Home » एका भटक्याची ‘साहित्यसंपदा’

एका भटक्याची ‘साहित्यसंपदा’

by Correspondent
0 comment
Gopal Nilkanth Dandekar | K Facts
Share

कधी बसल्याजागी गडकोटांची सैर घडवणारे तर कधी पडघवलीत आसरा देणारे ‘गोनिदां’ प्रत्येक भटक्याने वाचायलाच हवेत!

मराठी साहित्यातील ‘कलंदर फकीर’ म्हणून ओळखले जाणाऱ्या गोपाळ नीलकंठ दांडेकर (Gopal Nilkanth Dandekar) अर्थात गोनिदांचा आज स्मृतिदिन. भटकणं म्हणजेच जगणं हे तत्त्व त्यांनी आजन्म पाळलं. वयाच्या तेराव्या वर्षीच त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेण्यासाठी आपलं घर सोडलं. त्यानंतर गाडगेबाबांच्या सहवासात गोनीदा होते. ‘सोपे लिहिणे व बोलणे ही गाडगेबाबांची देणगी’ असं ते म्हणत. सह्याद्रीतील दऱ्याखोऱ्या, अनेक कडेकपारी, गड-किल्ले इत्यादी ठिकाणी जाऊन तेथील अनुभव, ऐतिहासिक महत्व त्यांनी आपल्या साहित्यांतून अधोरेखित केले आहे.

नर्मदेची पायी परिक्रमा केल्यांनतर त्यावेळचा अनुभव, तेव्हा भेटलेली माणसे, धार्मिक माहात्म्य, हे पुढे त्यांच्या लिखाणात वेळोवेळी उमटत गेलं. उत्कट शिवभक्तीचं उत्तम उदाहरण म्हणजे गोनीदा. मराठी भाषेवरील अमाप प्रेम, गडकिल्ल्यांविषयी आत्मीयता, इतिहासाची जाण अशा अनेक वैशिष्ट्यांमुळे त्यांनी साहित्यातील जवळजवळ सर्वच प्रांतात काम केले आहे. ‘मराठी मायबोलीला वाचवा. तुकाराम-ज्ञानेश्वरांची मराठी समजणारे वाचक झपाटयाने कमी होत चालले आहेत,’ अशी खंत ते नेहमी व्यक्त करीत. (Go.Ni.Dandekar Books)

Go.Ni.Dandekar
Go.Ni.Dandekar

आजच्या पिढीला गोनीदांच्या साहित्याची ओळख करून देणे, त्यांची पुस्तके वाचून त्यातील शिकवण आत्मसात करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.    

मोगरा फुलला’

विश्वात्मक झालेल्या देवमाणसांची कहाणी! ज्ञानदेवांचे वडील विट्ठलपंत यांच्या संन्यासी वृत्तीचे गोनीदांना खूप आकर्षण होते. ज्या माणसाचा पुत्र साक्षात ज्ञानेश्वर आहे, त्यात तेज:पुंज असे काही असणारच, या विचाराने त्यांनी ही कादंबरी लिहिली. त्यातील निम्मा भाग त्यांनी विट्ठलपंतांच्या जीवनातील संघर्षाचे, ताणतणावांचे चित्रण करण्यात खर्च केला आहे. या कादंबरीचे १९७७ मध्ये प्रथम गोनीदांनीच जाहीर वाचन केले होते. भावार्थदीपिकेच्या सौम्य-शांत, प्रसन्न-मनोहर, जीवनोद्धारक प्रकाशात तीन तपांहून अधिक काळ न्हाऊन निघालेल्या गो. नी. दांडेकरांच्या कविमनाने अरूपाचे रूप ‘दावण्या’चा ध्यास घेतला आणि मराठी कादंबरी-सृष्टीला, ‘मोगरा फुलला’च्या रूपाने एक नवलभेट दिली.

Mogara Phulala Book
Mogara Phulala Book

‘पवनाकाठचा धोंडी’

गोनीदांनी १९५५साली रेखाटलेल्या पवनाकाठच्या धोंडीचं, मराठी मनावरील अधिराज्य आजतागायत कायम आहे. १७२ पानांच्या या कादंबरीतील तशी सारीच पात्रं ही काळजाचा ठाव घेणारी. पण विचारांच्या प्रांगणात मात्र दीर्घकाळ रेंगाळत राहतो… तो धोंडीच! बदलत्या परिस्थितीच्या पुराबरोबर वाहत जायचे नाकारणाऱ्या एका झुंजार माणसाची ही कथा. या कादंबरीला केंद्र सरकारचा पुरस्कारदेखील मिळाला आहे.

Pawanakathacha Dhondi Book
Pawanakathacha Dhondi Book

‘मृण्मयी’

‘मृण्मयी’ केवळ शब्दकृत्य नव्हे तर एक आध्यात्मिक अनुभव! गोनीदांची ही सर्वात आवडती कादंबरी होती. मृण्मयी म्हणजे प्रयत्नपूर्वक समजून घ्यायचा विषय आहे. केवळ पानं उलटायचा ग्रंथ नव्हे. आजच्या जगात ‘ज्ञानेश्वरी’ जगू पाहणार्‍या एका विलक्षण जीवाची भावनोत्कट कहाणी गोनीदांनी आपल्या ‘मृण्मयी’ या कादंबरीत सांगितली आहे.

