Home » वि. स. खांडेकर यांना आजच्याच दिवशी ‘ययाती’ कादंबरीसाठी ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आला

वि. स. खांडेकर यांना आजच्याच दिवशी ‘ययाती’ कादंबरीसाठी ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आला

by Correspondent
0 comment
Vishnu Sakharam Khandekar |K Facts
Share

वि. स. खांडेकर म्हणजे विष्णू सखाराम खांडेकर यांचा जन्म ११ जानेवारी १८९८ रोजी सांगली येथे झाला. त्यांना शाळेपासून अभिनय करण्याची आवड होती. १९२० साली खांडेकरांनी आत्ता सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेल्या शिरोडे गावातल्या शाळेत शिक्षक म्हणून नोकरी केली. त्यांनी १९३८ पर्यंत त्या शाळेत नोकरी केली. शाळेत नोकरी करता करता त्यांनी मराठी साहित्यात वेगवेगळ्या प्रकारे लेखन केले. त्यांनी सोळा कादंबऱ्या, सहा नाटके, सुमारे दोनशे पन्नास लघुकथा आणि ५० मोठ्या कथा लिहिल्या. त्याचप्रमाणे शंभर निबंध आणि २०० टीकात्मक लेख लिहिले.

वि. स.खांडेकर (Vishnu Sakharam Khandekar) म्हटले की त्यांची ‘ययाति’ (Yayati) ही कादंबरी सर्वांच्या डोळ्यासमोर येते. ययाति मधील भाषा आणि त्याची सहजता लक्षात येते. काही ठिकाणी तर अर्धा ते पाऊण पान एकच वाक्य दिसते. त्याची लिहिण्याची ही जबरदस्त शैली पाहून वाचक अवाक होतो. त्याचे मूळ कारण म्हणजे त्यांच्याकडे असणारी जबरदस्त ‘प्रतिभाशक्ती’. त्याच्यावर अनेकजण टीका करतात. पण नीट विचार केला तर आमचे काही लेखक ‘आत्मचरित्रातच’ संपतात. त्याचे एक महत्वाचे कारण शब्दसंपत्ती आणि प्रतिभाशक्तीचा अभाव. परंतु खांडेकरांकडे दोन्ही गोष्टी भरपूर होत्या. या ययाती कादंबरीला ज्ञानपीठं पुरस्कार मिळाला. खांडेकर यांना जेव्हा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला तेव्हा अनेकांची नाके मुरडली, अर्थात तो वादाचा मुद्दा झाला होता, असो.

Buy Yayati (Hindi) Book Online at Low Prices in India | Yayati (Hindi)  Reviews & Ratings - Amazon.in
Yayati  Book

त्यानी कांचनमृग, उल्का, दोन मने, हिरवा चाफा, अमृतवेल, क्रौचवध, ययाती, एक पानाची कहाणी, हृदयाची हाक, जळलेला मोहोर, पांढरे ढग अश्या अनेक कादंबऱ्या लिहिल्या. त्यांच्या काही कथा – कादंबऱ्यांवर चित्रपट झाले आहेत, दूरदर्शन मालिकाही झाल्या आहेत. १९३६ साली छाया चित्रपट मराठीत झाला, १९३८ साली ज्वाला हा हिंदी आणि मराठी चित्रपट झाला. त्याचप्रमाणे अमृत चित्रपट १९४१ साली हिंदी आणि मराठीत झाला. तर १९४१ साली धर्मपत्नी हा चित्रपट तामीळ आणि तेलगू मध्ये झाला. तसाच परदेशी, देवता हे चित्रपट त्यांच्या कथा-कादंबऱ्यांवर झाले आहेत. १९४० साली मराठी मध्ये ‘लग्न पहावे करून’ या चित्रपटात त्यांनी संवाद आणि पटकथाही लिहिली.

त्यांना १९६८ साली पदमभूषण मिळाले, तर १९७४ साली साहित्य अकादमीची फेलोशिप मिळाली. त्याचप्रमाणे १९७४ मध्येच त्यांच्या ययाति कादंबरीला पहिला जनपथ पुरस्कार मिळाला. मराठी भाषेत पहिला ज्ञानपीठ पुरस्कार (Jnanpith Award) त्यांना त्यांच्या ‘ययाति’ कादंबरीसाठी १९७४ साली मिळाला. तसेच भारत सरकारने त्यांचा पोस्टाचा स्टॅम्प काढून सन्मान केला. अशा या शब्द्प्रभूचे २ सप्टेंबर १९७६ रोजी निधन झाले.

आजही ययाती पुस्तक वाचले जाते आणि ही कादंबरी म्हणजे एक वेगळाच शब्दानुभव आहे.

-सतीश चाफेकर


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.