Home » राणी सीतेच्या माहेराची लगबग

राणी सीतेच्या माहेराची लगबग

by Team Gajawaja
0 comment
Mother Sita
Share

आता अवघी अयोध्या नगरी ही राममय झाली आहे.  अयोध्येसोबतच सर्व देशभरातही 22 जानेवारी या तारखेची प्रतीक्षा केली जात आहे.  त्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात येत असून प्रभू रामांच्या भव्य मंदिराचे लोकार्पण कशा भव्यदिव्य सोहळ्यात होणार आहे, याची प्रतीक्षा लागली आहे.  अयोध्येमध्ये जशी राममंदिराच्या लोकार्पण सोहळ्याची लगबग अंतीम टप्यात आली आहे, तशीच एक नगरीही या सोहळ्यासाठी नवरीसारखी सजली आहे. 

ही नगरी म्हणजे, माता सितेचे माहेर म्हणून ओळख असलेली जनकपूर नगरी.  नेपाळमधील जनकपूरला माता सीतेचे माहेर म्हणून ओळखले जाते.  या जनकपूरमध्येही राममंदिर सोहळ्यासाठी विशेष तयारी करण्यात येत आहे.  जनकपूरमधून राणी सीतेसाठी 22 जानेवारी रोजी विशेष भेटवस्तूही पाठवण्यात येणार आहेत.  

फक्त अयोध्या नगरीच नाही तर संपूर्ण भारत आणि प्रभू रामांचे भक्त आहेत, तो प्रत्येक देश  22 जानेवारी 2024 या तारखेची वाट बघत आहे.  याच दिवशी मर्यादा पुरुषोत्तम राम,  माता सीतेसह आपल्या भव्य मंदिरात विराजमान होणार आहेत.  अयोध्येतील या भव्य राममंदिराचा एक टप्पा या दिवशी भक्तांसाठी खुला होणार आहे.  या दिवसासाठी आता अवघ्या अयोध्या नगरीत विविध विकासकामे सुरु आहेत.  अयोध्येत ही लगबग सुरु असतांना माता सीतेचे माहेर असलेल्या नेपाळमधील जनकपूर येथेही लगबग उडाली आहे. 

माता सीतेंसाठी 22 जानेवारीला माहेराहून विशेष भेटवस्तू पाठवण्यात येणार आहेत.  या भेटवस्तू तयार करण्याची घाई आता या जनकपूरीमध्ये चालू आहे.  राममंदिराच्या लोकार्पण सोहळ्यात अनेक आमंत्रित उपस्थित राहणार आहेत.  त्यामध्ये जनकपूरचे आमंत्रितही असणार आहेत.  देवी सीतेच्या माहेरच्या या खास माणसांचे विशेष स्वागत करण्यात येणार आहे.  जनकपूरीहून येणारे हे विशेष आमंत्रित 3 जानेवारीला नेपाळमधून निघणार आहेत.  6 जानेवारीला ही मंडळी अयोध्येत दाखल होणार आहेत.  याच दिवशी श्री रामजन्मभूमी ट्रस्टच्या सदस्यांच्या हातात, त्यांनी आणलेली देवी सीता यांची भेटवस्तू देण्यात येणार आहे.  

प्रभू राम यांच्या सासरहून जवळपास 500 नागरिक अयोध्येत दाखल होणार आहेत. विशेष म्हणजे ज्या मार्गाने प्रभू राम जनकपूरहून अयोध्येला पोहोचले होते, त्याच मार्गाने हे जनकपूरचे नागरिक 3 जानेवारीला निघणार आहेत. जंगलातून त्यांचा मार्ग आहे. 4 जानेवारीला ही जनकपूरची मंडळी नेपाळच्या चंद्रपूर जिल्ह्यातून भारतात दाखल होतील. त्यानंतर सुगौली, बेतियामार्गे गोपालगंज, कुशीनगर, गोरखपूर मार्गे 5 जानेवारीला सायंकाळी हे सर्व अयोध्येत दाखल होतील.  6 जानेवारीला हे सर्व माता सीतेसाठी आणलेल्या खास वस्तू श्री रामजन्मभूमी ट्रस्टला सुपूर्द करणार आहेत.  

जनकपूरमधून माता सीतेसाठी कुठल्या खास वस्तू आहेत, याची उत्सुकता आहे.  जनकपूरच्या परंपरेनुसार या भेटवस्तू आहेत.  जनकपूरमध्ये जेव्हा मुलगी तिच्या नवीन घरात प्रवेश करते, तेव्हा तिचे आई वडील तिला घर बास भेट देतात. यात श्री राम आणि माता सीतेसाठी कपडे, दागिने, फळे आणि सुका मेवा असणार आहे.  17 डिसेंबर रोजी होणाऱ्या विवाह पंचमी मुहूर्तावर या सगळ्या वस्तूंचे पॅकींग करण्यात येणार आहे.  

प्रभू राम आणि माता सीतेसाठी येणारे हे कपडेही खास पद्धतीनं तयार करण्यात येत आहेत.  हा पोशाख 1100 लाल रंगाच्या कापडाच्या तुकड्यांनी तयार करण्यात आला आहे.  त्याच्यावर पिवळ्या रंगाची वेलबुट्टी असून त्याल सोनेरी रंगाची बुटीही काढण्यात आली आहे.  यात माता सीतेसाठी खास पिवळ्या रंगाचा पोशाखही पाठवण्यात येणार आहे.  त्यासोबत लाल चुनरी, देवीच्या केसांसाठी विशेष दागिने यांचाही समावेश आहे.  याशिवाय देवी सीतेसाठी 10 किलो सुका मेवा, 20 किलो मिठाई आणि देवाला आवडणारा मालपुआ पाठवण्यात येणार आहे.

=============

हे देखील वाचा : रेल्वे स्थानकाच्या नावामागे ‘रोड’ शब्द लावण्यामागे ‘हे’ आहे कारण

=============

याशिवाय हंगामी फळांनी भरलेल्या 100 हून अधिक पेट्या भरल्या जाणार आहेत.  जनकपूर हे नेपाळचा एक भाग असलेल्या बिहारच्या दरभंगा जिल्ह्यापासून 40 किमी अंतरावर आहे. वाल्मिकी रामायणानुसार माता सीतेचा जन्म जनकपूरमध्येच झाला होता.  येथेच राजा जनक त्यांना शेतात नांगरणी करताना माता सीता बाळ रुपात सापडली होती.  1816 पूर्वी हा दरभंगा भारताचा भाग होता. मात्र 1816 मध्ये सुगौलीच्या तहानंतर ब्रिटिशांनी जनकपूर नेपाळच्या ताब्यात दिले.  याच जनकपूरमध्ये माता सितेचा भव्य असा महल आहे.  राजा जनक यांच्या या महलात माता सीतेचे बालपण गेल्याचे सांगितले जाते.  याच माता सीतेच्या माहेराहून आता त्यांच्यासाठी खास पोशाख, दागिने आणि खाऊ येत आहे.  

सई बने.  

 

 

 


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.