Mrunmayee Book
Mrunmayee Book

‘जैत रे जैत’

१९६५मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘जैत रे जैत’ या कादंबरीला वाचकांचा उदंड प्रतिसाद लाभला. नाग्या ठाकूर या कहाणीचा नायक व चिंधी ही नायिका. या दोघांचं भावंविश्व थेट कर्नाळ्यातल्या आदीवासींमध्ये राहून गोनीदांनी चितारलंय. १९७७ साली जब्बार पटेल यांनी याच कादंबरीवर आधारित चित्रपट प्रसिद्ध केला. जो आज मराठी चित्रपटसृष्टीत मैलाचा दगड ठरला आहे. 

Jait Re Jait Book
Jait Re Jait Book

‘माचीवरला बुधा’

बुधा नावाचा एक सामान्य पण तरीही एक विशिष्ट ध्यास घेतलेला वनवासी. त्याची ही कहाणी. माणूस आणि निसर्गात कसलेही द्वैत नाही; ही अद्वैताची भावना गो.नी. दांडेकर यांनी या कादंबरीत सांगितली आहे. मृत्यूविषयी त्यांच्या स्वत:च्या कल्पना होत्या. ‘माचीवरला बुधा’ हे एक माझ्या मरणाचे मी पाहिलेले स्वप्न आहे. जीवन संपायचे असेल तर ते बुधासारखे संपावे,’ असे गोनीदा म्हणाले होते. या कादंबरीवरून त्याच नावाचा एक मराठी चित्रपट देखील बनला आहे.

Machivarala Budha
Machivarala Budha

‘पडघवली’

‘पडघवली ही कादंबरी नव्हे; ते एका नष्ट होऊ घातलेल्या खेड्याचे शब्दाचित्र आहे. ‘पडघवली’पासून आपल्याला लेखनशैली सापडली’, असे गोनीदा म्हणत. त्यांनी संपूर्ण भारतभर भ्रमंती केली होती. खेड्यातील जीवन अगदी जवळून अनुभवल्याने, ढासळललेली प्राचीन समाजव्यवस्था त्यांच्या लक्षात आली होती. त्याच पडझडीचे चित्रण म्हणजे ‘पडघवली’. अर्थात पडझडीचं दर्शन घडवतांनाच, त्यावर उपाय शोधण्याचाही गोनीदांनी विचार केला आहे. जुन्याच्या जागी नवं काय निर्माण होईल याचा शोधही या कादंबरीत पहायला मिळतो. 

Padaghavli by G.N. Dandekar
Padaghavli by G.N. Dandekar

‘स्मरणगाथा’

अत्यंत रसाळ अशा शैलीत सांगितलेली आणि शेकडो नाट्यपूर्ण प्रसंगांनी नटलेली ही `स्मरणगाथा’ म्हणजे गोनीदांचं आत्मचरित्रात्मक लिखाण होय. स्मरणगाथेच्या सहाशे पानांतून या माणसाचे संपन्न व्यक्तिमत्त्व संपूर्णपणे फुलून आलेले आहे. दांडेकरांच्या आजवरच्या विपुल आणि गुणसंपन्न साहित्यात, त्याचप्रमाणे मराठी आत्मचरित्रात्मक वाङ्मयातही, `स्मरणगाथा’ हा एक संस्मरणीय मैलाचा दगड आहे. १९७६ मध्ये साहित्य अकादमीचा पुरस्कारदेखील या कादंबरीला मिळाला होता.

Smarangatha by G. N. Dandekar
Smarangatha by G. N. Dandekar

‘पूर्णामायेची लेकरं’

ही वऱ्हाडी बोलीतील गोनीदांची पहिली कादंबरी. तसं पाहिलं तर साहित्यातील प्रत्येक प्रांतात त्यांनी मुशाफिरी केली आहे. पण निव्वळ भाषासौंदर्य अनुभवण्यासाठी प्रत्येकाच्या संग्रही असावं, प्रत्येकानं वाचावं असं हे पुस्तक आहे.

Durg Bhraman Gatha G. N. Dandekar दुर्गभ्रमणगाथा गो. नी. दांडेकर
Durg Bhraman Gatha G. N. Dandekar दुर्गभ्रमणगाथा गो. नी. दांडेकर

‘दुर्गभ्रमणगाथा’

तब्ब्ल पाच तपे गडकिल्ल्यांच्या घेतलेल्या वेधाची, आयुष्याच्या सायंकाळी स्वस्थ बसून केलेली स्मरणे म्हणजे गोनीदांचे ‘दुर्गभ्रमणगाथा’ हे पुस्तक. अनेक इतिहासप्रेमींच्या अत्यंत आवडीचं असं हे पुस्तक आहे.

शब्दांकन: धनश्री गंधे


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.