Home » ‘या’ शहरांमध्ये अशी खेळली जाते होळी..

‘या’ शहरांमध्ये अशी खेळली जाते होळी..

by Team Gajawaja
0 comment
Holi
Share

आपल्या देशातील प्रत्येक प्रांतात नानाविध परंपरा आहेत. राज्याराज्यातील सणांमध्ये विविधता आहे. हिच विविधता जाणण्यासाठी आणि या सणांमध्ये सहभागी होण्यासाठी देशात धार्मिक पर्यटनात वाढ झाली आहे. त्यातही सर्वात मोठा सण म्हणून होळीकडे बघितले जाते. वृंदावन, मथुरा, वाराणसी, उदयपूर, इंदौर, हंपी या शहरात होळी (Holi) हा सण मोठ्याप्रमाणात साजरा होतो. या शहरात जवळपास आठवडाभर होळीचा सण साजरा होतो. येथील होळी एवढी प्रसिद्ध आहे की, देशातीलच नव्हे तर परदेशातील नागरिकही येथे मोठ्या प्रमाणात येतात. मुख्यतः तरुण पिढी या शहरात होळी साजरी करण्यासाठी दाखल होते. यावर्षीही या सर्वच शहरांमध्ये होळीसाठी मोठी तयारी करण्यात येत असून मोठ्या संख्येने येणा-या पर्यटकांसाठी विशेष व्यवस्था करण्यात येणार आहे.

होळी (Holi) म्हटलं की पहिल्यांदा वृंदावन आणि मथुरेची आठवण होते. या दोन्ही शहरांपाठोपाठ राजस्थानच्या उदयपूरमधील होळीही लोकप्रिय आहे. उदयपूरची होळी ही शाही होळी म्हणून ओळखली जाते. मथुरा, वृंदावन, बरसान, पुष्कर येथील होळी पाठोपाठ उदयपूर येथील होळी सणाला पसंती दिली जाते. या क्रमवारीत उदयपूरचा 9 वा क्रमांक लागतो. उदयपूरमध्ये होळी साजरी करण्यासाठी परदेशी पर्यटक मोठ्या संख्येने येतात. त्यांच्यासाठी येथे कॅम्पही उभारण्यात येतात. येथे बिंदा संस्था हा उत्सव ‘रंगोथों’ या नावाने साजरा करते.

यामध्ये होळी (Holi) खेळण्यापूर्वी शहरातील 350 हून अधिक साहसप्रेमी फतेह सागरच्या काठावर सायकलिंग करतात. दरवर्षी या साहसप्रेमींची संख्या वाढत आहे. यावर्षी देवालीच्या टोकापासून या मॅरेथॉनची सुरुवात होणार आहे. लोईरा, चिकलवास, थूर बसस्थानक मार्गे फतेह सागर येथी ही सायकलफेरी झाल्यावर होळी खेळण्यात येणार आहे. उदयपूरमध्ये पारंपारिकरित्या गणगौर घाटावर होळी साजरी होते. त्यात सुमारे 10 हजार नागरिक सहभागी होतात. यावर्षी 25 मार्च रोजी सकाळी 9 ते 2 या वेळेत ही होळी साजरी होणार आहे. याच उदयपूरच्या होळीवर एक माहितीपटही प्रदर्शित झाला आहे. OTT प्लॅटफॉर्मवर ‘जाम में: अवर मॅन इन इंडिया’ या नावानं हा माहितीपट पहाता येतो. युनायटेड किंग्डमचे दिग्दर्शक टॉम व्हाईट यांनी हा माहितीपट तयार केला आहे.

उदयपूर पाठोपाठ होळी (Holi) साजरी होते ते शहर म्हणजे हंपी. कर्नाटकातील हंपीची होळी जगभरात प्रसिद्ध आहे. दरवर्षी होळी पाहण्यासाठी देश-विदेशातील पर्यटक येथे येतात. हंपीला युनेस्कोने जागतिक वारसा यादीत समाविष्ट केले आहे. मंदिरांच्या या शहरात होळीचे रंग मोठ्या थाटात खेळले जातात. हंपीमधील अनेक मंदिरे ही महाभारतकालीन आहेत. या मंदिरांमध्ये पारंपारिकरित्या होळी खेळली जाते. हंपीचे स्थानिक ढोल, नगारे वाजवून होळी साजरी करतात. होळीच्या मिरवणुकीत सहभागी झालेले नागरिक पांढरे वस्त्र परिधान करतात. ही मंडळी तुंगभद्रा नदीच्या काठावर जमतात आणि होळी साजरी करतात.

विजयनगर राज्याच्या खुणा आजही या शहराच्या प्रत्येक भागात पहायला मिळतात. विजयनगर साम्राज्याचा सम्राट कृष्णदेवराया याने ही होळीची परंपरा सुरु केल्याची माहिती आहे. तेव्हापासून हंपीमध्ये ही होळी (Holi) साजरी होत आहे. आजही हंपीमध्ये दोन दिवस होळी साजरी होते. यावेळी होलिकेच्या पुतळ्याचे दहन करण्यात येते. त्यानंतर दुस-या दिवशी हंपीच्या रस्त्यांवर रंगाचा उत्सव करण्यात येतो.

होळीसाठी येथील मंदिरांचीही सजावट करण्यात येते. तसेच त्यावर आकर्षक अशी रोषणाई करण्यात येते. यादिवशी संपूर्ण हंपी शहरच रस्तावर असल्याचा भास होतो. संपूर्ण शहरात ढोलताशे वाजवत हंपीचे नागरिक नाचत होळीचे रंग खेळतात. हंपीमधील पुरातन मंदिरे बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात परदेशी नागरिक येतात. तसेच येथे चित्रकारही मोठ्या संख्येनं येतात. हीच कलाकार मंडळी हंपीमधील या रंगोत्सवालाही हजेरी लावतात.

=========

हे देखील पहा : पर्यटकांची पसंती : हिल स्टेशनची राणी

=========

मध्यप्रदेशमधील इंदौर शहरातही मोठ्या प्रमाणात होळी साजरी होते. गेली अनेक वर्ष इंदौरला स्वच्छ शहराचा बहुमान मिळत आहे. याच स्वच्छ शहरात होळीची (Holi) भव्य अशी मिरवणूक काढली जाते. या मिरवणुकीमध्ये अवघे शहर सामिल होते. त्यामुळेच इंदौरची रंगपंचमी जगप्रसिद्ध आहे. यावेळी मोठ्या संख्येनं पर्यटक या शहरात दाखल होतात. या होळीला देवांची होळी असेही म्हणतात. होलीका दहन झाल्यावर पाच दिवसांनी येणा-या रंगपंचमीला येथे मोठी मिरवणूक निघते. राजस्थानच्या पुष्करमधील होळीलाही मोठ्यासंख्येनं पर्यटक हजेरी लावतात. पुष्कर येथील मेळा जसा जगप्रसिद्ध आहे, तशीच तेथील होळीही प्रसिद्ध आहे. या होळीच्या सणासाठी येथे आठवडाभर पर्यटकांची गर्दी असते.

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.