Home » पुस्तकाच्या माध्यमातून लोकांच्या मनावर ताबा मिळवणारी लेखिका एलिना फरांते कोण आहे?

पुस्तकाच्या माध्यमातून लोकांच्या मनावर ताबा मिळवणारी लेखिका एलिना फरांते कोण आहे?

by Team Gajawaja
0 comment
Elena Ferrante
Share

मोजकी पुस्तकं, टाइम मासिकाच्या १०० सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत समावेश, ओटीटी प्लॅटफॉर्मपर्यंत पोहोचलेलं लिखाण आणि जगभरात पसरलेला प्रचंड चाहता वर्ग… आणि हे सगळं मिळवणारी व्यक्ती म्हणजे ‘एलिना फेरांते’! आजच्या जगात चर्चेत राहायचं असेल, लोकांपर्यंत पोहोचायचं असेल, तर सेल्फ- ब्रँडिंग किंवा सोशल मीडियाशिवाय पर्याय नाही असं म्हणणाऱ्यांनी जरा एलिना फेरांतेकडे पाहावं. एलिना गेल्या ३० वर्षांपासून सातत्याने लिखाण करत आहे, तिचे वाचक जगभरात पसरलेले आहेत, गेल्या काही वर्षांत तिच्या लिखाणावर आधारित सिनेमेही नेटफ्लिक्ससारख्या आघाडीच्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर आलेले आहेत, पण ती कशी दिसते, कुठे राहते, तिचं वय किती आहे, ती खरंच स्त्री आहे का, तिचं खरं नाव एलिनाच आहे की आणखी काही हे कोणालाच माहीत नाही, कारण एलिना आतापर्यंत कधीच कोणासमोर आलेली नाही. तिचं सगळं लिखाण अज्ञात राहूनच सुरू आहे.(Elena Ferrante)

तिला फक्त आणि फक्त तिच्या पुस्तकांमधूनच भेटता येतं. वाचक तिच्या लिखाणामधूनच ती कशी असेल याचा अंदाज लावत राहतात. अनेकांनी विशेषतः काही पत्रकारांनी एलिना खरंच कोण आहे याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण त्यापैकी कशालाही एलिना किंवा तिच्या प्रकाशकांनी दुजोरा दिलेला नाही. उलट तिच्या चाहत्यांनी खासगीपणा जपण्याचा एलिनाला अधिकार आहे अशी ठाम भूमिका घेत अशा शोधमोहिमांवर टीका केली.(Elena Ferrante)

फेरांते फीव्हर

एलिनाच्या लिखाणाची सुरुवात १९९२ मध्ये इटालियन भाषेत लिहिल्या गेलेल्या L’amore molesto या पुस्तकापासून झाली आणि पुढे त्याचा ट्रबलिंग लव्ह या नावाने इंग्रजीमध्ये अनुवाद झाला. पहिल्या पुस्तकापासूनच तिनं अज्ञात राहाणं पसंत केलं. पहिल्याच पुस्तकाचं वाचक आणि समीक्षकांनी भरपूर कौतुक केलं… त्यानंतर एलिनानं काय करावं, तर तिनं पुढची दहा वर्ष एक अक्षर प्रकाशित केलं नाही. थेट २००२ आणि २००६ मध्ये मिळून २ छोट्या कादंबऱ्या प्रकाशित केल्या. द डेज ऑफ अबँडनमेंट आणि द लॉस्ट डॉटर नावानं. आयुष्यातल्या कठीण आणि वेदनादायी क्षणांतून वाट काढणाऱ्या स्त्रिया या तिच्या दोन्ही कादंबऱ्यांचा समान धागा होता… दरम्यान सोशल मीडियाचं पेव फुटायला सुरुवात झाली होती, पण तरीही एलिनानं अज्ञात राहणं पसंत केलं. त्यापुढची तिच्या चार कादंबऱ्यांची मालिका नेपल्टिन नॉव्हेल्स म्हणून प्रसिद्ध आहे. युद्धानंतर इटलीतल्या नेपल्स इथं राहणाऱ्या दोन मुलींच्या आयुष्यावर आधारित या मालिकेनं तिला जागतिक स्टार बनली.(Elena Ferrante)

एलिना की अनिता?

