Home » स्वर्गाहून सुंदर व्हॅली ऑफ फ्लॉवर

स्वर्गाहून सुंदर व्हॅली ऑफ फ्लॉवर

by Team Gajawaja
0 comment
Valley of Flowers
Share

एकाचवेळी फुलांच्या ५०० हून अधिक प्रजाती बघायच्या असतील तर व्हॅली ऑफ फ्लॉवरला भेट द्यायला हवी. उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील प्रसिद्ध व्हॅली ऑफ फ्लॉवर्स ट्रेक सुरु झाला आहे. या ट्रेकची अनेक निसर्गप्रेमी वाट बघत असतात. कारण व्हॅली ऑफ फ्लॉवरमध्ये एकाच वेळी अनेक रंगाचे डोंगरच्या डोंगर बघायला मिळतात. या फुलांच्या नंदनवनात अनेक प्रकारची आणि अनेक रंगांची फुले आहेत. या रंगबिरंगी फुलांचा हा बहर बघण्यासाठी हजारो पर्यटक आणि पुष्प अभ्यासक या ठिकाणी गर्दी करतात. जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सुरु होणारा हा ट्रेक ऑक्टोबर पर्यंत असतो. पण या ट्रेकवर जाण्याची योग्यवेळ ही ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यात असते. यावेळी पावसाचा जोर कमी झालेला असतो आणि फुलांच्या अनेक जाती एकाचवेळी पहाता येतात.

उत्तरखंडमधील या नंदनवनास युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे. व्हॅली ऑफ फ्लॉवर्स ही नंदा देवी बायोस्फीअर रिझर्व्हमध्ये येते. येथे साध्या गोंड्याच्या फुलांपासून ऑर्किडसारख्या फुलांच्या अनेक प्रजाती बघायला मिळतात. याशिवाय प्रदेशात पक्षी, फुलपाखरे आणि प्राणी यांचीही विविधता बघायला मिळते. हा ट्रेक चालू झाला असून ज्यांना हे फुलांचे विश्व बघायचे असेल त्यांनी आपल्या ट्रेकचे नियोजन ३१ ऑक्टोबर २०२४ पूर्वी करावे, असे आवाहन उत्तराखंड सरकारतर्फे करण्यात आले आहे. (Valley of Flowers)

व्हॅंली ऑफ फ्लॉवरमध्ये हजारोप्रकारची फुलं बघता येतात. यापैकी ५०० फुलांना ओळखण्यात अभ्यासकांना यश आले आहे. त्यात ॲनिमोन्स, जीरॅनियम, प्रिम्युला, ब्लू खसखस ​​आणि ब्लूबेल यांचा समावेश आहे. शिवाय उत्तरखंड राज्याचे फूम म्हणून ज्याची ओळख आहे, ते ब्रह्म कमळ बघण्याची संधीही पर्यटकांना मिळते. हे फूल सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून फुलायला सुरुवात होते. शिवाय या भागात डोंगरात आढळणा-या मेंढ्या, कस्तुरी मृग, अस्वल आणि स्नो बिबट्या यांचाही वावर आहे. क्वचित प्रसंगी हे प्राणीही पर्यटकांना दिसतात. पर्यटकांच्या दृष्टीनं सोयीस्कर आणि सुरक्षेसाठी उत्तराखंड सरकारनं व्हॅली ऑफ फ्लॉवर बघायला येणा-या पर्यटकांसाठी स्थानिक मार्गदर्शक म्हणून काम करतात. (Valley of Flowers)

