Home » पर्यटकांची पसंती : हिल स्टेशनची राणी

पर्यटकांची पसंती : हिल स्टेशनची राणी

by Team Gajawaja
0 comment
Mussoorie: Hill station
Share

उत्तराखंड राज्यात असलेल्या पर्यटन स्थळामध्ये सर्वाधिक गर्दी जेथे असते, ते मसुरी (Mussoorie: Hill station) शहर यावर्षीही पर्यटकांनी भरुन गेले आहे. मसुरीचे हवामान, तेथील पर्यटन स्थळे आणि पर्यटकांना मिळणा-या सुविधा यामुळे मसुरीमध्ये मे महिन्यासाठीही मोठ्या प्रमाणात बुकींग झाली आहे. यामुळे स्थानिक व्यापारांमध्ये आनंद व्यक्त करण्यात येत आहे. उत्तराखंडच्या कुशीत वसलेल्या या अतिशय सुंदर शहराला डोंगरांची राणी असेही म्हणतात. देशाच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक येथे येतात. आता मसुरीमध्ये दळणवळणाची साधने वाढली असल्यानं पर्यटक पहिली पसंती  या स्थानाला देत आहेत.

मसुरी (Mussoorie: Hill station) हे अतिशय सुंदर हिल स्टेशन असून हिवाळा आणि उन्हाळा अशा दोन्ही ऋतूंमध्ये पर्यटकांची गर्दी असते. या दोन्ही ऋतुमध्ये हिमवर्षावाचा आनंद पर्यटकांना मिळतो. याशिवाय अलिकडील काही वर्षात पावसाळ्यातही येथे पर्यटक येत असून इथल्या समृद्ध निसर्गाची माहिती करुन घेत आहेत. मसुरीमध्ये घनदाट जंगले, पर्वत, नद्या, धबधबे आणि दऱ्या पाहता येतात. साहसप्रेमी पर्यटकांसाठी हे हिल स्टेशन योग्य आहे. मसुरी हे हिल स्टेशन ट्रेकिंग आणि हायकिंगसाठी सर्वोत्तम मानले जाते. पर्यटक येथे रॉक क्लाइंबिंग करू शकतात. या शहराला निसर्गाचे मोठे वरदान आहे. चहूबाजुनं असलेल्या वनराईमुळे पक्षीही येथे मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळेच वाईल्ड फोटोग्राफी करण्यासाठी अनेकजण मसुरीला पसंत करत आहेत. अलिकडे वाढत असलेल्या प्रीवेडींग फोटोग्राफीसाठीही अनेकजण मसुरीला पसंती देत आहेत. हा नवीन ट्रेंड वाढल्यानं मसुरीतही अशा प्रीवेडींसाठी विशेष सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.

डेहराडून आणि मसूरीच्या रस्त्यांच्या मध्ये असलेला केम्पटी फॉल्स हा धबधबा, तिबेटी बौद्ध मंदिर, हॅपी व्हॅली आदी पहाण्यासाठी पर्यटकांची गर्दी होते.
कॅमल्स बॅक रोड मधून हिमालयातील शिखरे जवळून पाहण्याची संधी मिळते. त्यासाठी येथे विशिष्ट दुर्बिण लावण्यात आल्या आहेत. बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्री, चौखंबा, नंदादेवी ही शिखरे या कॅमल्स बॅक रोडमधून पहाता येतात. लाल टिब्बा हे मसुरीचे (Mussoorie: Hill station) सर्वात उंच ठिकाण आहे. 2275 मीटर उंचीवर असलेल्या लाल टिब्बा मधून सूर्योदय आणि सूर्यास्ताची सुंदर दृश्ये पाहता येतात.

मसुरीच्या (Mussoorie: Hill station) लायब्ररी बस स्टँडपासून काही अंतरावर मॉल रोड हे मसुरीतील मुख्य शॉपिंग क्षेत्र आहे. या ठिकाणी पर्यटकांची सर्वाधिक गर्दी असते. आसपासमधील स्थानिक कलाकारांनी बनवलेल्या कलाकुसरीच्या वस्तू येथे विक्रीस येतात. हा मॉल रोड ब्रिटीश स्थायिकांनी बांधला होता. त्यामुळे तेथे आजही ब्रिटीश राजवटीच्या खुणा दिसतात. मसुरीला जाणा-या पर्यटकांमध्ये अजून एका गोष्टीबाबत कुतूहल असते, ते म्हणजे, जॉर्ज एव्हरेस्ट हाऊस. हे जॉर्ज एवरेस्ट हाईस पार्क इस्टेट म्हणूनही ओळखले जाते. ही एक हेरिटेज इमारत आहे. जॉर्ज हाऊस हे मसुरीतील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक आहे. 1832 मध्ये बांधलेले हे घर सर जॉर्ज एव्हरेस्टचे होते. या घराच्या एका बाजूला दून व्हॅलीचे विहंगम दृश्य आणि दुसरीकडे आगलार नदीचे खोरे आणि समोर बर्फाच्छादित हिमालय पर्वतरांगा आहेत. त्यामुळे या भागात शुटींग करण्यासाठीही मोठी गर्दी असते. क्राइस्ट चर्च हे मसुरी येथील एक प्राचीन चर्च आहे. 1836 मध्ये बांधले गेलेले हे चर्चा आणि हिमालय पर्वतरांगांमधील सर्वात जुने चर्च असल्याचे सांगितले जाते. या चर्चमध्ये गॉथिक शैलीचा अविष्कार बघायला मिळतो. याशिवाय मसुरीतील कंपनी गार्डनही लोकप्रिय आहे. या उद्यानाची देखभाल मसुरीच्या गार्डन वेल्फेअर असोसिएशन तर्फे करण्यात येते. याला मसूरीचे बोटॅनिकल गार्डन म्हणूनही ओळखले जाते.

मॉसी फॉल्स हा मसुरीमधील (Mussoorie: Hill station) आणखी एक चांगला पॉईंट आहे. आजुबाजुला असलेल्या पर्वत रांगा आणि कोसळणारा धबधबा यामुळे येथे बरीच हिरवळ आहे. तसेच पक्षांचीही मोठी गर्दी येथे असते. धबधब्यासमोर एक शिवमंदिर आहे. या मंदिरालाही पर्यटक भेट देतात. ज्यांना ट्रेकींग करण्याची आवड आहे, ती मंडळी या धबधब्याला हमखास भेट देतात. क्लाउड्स एंड हा मसुरी शहराचा शेवटचा पण सर्वात विहंगम असा पॉईंट आहे. ही संपूर्ण जागा दाट पाइन आणि देवदाराच्या वृक्षांनी वेढलेली आहे. येथून सुर्यास्त बघण्यासाठी मोठी गर्दी होते. मसुरीमध्ये आता पर्यटक याच सर्व ठिकाणी गर्दी करत आहेत.

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.