लग्नासाठी अनेक ठिकाणी मुली पळवून नेल्या जातात. कधी कधी या मुलींचं अपहरणही केलं जातं. पण लग्नासाठी पुरुषांचंही अपहरण होतं असं तुम्ही ऐकलंय का? ऐकायला जरी विचित्र वाटत असलं तरी ही गोष्ट खरी आहे. भारतात काही भागात मुलांना पळवून नेलं जातं आणि जबरदस्तीने त्यांचं लग्न लावून दिलं जातं. पण ही प्रथा नेमकी आहे तरी कुठे? कायदा असताना अशा घटना का घडतात आणि अपहरण झालेले तरुण करतात तरी काय? जाणून घेऊयात. (Uttar Pradesh And Bihar)
जर तुमचं लग्न तुमच्या मर्जीने झाले असेल तर तुम्ही नशीबवान आहात. आता तुम्ही म्हणाल प्रत्येकाचं लग्न त्याच्या मर्जीने होतं. पण जर तुम्ही बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये राहत असाल तर थोडी शक्यता आहे की तुम्हाला किडनॅप केले जाईल आणि एका अनोळखी मुलीशी तुमचं लग्नही लावून दिले जाईल. बिहारच्या पश्चिम आणि उत्तर प्रदेशच्या उत्तर भागात पकडूआ शादी ही प्रथा आहे. या मध्ये एका होतकरु तरुणाचे अपहरण केलं जातं आणि बंदुकीच्या धाकावर त्याचं लग्न लावून दिलं जातं. २० व्या शतकाच्या सुरुवातीला ही प्रथा सुरू झाली.
उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये साक्षरता कमी आहे. त्यामुळे या भागात चांगले शिकलेले आणि नोकरीला असलेले मुलं लग्नासाठी मिळत नाही. आणि असलेच तर ते जास्त हुंडा मागतात. त्यामुळे मुलींच्या पालकांनी वेगळी शक्कल शोधून काढली. त्यांनी चांगल्या मुलांवर पाळत ठेवायला सुरूवात केली. कुठला मुलगा किती शिकला, कुठे नोकरी करतो, त्याचं भविष्य काय असेल अशी मुलं पालकांनी हेरायला सुरूवात केली. जेव्हा पालकांना कळतं ही मुलं चांगली शिक्षित आणि चांगल्या घरची आहेत तेव्हा पालक अशा मुलांचे अपहरण करतात. आणि बंदुकीच्या जोरावर या मुलांचे लग्न आपल्या मुलींशी लावतात. (Social News)
हुंड्यामुळे वाढली प्रथा-
उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये ही प्रथा रुजण्याचे प्रमुख कारण म्हणजे वाढलेल्या हुंड्याबद्दल अपेक्षा. जेव्हा मुलगा चांगला शिकलेला असतो, नोकरदार असतो किंवा स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा असतो तेव्हा मुलाची आणि त्याच्या पालकांची हुंड्याबद्दल अपेक्षा वाढते. मुलं आणि त्यांचे पालक अव्वाच्या सव्वा हुंडा मागतात. त्यामुळे आपल्या मुलींना चांगला नवरा मिळेल का यांची मुलीच्या पालकांना चिंता असते. मुलं पळवण्याचा धंदा. (Uttar Pradesh And Bihar)
मुलींच्या पालकांना आपल्या मुलींसाठी चांगला मुलगा हवा असतो. त्यासाठी ते वाट्टेल ती किंमत द्यायला तयार होतात. त्यामुळे युपी बिहारमध्ये एक नवीन धंदा तयार झाला आहे. अनेक टोळ्या अशा मुलांना हेरतात. त्यांना बंदुकीच्या जोरावर पळवून आणतात आणि मुलींच्या पालकांच्या हवाली करतात. हुंडा देण्यापेक्षा अशा टोळ्यांना पैसे देणे मुलींच्या पालकांना कधीही परवडतं. त्यामुळे युपी बिहारमध्ये अशा टोळ्या भरपूर होत्या. त्यात कायदा सुव्यवस्थेचा वाजलेल्या बोऱ्या त्यामुळे बंदुका सहज मिळतात. आणि अशा टोळ्या बनवायला फार वेळ लागत नाही. कारण फार नोकऱ्या नसल्याने अनेक तरुण या वाट्याला जातात. (Social News)
सुशिक्षित आणि नोकरदार मुलांवर डोळा-
युपी बिहारमध्ये शिक्षणाचे प्रमाण कमी आहे. उद्योगधंदेही कमी असल्याने तिथे रोजगार नाही. त्यामुळे बरीच मुलं स्पर्धा परीक्षेची तयारी करतात. अनेक मुलं दुसऱ्या शहरात किंवा राज्यात जाऊन शिक्षण पूर्ण करतात. या मुलांचं भविष्य चांगलं असतं. त्यामुळे या मुलांना टार्गेट केलं जातं. जेवढा मुलगा जास्त शिकलेला असेल, जेवढा मुलगा चांगला कमावत असेल तेवढंच त्याचे अपहरण केले जाण्याची शक्यता अधिक असते. स्पर्धा परिक्षेची तयारी करणारा आणि आयएएसची परीक्षा पास झालेल्या मुलांना सर्वाधिक मागणी असते. (Uttar Pradesh And Bihar)
======
हे देखील वाचा : काळाराम मंदिरचा इतिहास आणि माहिती
======
मुलांची अडचण-
आता तुम्ही म्हणाल साध्या भोळ्या मुलांवर एवढा अन्याय होत असेल तर ही मुलं पोलिसांत का जात नाहीत. उत्तर प्रदेश आणि बिहारमधली कायदा सुव्यवस्था सगळ्यांनाच माहित आहे. त्यात येतात महिलांसाठी कायदे जेव्हा एखादा मुलगा पोलिसांकडे अशी तक्रार करतो, तेव्हा मुलीकडचे या मुलांवर हुंडा मागितल्याच्या खोट्या तक्रारी करतात. कायदा मुलींच्या बाजूने असल्याने तक्रार दाखल होते आणि मुलांवर कायदेशीर कारवाई होते. त्यात मुलांवर गुन्हा सिद्ध होता होता आणि निर्दोष सिद्ध होण्यासाठी वर्ष निघून जातात. हीच बाब मुलींच्या पालकांच्या पथ्यावर पडते. अपहरण केल्यानंतर बंदुकीच्या धाकावर मुलांना लग्नासाठी प्रवृत्त केलं जातं. पण जेव्हा मुलं ऐकत नाहीत तेव्हा त्यांना कायद्याची भिती दाखवली जाते. 2009 साली १ हजार २२४ अशा घटना घडल्याची नोंद आहे. (Social News)