Home » शिवशंकराची पूजा आणि धोत्र्याच्या फळाचे महत्त्व

शिवशंकराची पूजा आणि धोत्र्याच्या फळाचे महत्त्व

by Team Gajawaja
0 comment
Mahashivratri 2024
Share

भगवान महादेव आणि देवी पार्वतीचा विवाह झाला तो दिवस म्हणजे महाशिवरात्र.  येत्या 8 मार्च रोजी महाशिवरात्रीचा उत्सव म्हणून सर्वत्र साजरा होणार आहे. भगवान शंकराच्या या उत्सवासाठी सर्वच शिवमंदिरात तयारी सुरु झाली आहे.  भगवान महादेवाला आवडणा-या पुजा सामानांची दुकाने सजू लागली आहेत, या सर्वांमध्ये धतु-याचे फळ, अर्थात धोत्र्याचे फळही मोठ्या प्रमाणात विक्रीस आले आहे.  हिरव्या रंगाचे, काटेरी फळ शंकराच्या पुजासाहित्यामध्ये महत्त्वाचे असते. भगवान शंकराच्या पुजेमध्ये या धोत्र्याच्या फुलाचे महत्त्व पुराणकाळापासून सांगितले आहे.  (Mahashivratri 2024)

फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री साजरी केली जाते. वर्षातील ही सर्वात मोठी शिवरात्री मानली जाते.  यावेळी ही महाशिवरात्र शुक्रवार 8 मार्च रोजी  येत असून त्यासाठी भोलेनाथाचे भक्त तयारीला लागले आहेत. भोलेनाथाला प्रसन्न करण्यासाठी लागणा-या पुजासाहित्यामध्ये बेलपत्रांचा आणि पांढ-या फुलांचा प्रामुख्याने समावेश असतो. यासोबत धोत्र्याचे काटेरी फळही भगवान शंकराला अर्पण केले जाते.  पण हे काटेरी फळ भगवान शंकराला का प्रिय आहे, हे जाणणेही महत्त्वाचे आहे. आयुर्वेदामध्ये या धोत्र्याच्या फळाला महत्त्व आहे.  शरीराचा दाह कमी करण्यासाठी या फळाचा वापर केला जातो. भगवान शंकराबाबत या फळाची जी कथा सांगितली आहे, ती अशाच पद्धतीनं सांगितली आहे.  (Mahashivratri 2024) 

यासंदर्भात शिवपुराणात कथा सांगितली आहे.  समुद्रमंथनाच्यावेळी देव आणि दानव हे त्यातून येणा-या वस्तू आपापसात वाटून घेत होते.  यावेळी पहिले आले ते विष.  हे विष घेतल्याशिवाय दुसरी वस्तू येणे शक्य नव्हते. पण विषाला स्विकार करण्यास देव आणि दानवांनीही नकार दिला. अशावेळी भगवान शंकर पुढे आले.  भगवान शिवाने विश्वाच्या रक्षणासाठी ते विष घेतले. पण त्यांनी विष आपल्या घशाखाली जाऊ दिले नाही. त्यामुळे त्यांचा कंठ निळा झाला. त्यामुळे भगवान शिव नीलकंठ म्हणून ओळखले जाऊ लागले. (Mahashivratri 2024)

या विषामुळे भगवान शंकराला त्रास होऊ लागला.  त्यांना होणा-या वेदना पाहून देवांनी आदिशक्तीची प्रार्थना केली.  आदिशक्तीनं भगवान शंकरावर पाण्याचा अभिषेक सुरु केला आणि  देवाला धोत्र्याचे फळ देण्यात आले.  यामुळे भगवान शिवाचे विष कमी झाले.  त्यांच्या शरीराला होणारा दाह कमी झाला.  तेव्हापासून भगवान शंकराला धोत्र्याचे फळ अर्पण करण्याची प्रथा सुरु झाली.  

शिवलिंगावर धोत्र्याचे फळ अर्पण करण्यामागे आणखी एक कथा सांगितली जाते.  भगवान शंकराचे घर म्हणून कैलास पर्वत ओळखला जातो.  हा कैलास पर्वत कायम बर्फानं आच्छादलेला असतो.  तिथे कडाक्याची थंडी असते.  या थंड वातावरणातही भगवान शंकर कैलासावर कायम ध्यान करत असतात.  अशा थंडीत भगवान शंकराला त्रास होऊ नये म्हणून माता पार्वतीनं त्यांच्या बाजुला धोत्र्याचे फळ ठेवायला सुरुवात केली. त्यांनी शरीराला उब मिळते, अशी भावना आहे. त्यामुळेच आजही हिमालयातील भिक्षू स्वतःला उबदार ठेवण्यासाठी धोत्र्याच्या फळाचे सेवन करतात, असे सांगितले जाते.  

============

हे देखील वाचा : महाकालबाबांची महाशिवरात्र

============

धोत्र्याच्या फळाचे महत्त्व ज्योतिषशास्त्रातही सांगितले गेले आहे. भगवान शंकराला धोत्र्याचे फळ अर्पण केल्यास कालसर्प, पितृदोष यासह राहूचे अनेक दोष कमी होतात, असेही सांगितले जाते. भगवान शंकराच्या पुजेत या धोत्र्याचे फळ जसे वापरले जाते, तसेच धोत्र्याचे पांढरे फुल आणि पानंही भगवान शंकराला अर्पण केली जातात. आयुर्वेदातही या हिरव्या रंगाच्या काटेरी फळाला महत्त्वाचे स्थान आहे. धोत्राच्या पानांची पावडर दम्यासारख्या आजारात उपयोगी असते.  तसेच  या पानांचा अर्क डोळ्यांसाठीही चांगला असल्याचे सांगण्यात येते.  धोत्र्याच्या फळाच्या वापरानं शरीरातील उष्णता कमी होते, असेही सांगितले जाते.  तसेच संधीवातासारख्या आजारातही धोत्र्याच्या फळाचा अर्क वापरुन केलेले तेल उपयोगी पडते असे सांगितले जाते.  अर्थातच हे सर्व उपाय तज्ञांच्या सल्ल्यानुसार केले जातात.  (Mahashivratri 2024)

भगवान शंकराचे भक्त मात्र या फळाचे आणि महादेवाचे नाते ओळखून देवाला या फळांचा अभिषेक करतात.  भगवान शंकराची महाशिवरात्रीच्या दिवशी अनेक प्रकारे पुजा केली जाते,  त्यात या धोत्र्याच्या फळाचे अनन्य साधारण महत्त्व आहे.  

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.