२००३ मध्ये एलिनानं ला फ्रँटुमाग्लिया (La Frantumaglia) हा पत्रं, निबंध, मुलाखती आणि सहज स्फुरलेल्या लेखनाचा खंड प्रकाशित केला. त्याचं इंग्रजीत भाषांतर झाल्यानंतर एलिना नेमकी कोण आहे याहीपेक्षा कशी आहे याचा काहीसा उलगडा झाला. त्या पुस्तकांतून ती नेपल्समध्ये जन्मल्याचं समजलं. तिनं आईपण अनुभवलेलं असावं आणि ती सध्या विवाहित नाहीये असा अंदाजही त्यावरून बांधला गेला. त्या काळात तिच्याबद्दलची उत्सुकता खूप वाढली होती. म्हणून २०१६ मध्ये क्लादिओ गॅटी नावाच्या शोधपत्रकारानं स्थावर मालमत्तेचे व्यवहार आणि पुस्तकांच्या रॉयल्टीच्या आर्थिक व्यवहारांचा माग लावत एलिना फेरांते नेमकी कोण आहे याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यावरून लिहिलेल्या लेखात त्यानं एलिना ही प्रत्यक्षात अनिता राजा नावाची रोमस्थित भाषांतरकार असल्याचा दावा केला. तिची पार्श्वभूमी, कुटुंब याविषयी त्यानं बरंच काही लिहिलं. मात्र, सुजाण वाचकांनी अज्ञात राहू इच्छिणाऱ्या त्यांच्या लाडक्या लेखिकेची बाजू घेत क्लादिओवर सडकून टीका केली. त्याच्या लेखावर जगभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. एलिनाला जर आपली ओळख समोर आणायची नसेल, तर आपण तिच्या इच्छेचा सन्मान करायला हवा या म्हणण्यावर तिचे वाचक ठाम राहिले. एलिना किंवा तिच्या प्रकाशकांनीही त्यावर काहीच मत व्यक्त केलं नाही आणि त्यामुळे क्लादिओचे दावे सिद्ध झाले नाहीत.(Elena Ferrante)

====

हे देखील वाचा – चुकूनसुद्धा वाचू नका ही ३ रहस्यमयी पुस्तके, वाचाल जाल सैतानाच्या ताब्यात!

====

मला लिखाणात शोधा

एलिनाचं लिखाण अतिशय धाडसी, कसलीही तडजोड न करता लिहिलेलं असतं आणि अज्ञातवासामुळे ते जास्त सोपं होतं असं तिचे प्रकाशक आणि पत्नी- पत्नी सँड्रो आणि सँड्रा फेरी सांगतात. ते नुसतेच तिचे प्रकाशक नाहीत, तर तिची ओळख ते जीवापाड जपतात. एलिनानं स्त्रियांची मैत्री, किशोरवय, सेक्स, लग्न, सामाजिक स्थिती अशा सगळ्या विषयांवर अतिशय थेट, तपशीलवार आणि प्रामाणिकपणे लिखाण केलं आहे. तिचे चाहते सांगतात, की तिचं लिखाण थेट आपल्या मेंदूचा कब्जा घेतं. तिच्या शब्दांत त्यांना आपलाच एखादा तुकडा गवसतो, जो त्यांनी कधीच कागदावर व्यक्त केलेला अनुभवलेलाच नसतो. मध्यंतरीच एलिनाच्या द लॉस्ट डॉटर या पुस्तकावर त्याच नावाचा सिनेमा बनवण्यात आला. मॅगी जिलेनहॉल नावाच्या प्रसिद्ध अभिनेत्रीनं त्याचं दिग्दर्शन केलं होतं, तर ऑलिव्हिया कोलमन आणि डकोटा जॉन्सन अशी दिग्गज स्टारकास्ट त्यात होती. हे पुस्तक वाचताना आपल्याला काय वाटलं त्याबद्दल मॅगी म्हणाली, ‘विविध गोष्टींची इतकी सुसंगत साखळी लावलेली मी कधीच पाहिलेली नव्हती. एका टप्प्यावर असं वाटलं, की काहीही लिहिलंय या बाईनं आणि नंतर वाटलं, की अरे, मला समजतंय तिला काय म्हणायचंय ते!’ म्हणूनच एलिना म्हणते ते पटतं, की पुस्तक लिहून पूर्ण झाल्यानंतर त्याला लेखकाची गरज नसते. जर त्या पुस्तकाचं खरंच काही म्हणणं असेल, तर त्याला वाचक मिळतील. नसेल काही म्हणायचं, तर नाही मिळणार वाचक!(Elena Ferrante)

-कीर्ती परचुरे


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.