Home » उत्तराखंड रंगले फुलदेईच्या रंगात

उत्तराखंड रंगले फुलदेईच्या रंगात

by Team Gajawaja
0 comment
Uttarakhand
Share

गेल्या काही वर्षापासून उत्तराखंड ही पर्यटनाची राजधानी म्हणून पुढे येत आहे. उत्तराखंडही देवभूमी म्हणून ओळखली जाते, त्यामुळे या राज्यात धार्मिक पर्यटन वाढले आहे. त्यातच येथील निसर्गही पर्यटकांना भुरळ घालत आहे. शिवाय उत्तराखंडमधील अनेक सणही अशापद्धतीनं साजरे केले जातात की, त्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक उत्तराखंडला जातात. तसाच एक सण म्हणजे, फुलदेई उत्सव. अर्थात फ्लॉवर उत्सव. (Uttarakhand)

या महिन्यापासून उत्तराखंडमध्ये फुलांची बहार येऊ लागते. येथील डोंगरद-या विविधरंगाच्या फुलांनी भरुन जातात. याच फुलांचा बहर फुलदेई नावाच्या सणांनी साजरा केला जातो. 14 मार्चपासून चैत्र महिन्याच्या संक्रांतीची सुरुवात झाली. गढवाल-कुमाऊंमध्ये या चैत्र महिन्याच्या संक्रातीला हा फुलदेई सण साजरा करतात. लहान मुलांचा हा सण असून त्यामध्ये लहानमुले घरोघरी जाऊन उंबरठ्यावर फुले पसरवतात. तसेच घरामध्येही तांदूळ आणि फुले टाकतात. यामुळे घरात समृद्धी येते असे मानले जाते. सोबत स्थानिक गितेही गायली जातात. गेल्या काही वर्षापासून या सणालाही पर्यटनासोबत जोडल्यानं यावेळी उत्तराखंडमध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटन वाढले आहे.  

उत्तराखंड हे नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखले जाते. इथली प्रत्येक गोष्ट निसर्गाशी जोडलेली आहे. तसेच येथील सणही निसर्गाबरोबर साजरे होतात.  तसाच एक उत्सव म्हणून फुलदेई उत्सव आहे. चैत्र महन्यापासून या परिसरात अनेकविध फुले फुलायला लागतात. त्यांचे महत्त्व समजून घेण्यासाठी, आणि पुढच्या पिढीपर्यंत हा वारसा जाण्यासाठी फुलदेई उत्सव साजरा होतो.  यावेळी मुलं आपल्या हातांनी परिसरातील फुले तोडतात.  त्यांचा सुंगध आणि त्यांची उपयोगीता जाणून घेतात. त्यानंतर आपापल्या घरांची सुंदर सजावट करून हा सण साजरा करतात.(Uttarakhand)

दरवर्षी चैत्र महिन्याच्या संक्रांतीपासून फुलदेई साजरा होतो. रुद्रप्रयागच्या ग्रामीण भागातील मुले याची आतूरपणे वाट बघत असतात.  पहाटेपासून या महोत्सवाला सुरुवात होते.  पहाटे मठ, मंदिरे आणि घरांची सजावट करण्यात येते.  वसंत ऋतुची गाणी गात मग लहान मुले गावांमध्ये फिरतात.  आठ दिवस हे या मुलांचे असतात.  वसंत ऋतूच्या आगमनाची ही सूचना मानली जाते. घराच्या दारावर फुले ठेवण्याच्या बदल्यात, मुलांना परंपरेनुसार राजगि-यापासून बनवलेले गोड पदार्थ देण्यात येतात.  

आठव्या दिवशी सर्व घरातील खाद्यपदार्थ आणि पूजा साहित्य गोळा करून लहान मुले सामूहिक मेजवानी तयार करतात. यानंतर घोघा देवतेची पूजा करून अन्न अर्पण केल्यावरच मुले स्वतःच अन्न सेवन करतात.  यामुळे लहानपणापासून मुलांमध्ये एकीची भावना जोपासली जाते.  त्यांचे नाते भक्कम होते.  उत्तराखंड सारख्या भागात निसर्ग सुंदर असला तरी त्याचे विक्राळरुपही येथे दिसते.  अशा प्रसंगी आपल्या गावातील नागरिकांची साथ गरजेची असते.  त्यामुळेच त्यांच्यातील नाते घट्ट असावे असे सांगितले जाते.  फुलदेई सारख्या उत्सवातून बालवयापासूनच मुलांमधील नाते घट्ट केले जाते.  

फुलदेई उत्सवात घोघा देवतेला महत्त्व असते.  यासाठी आपल्या भागातील पर्वतावरील दगड मुले आणतात आणि त्याची पूजा करतात.  त्यामागेही निसर्गाबरोबर जोडण्याचा संदेश आहे.  या उत्सवाची सुरुवात उत्तराखंडचे मुख्यमंत्री धामी यांच्या घरापासून झाली.  गेल्या वर्षापासून उत्तराखंडमध्ये हा फुलदेई उत्सव बालोत्सव म्हणून साजरा करायला सुरुवात केली आहे.  (Uttarakhand)

यासणाचे वाढते महत्त्व आणि त्याचे पर्यटनाच्या दृष्टीने वाढलेले महत्त्व लक्षात घेता, राज्यसरकारनं खास समिती तयार केली आहे.  उत्तराखंडच्या डोंगराळ भागात अद्यापही सौर दिनदर्शिका वापरली जाते. त्यामुळे या भागात हिंदू नववर्षाचा पहिला दिवस मीन संक्रांतीपासून म्हणजेच फुल देईपासून सुरू होतो.  त्याचे स्वागतही या निमित्तानं करण्यात येते.  चैत्र महिन्यात वसंत ऋतूचे आगमन होते. नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी घरातील लहान मुलांना पारंपारिक वेष घातले जातात.  त्यांना स्थानिक गाणी शिकवली जातात. (Uttarakhand)

===========

हे देखील वाचा : होळीवेळी अत्याधिक फूड्सच्या सेवनाने पोट बिघडल्यास करा हे उपाय

===========

त्यातून संस्कृती आणि भाषा या दोघांचेही संवर्धन होत आहे.  याशिवाय या भागातील गृहिणी घराचे अंगण सजवतात.  दाराच्या चौकटीवर शेणाच्या मातीचे लेपण केले जाते.  स्थानिक पेहराव यावेळी आवर्जून घातला जातोच.  शिवाय हलवा, छोई, शाई हे पदार्थ बनवले जातात. कुमाऊच्या भोटांतिक भागात तांदळाचे पीठ आणि गुळापासून साया नावाचा खास पदार्थ बनवला जातो.  अलिकडे वाढलेल्या पर्यटनामुळे पर्यटकांनाही या स्थानिक पदार्थांचे महत्त्व सांगण्यात येते.  

सई बने

 


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.