यातून पर्यटकांना फुलांची योग्य माहिती मिळते, शिवाय या भव्य प्रदेशातील प्राण्यांपासूनही पर्यटकांनाही सुरक्षा मिळते. रामायण काळात हनुमान संजीवनी वनौषधीच्या शोधात याच खोऱ्यात आले होते, अशी आख्यायिका स्थानिक सांगतात. ही फुलांची व्हॅली प्रथम ब्रिटीश गिर्यारोहक फ्रँक एस स्मिथ आणि आर.एल. होल्ड्सवर्थ यांनी शोधली १९३१ मध्ये माउंट केमेटच्या मोहिमेवरून हे दोघे परतत होते. त्यावेळी फ्रॅंक स्मिथ या व्हॅलीच्या वाटेनं परत आला. मात्र या व्हॅलीच्या सौंदर्याने प्रभावित होऊन, स्मिथ १९३७ मध्ये या खोऱ्यात पुन्हा आला. तिथे राहिला. तेथील फुलांच्या प्रजातींचा अभ्यास केला. त्यानंतर त्यानं १९३८ मध्ये “व्हॅली ऑफ फ्लॉवर्स” नावाचे पुस्तक लिहिले. तेव्हापासून व्हॅली ऑफ फ्लॉवरची माहिती जगाला झाली. आज या व्हॅलीमध्ये फक्त भारतातीलच नव्हे तर जगभरातील पर्यटक मोठ्या संख्येनं भेट देतात. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर हे महिने व्हॅली ऑफ फ्लॉवर्सला भेट देण्यासाठी सर्वोत्तम मानले जातात. त्यातच सप्टेंबरमध्ये ब्रह्मकमळ फुलत असल्यामुळे या महिन्यात येणा-या पर्यटकांची संख्या मोठी असते. (Valley of Flowers)

व्हॅली ऑफ फ्लॉवर्समध्ये जाण्यासाठी, उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील गोविंदघाट येथे जावे लागते. जोशीमठ पासून गोविंदघाट जवळ आहे. या भागात पर्यटन विभागानं सर्व व्यवस्था केलेल्या आहेत. व्हॅली ऑफ फ्लॉवरला भेट देण्यासाठी ठराविक काळातच टिकीट देण्यात येते. तसेच या भागातून सायंकाळी ५ नंतर परत येण्याचे बंधन पर्यटकांसाठी असते. या भागात स्नो लेपर्ड आणि अस्वलांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षतेसाठी काही बंधने पर्यटन विभागतर्फे घालण्यात आली आहेत. ही व्हॅली नोव्हेंबर ते मे दरम्यान बर्फाच्छादित असते. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात हा बर्फ कमी होऊन फुलांचे रंग दिसायला लागतात. (Valley of Flowers)

======

हे देखील वाचा :  मणिपूरमधून नवीन आशा !

======

या व्हॅलीमध्ये ॲनिमोन, जर्मेनियम, मार्श, मॅरीगोल्ड, प्रिबुला, पोटेंटिला, ज्यूम, एस्टर, लिलियम, हिमालयन ब्लू पोपी, बचनाग, डेल्फीनियम, रॅननक्युलस, कॉरिडालिस, इंदुला, सॉस्युरिया, कॅम्पॅन्युला, पेडिकुलिस, मोरैना, इम्पॅटिनस बिस्टोर्टा, लिग्युलेरिया, ॲनाफॅलिस, सॅक्सीफगा, लोबिलिया, थर्मोपसिस, ट्राउलिस, अक्युलेजिया, कोडोनॉपसिस, डॅक्टिलोरहिझम, सायप्रीपीडियम, स्ट्रॉबेरी आणि रोडोडेंड्रॉन अशा अनेक दुर्मिळ फुलांना बघता येते. ब-याचवेळा एका वर्षी ठराविक फुले फुलतात, तर दुस-या वर्षी दुस-या प्रजातीची फुले फुलतात. त्यामुळे कितीही वेळा गेलं तरी ही व्हॅली नवी वाटते. उत्तराखंड पर्यटन विभागानं या व्हॅलीला भेट देणा-या पर्यटकांसाठी सर्व ऑनलाईन बुकींगची व्यवस्था केली आहे. त्याचा फायदा घेण्याचे आवाहन पर्यटकांना केले आहे. (Valley of Flowers)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.