Home » भारत – आफ्रिका कसोटी मालिका: या ४ कारणांमुळे झाली भारताची हार!

भारत – आफ्रिका कसोटी मालिका: या ४ कारणांमुळे झाली भारताची हार!

by Team Gajawaja
0 comment
भारत - आफ्रिका कसोटी मालिका
Share

भारत – आफ्रिका कसोटी मालिका क्रिकेटप्रेमींसाठी निराशाजनक ठरली. काल भारताने तिसऱ्या कसोटीबरोबरच आफ्रिकेविरुद्धची मालिकाही गमावली. पहिल्या कसोटीत विजय मिळाल्यावर पुढच्या दोन्ही कसोटी मॅचेस भारताने गमावल्याने २००६ च्या दौऱ्याची पुनरावृत्ती झाली. त्यावेळी राहुल द्रविड भारताचा कप्तान होता, तर यावेळी तो संघाचा प्रमुख प्रशिक्षक आहे.

खरं म्हणजे, यावेळी भारताला मालिका विजयाची सुवर्णसंधी होती. आफ्रिकेचे हाशिम आमला, डेल स्टेन, मोर्नी मॉर्केल, वेन फिलँडर, फाफ डू प्लेसिस यासारख्या दिग्गज खेळाडूंनी निवृत्ती पत्करल्याने तो संघ कमकुवत आणि अननुभवी होता. कप्तान डीन एल्गर, टेम्बा बाऊमा, कागिसो रबाडा, केशव महाराज आणि मार्करम हेच काय ते अनुभवी खेळाडू होते. त्याउलट भारताची स्थिती होती.

चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य राहणे आणि अश्विन यांना प्रत्येकी ८० पेक्षा जास्त कसोटी सामन्यांचा अनुभव होता. चेतेश्वरचा हा आफ्रिकेचा चौथा दौरा होता, तर विराट, अजिंक्य आणि अश्विन यांचा हा तिसरा दौरा होता. या खेळाडूंना आफ्रिकेतील खेळपट्ट्या व वातावरण यांचा पुरेसा अनुभव होता. अशा परिस्थितीतही भारत मालिका जिंकू शकला नाही, याचा विषाद वाटतो.

Kfacts भारत - आफ्रिका कसोटी मालिका  India vs South Africa,

आता पराभवाच्या कारणांची मीमांसा होईल आणि थातुरमातुर कारणे दिली जातील. भारत – आफ्रिका कसोटी मालिका भारताने का गमावली? पराभवाच्या कारणांचा थोडक्यात परामर्श –

१. बेभरवशी फलंदाजी

पाच गोलंदाज खेळवण्याचे धोरण ठरल्यावर वरच्या क्रमांकावर खेळणाऱ्या पाच फलंदाजांवर चांगली धावसंख्या उभारण्याची जबाबदारी होती. पण पहिल्या कसोटीचा अपवाद वगळता उर्वरित दोन्ही सामन्यात आपले वरिष्ठ फलंदाज ढेपाळले. 

सगळ्यात चिंतेची गोष्ट म्हणजे सर्वजण एकाच पद्धतीने बाद होत होते. विराट तर चारही डावात सहाव्या स्टंपवरील चेंडूला बॅट लावून बाद झाला. त्याची बॅट जणू लोहचुंबकाप्रमाणे चेंडूकडे खेचली जात होती. राहुल आणि मयांक स्लिपमध्येच झेल देत होते. पुजाराच्या उणीवांचा आफ्रिकन गोलंदाजांनी पुरेपूर फायदा उठवला आणि त्याला त्यांनी स्थिरावूच दिले नाही. राहणे कधीच विश्वासार्ह वाटत नव्हता आणि दोन डाव सोडले, तर तो केवळ हजेरी लावून परतत होता. 

पंत, शेवटच्या डावातील शतकाचा अपवाद सोडता, कधीच परिस्थितीनुरूप खेळला नाही. तळाच्या फलंदाजांचे या मालिकेतील योगदान अगदी नगण्य होते. तिसऱ्या सामन्यात दुसऱ्या डावात पंतला साथ देण्याची गरज असताना अश्विन, शार्दूल, बुमराह व शमी यांनी बेजबाबदार फटके मारले .

Kfacts भारत - आफ्रिका कसोटी मालिका

. सुस्त क्षेत्ररक्षण –

आपले क्षेत्ररक्षण चपळ नव्हते. जिथे एकच धाव शक्य होती तिथे आपण दोन धावा बहाल करत होतो. सीमारेषेवर चेंडू अडवल्यावर झटकन तो मैदानात ढकलणे जरूर असताना मयांक अगरवालने किमान दोन वेळा तरी चेंडू हातातच ठेवला आणि त्याचा पाय सीमारेषेला लागल्याने आफ्रिकेला चौकार मिळाले. सिराजचा मैदानातील वावर व क्षेत्ररक्षण म्हणजे अक्षरशः विदूषकगिरी होती.

३. सातत्यहीन गोलंदाजी –

शमी व बुमराह तसेच शार्दूल ठाकूर यांनी गोलंदाजी चांगली केली, पण त्यांना सिराज व उमेश यादव यांच्याकडून योग्य साथ लाभली नाही. आपल्याकडे मोक्याच्या वेळी धावा रोखून धरणारा गोलंदाज नव्हता. 

अश्विनने ऑफस्पिन मारा करण्याऐवजी विविध प्रयोग केले आणि तो उसळत्या खेळपट्ट्यांवर निष्प्रभ ठरला. बरेच वेळा ऑफ स्टंप पकडून गोलंदाजी न करता लेग स्टंप वर मारा करून जादा धावा दिल्या गेल्या. म्हणूनच दुसऱ्या व तिसऱ्या कसोटीत चौथ्या डावात आपली गोलंदाजी परिणामकारक ठरली नाही. आफ्रिकन गोलंदाजांनी उसळत्या चेंडूंचा चतुराईने वापर केला. तसेच टप्पा सतत ऑफ स्टंपच्या आसपास ठेवून भारतीय फलंदाजांना चुका करण्यास भाग पाडले.

Ravichandran Ashwin is a fighter, talk about his SENA performances tad bit  unfair: Dinesh Karthik - Sports News

४. नियोजन व नेतृत्व

नेहमीप्रमाणेच कोहली नियोजनात कमी पडला.पीटरसन व बौमाला लवकर बाद करण्याचा ‘फॉर्मुला’ त्याला सापडला नाही. तिसऱ्या कसोटीत ढगाळ हवामानात त्याने प्रथम फलंदाजी का घेतली ते त्यालाच माहित. 

आता मायदेशात श्रीलंकेविरुद्ध दोन सामन्यांची छोटेखानी मालिका आहे. राहणे आता या संघात बसू शकत नाही हे नक्की. पुजाराला कदाचित अजून एक संधी दिली जाईल. पण हीच वेळ आहे, हनुमा विहारी, श्रेयस अय्यर याना संधी देण्याची.

हे ही वाचा: दी ॲशेस! तब्बल १३९ वर्षांपूर्वी सुरु झालेल्या ॲशेस मालिकेची रंजक कहाणी

एका जास्तीच्या रोटीमुळे कपिल देव बनला द्रुतगती गोलंदाज…

एकूणच वरील विवेचनामधून हे प्रतीत होते की, भारताचा संघ आफ्रिकेपेक्षा अधिक अनुभवी व समर्थ असताना देखील आपण भारत – आफ्रिका कसोटी मालिका विजयाची सुवर्णसंधी साधू शकलो नाही. यालाच म्हणतात ‘दैव देते नी कर्म नेते!

रघुनंदन भागवत


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.