Home » ही बेरिल आहे तरी कोण….

ही बेरिल आहे तरी कोण….

by Team Gajawaja
0 comment
Baryl Vanneihsangi
Share

अगदी काही लाखात लोकसंख्या असलेल्या भारताच्या उत्तर-पूर्व मधील मिझोराम राज्यातील निवडणुकाही गेल्या आठवड्यात पार पडल्या.  या निवडणुकांचा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला.  यापूर्वी भारतातील राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा या राज्यातील विधानसभेच्या निवडणुकांचा निकाल जाहीर झाला होता. (Baryl Vanneihsangi)

वास्तविक या पाचही राज्यातील मतमोजणी एकाच दिवशी होणार होती.  पण आदल्या दिवशी मिझोराममधील निवडणुकीचा निकाल एक दिवस उशिरा लागण्यात येईल, अशी घोषणा निवडणूक आयोगानं केली. अर्थात देशातील ईशान्य राज्य वगळता या राज्यातील निकालाची उत्सुकता कोणालाही नव्हती. अन्य चार राज्यातील निवडणुकीच्या निकालाखाली मिझोरामचा निकाल एक दिवस उशिरा जाहीर झाला तरी त्याच्यावर फारसे कोणीही लक्ष दिले नाही.

Baryl Vanneihsangi

मात्र या निकालात एका व्यक्तीचे नाव पुढे आले, आणि अवघ्या सोशल मिडियावर एकच शोध मोहीम सुरु झाली.  ते नाव आहे बेरिल वान्नेहसांगी.  बेरिल वान्नेहसांगी ही 32 वर्षीय महिला आमदार झाल्याची बातमी मिळाली आणि बेरिल यांच्या नावाची शोधाशोध सुरु झाली.   गायिका, आरजे असणा-या बेरिल यांच्यासंदर्भात आणखी काही मिळते ते पाहण्यासाठी सध्या सोशल मिडियावर मोठी शोध मोहीमच सुरु झाली आहे.  बेरिल या मिझोरामच्या विधानसभेतील सर्वात तरुण आमदार असणार आहेत.  (Baryl Vanneihsangi)

नुकत्याच झालेल्या निवडणुकीत लालदुहोमा यांच्या पक्षाने बाजी मारली. मिझोराम विधानसभा निवडणुकीत 40 जागांपैकी तीन जागांवर महिला उमेदवार विजयी झाल्या आहेत.  त्यातील बेरिल या एक उमेदवार आहेत.   बेरिल एक आरजे आणि टीव्ही अँकर म्हणून प्रसिद्ध आहेत.  बेरिल विजयी झाल्याची बातमी आली आणि सर्वत्र त्यांच्याच नावाच्या घोषणा सुरु झाल्या.

कारण बेरिल निवडणुकीला उभ्या राहिल्या, तेव्हापासून त्यांच्यावर अनेकांनी टीका केली आहे.  मुळात त्यांनी विधानसभेसाठी तिकीट मागितल्यावरही अनेकांनी त्यांची मस्करी केली. ती विधानसभा आहे, टिव्ही शो नाही, अशा शब्दात बेरिल यांची खिल्ली उडवण्यात आली.  मात्र बेरील ठाम राहिल्या.  त्यांना तिकिट मिळाले,  त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न करुन मतदारांपर्यंत आपले विचार पोहचवले.  विशेषतः महिलांपर्यंत आपले विचार पोहचवण्यात त्या यशस्वी झाल्या.  परिणामी बेरिल वान्नेहसांगी या मिझोराम विधानसभेच्या सर्वात तरुण महिला आमदार ठरल्या आहेत.  (Baryl Vanneihsangi)

मिझोराम हे भारताचे उत्तर-पूर्व राज्य आहे. काही लाख लोकसंख्या असलेल्या  मिझोरममध्ये साक्षरता दर 91 टक्क्याच्या वर आहे.  आयझॉल हे राजधानी स्थळ असलेल्या मिझोराममध्ये 4 डिसेंबर, 2023 रोजी निवडणुकीचे निकाल जाहीर झाले.  त्यात बेरिल वन्नेहसांगी या एकूण 9,370 मतांसह विजय झाल्या.  

बेरिल वान्नेहसांगी यांनी आपल्या करिअरला आरजे म्हणून सुरुवात केली.  त्यानंतर त्या राजकारणात उतरल्या.  आयझॉल महानगरपालिकेची निवडणूक त्यांनी लढवली आणि त्या नगरसेविका म्हणून निवडून आल्या.  बेरिल वानेहसांगी यांनी नॉर्थ ईस्टर्न हिल युनिव्हर्सिटी, शिलाँग येथून पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्याच्या वडिलांचे नाव वानरोचुआंग आहे.  अविवाहित असलेल्या बेरिल यांच्यावर सुरुवातील अनेकांनी टीका केली.  सोशल मीडियावर तर त्यांच्याबदद्ल ट्रेंड चालवण्यात आला आणि त्यांची खिल्ली उडवण्यात आली.(Baryl Vanneihsangi)

पण या सर्वात बेरिल यांनी आपल्या महिला मतदारांकडे लक्ष केंद्रीत केले आणि यश मिळवले. मिझोराममध्ये अद्यापही पुरुषसत्ताक समाजव्यवस्था आहे.  महिलांना त्यांचे अधिकार वापरता येत नाही.  अशा महिलांसाठी आपण आधार होणार आहोत.  महिलांना घराच्या चौकडीतून बाहेर काढून त्यांचे स्वतंत्र अस्तित्व असल्याची जाणीव करुन देईन, या बेरिल यांच्या आश्वासनाला महिलांनी पाठिंबा दिला.  

============

हे देखील वाचा : जॉन अब्राहमची ‘ही’ चुक ठरली बिपाशासोबतच्या ब्रेकअपचे कारण

===========

यावेळी एकूण 16 महिलांनी मिझोराममध्ये विधानसभा निवडणूक लढवली लालरामडिंगघेटी आणि लालरुआतफेली हल्वांडो यांनी प्रत्येकी दोन जागा अपक्ष म्हणून लढल्या.  प्रोवा चकमा, लालरिनपुई आणि बॅरिल व्हॅनीहसांगी या तिन महिला आता विधानसभेत महिलांचे प्रतिनिधीत्वही करणार आहेत.  आत्तापर्यंत मिझोरामच्या विधानसभेत असणारा हा महिला आमदारांचा सर्वाधिक आकडा आहे.(Baryl Vanneihsangi)

बॅरिल यांनी मिझोरामधील महिलांसाठी हा एक अभिमानाचा क्षण असल्याचे सांगितले.  पण यासोबत ज्यांनी आम्हाला व्यवस्था बदलण्याची संधी दिली अशांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.  आपल्या टिकाकारांकडे दुर्लक्ष करीत विधानसभा जिंकणा-या बेरिल त्यांच्या याच आत्मविश्वासामुळे चर्चेत आहेत.  

सई बने

 


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.