इतिहास पाहायचं झालं तर, १९७५ पासून याची सुरुवात झाली. त्यावेळी वेस्ट इंडिजचा क्रिकेटमध्ये प्रचंड दबदबा होता. याच्याच जोरावर पहिल्या दोन वर्ल्ड कपवर त्यांनी आपलं नाव कोरलं. मात्र यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये चक्क वेस्ट इंडिज संघच नसल्यामुळे क्रिकेटप्रेमींना प्रचंड धक्का बसला. वेस्ट इंडिज शिवाय हा पहिलाच वर्ल्ड कप (World Cup 2023) आहे.

१९८३ च्या वर्ल्ड कपमध्ये (World Cup 2023) कपिल देव यांच्या नेतृत्वातील अंडरडॉग समजल्या जाणाऱ्या भारतीय संघाने तो कारनामा करून दाखवला, ज्याला पिढ्यान पिढ्या लक्षात ठेवतील. हा एक क्षण भारतात अनेक महान क्रिकेटपटू घडवण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरला. अंतिम सामन्यात भारताने बलाढ्य वेस्ट इंडिजचा पराभव करून इतिहास घडवला आणि क्रिकेटचं चित्र पूर्णपणे बदललं. इतकंच काय तर भारताला आगामी वर्ल्ड कपचं (१९८७) यजमानपदसुद्धा मिळालं. यावेळी मात्र ऑस्ट्रेलियाचं खातं उघडलं. ऑस्ट्रेलियाने पहिला वर्ल्ड कप जिंकला आणि यानंतर क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाची वेगळीच दहशत पाहायला मिळाली. १९९२ चा वर्ल्ड कप मात्र अपेक्षेपेक्षा वेगळा निघाला.इम्रान खान यांच्या नेतृत्वातील पाकिस्तान संघ वर्ल्ड चॅम्पियन ठरला.

१९९६ सालचा वर्ल्ड कप (World Cup 2023) भारत, पाकिस्तान आणि श्रीलंकेत पार पाडला. एखादा आशियाई संघ यंदा चॅम्पियन होणार, हे निश्चितच होतं आणि श्रीलंकेने बाजी मारली. आतापर्यंत ६ वर्ल्ड कप एडिशनमध्ये पाच देशांनी आपली मोहोर उमटवली होती. पण आता क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाच्या दहशतीचं साम्राज्य सुरु होणार होतं. स्टीव्ह वॉच्या नेतृत्वात १९९९ चा वर्ल्ड कप ऑस्ट्रेलियाने जिंकला आणि ऑस्ट्रेलिया दोन वर्ल्ड कप जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजच्या पंक्तीत जाऊन बसला. यानंतर पुढच्या २ वर्ल्ड कपमध्ये कांगारूंना रोखणारं कोणीही नव्हतं. रिकी पॉंटिंगच्या कॅप्टन्सीमध्ये २००३ आणि २००७ हे दोन्ही वर्ल्ड कप जिंकत ऑस्ट्रेलियाने विजयाची हॅट्ट्रिक केली. अनेक संघ ऑस्ट्रेलियासमोर खेळायला घाबरायचे.

२००३ चा वर्ल्ड कप एका माणसासाठी खास होता, तो म्हणजे सचिन तेंडुलकर ! सचिनने या वर्ल्ड कपमध्ये तब्बल ६७३ धावा केल्या होत्या, जो रेकॉर्ड आजही कोणी मोडू शकलं नाही. १५० किमीच्या स्पीडने बॉल टाकणाऱ्या शोएब अख्तरच्या बाउन्सरवर सचिनने डीप पॉईंटला मारलेला गगनचुंबी सिक्सर आजही क्रिकेटप्रेमींच्या लक्षात आहे. पण भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी २००७ चा वर्ल्ड कप सर्वात जास्त निराशाजनक ठरला. बांगलादेशसारख्या छोट्या संघाने भारताचा दारुण पराभव केला होता. भारत नॉक आउट स्टेजमध्येच बाहेर पडल्यानंतर देशभरातील क्रिकेटवेड्यांनी निदर्शने केली. हा वर्ल्ड कप ऑस्ट्रेलियाच्या पारड्यात पडला.

पण शेवटी फिनिक्स पक्षाप्रमाणे भारताने राखेतून भरारी घेतली. २०११च्या वर्ल्ड कपचं यजमानपद भारताकडे होतं आणि कॅप्टन कुल महेंद्र सिंग धोनीच्या नेतृत्वात भारताने या संधीचं सोनं केलं. वानखेडे स्टेडियमवर भारत वि. श्रीलंका दरम्यान झालेला अंतिम सामना सर्वांच्याच मनात आजही घर करून आहे. धोनीने टोलावलेला तो सिक्स आणि रवी शास्त्री यांचं ‘इंडिया लिफ्ट द वर्ल्ड कप आफ्टर २८ इयर्स’ हे आजही क्रिकेटप्रेमींच्या कानात घोंघावत आहे. २००७ चा वचपा भारताने २०११ च्या वर्ल्ड कपमध्ये काढला आणि १९८३ नंतर दुसऱ्यांदा विश्वविजेता ठरला. यामध्ये पाहायची एक गोष्ट म्हणजे २००७ आणि २०११ या दोन्ही वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात श्रीलंकाच होता, त्यामुळेच त्यांचा खेळ आणि त्यांची जिद्द विसरून चालणार नाही.(World Cup 2023)

२०१५ साली कोणीही अपेक्षा केली नव्हती की ऑस्ट्रेलिया पुन्हा एकदा वर्ल्ड चॅम्पियन होईल, मात्र पाचव्यांदा कप उंचावणारा ऑस्ट्रेलियाचा संघ क्रिकेटमध्ये आजपर्यंतचा सर्वात यशस्वी संघ ठरला. क्रिकेटला जन्म दिला इंग्लंडने, मात्र अजूनही त्यांच्याकडे वर्ल्ड कपचा (World Cup 2023) दुष्काळ पडला होता. यापूर्वी ३ वेळा इंग्लंड फायनलपर्यंत पोहोचला होता आणि चौथ्यांदा इंग्लंडने अखेर बाजी मारली. अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा पराभव करून ओएन मॉर्गनच्या नेतृत्वात इंग्लंडने क्रिकेटचा दुष्काळ कायमचा संपवला. आतापर्यंत ऑस्ट्रेलिया ५, वेस्ट इंडिया २, भारत २, पाकिस्तान १ , श्रीलंका १ आणि इंग्लंड १ असे वर्ल्ड कप विनर आहेत. यंदा सर्वच टीम तगड्या आहेत, इतकंच काय तर बांगलादेश, अफगाणिस्तान आणि नेदरलँड्स यांचासारख्या संघांनीही उत्तम परफॉर्मन्स दिला आहे. त्यामुळे यंदाचा वर्ल्ड कप यजमान भारत उंचावेल की इतर संघाला याचा मान मिळेल, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.