गेल्या आठवड्यात उत्तरप्रदेशमधील संभळ जिल्ह्यातील संभळ हे शहर अचानक चर्चेत आले. संभळ या नावाला सनातन धर्मात खूप महत्त्व आहे. भगवान विष्णु यांचा दहावा अवतार संभळ नावाच्या ठिकाणाहून होणार असा उल्लेख पुराणात आहे. हे संभळ आणि उत्तरप्रदेशमधील संभळ एकच आहे का यावर चर्चा होत असतांना या संभळमधील मशिदीची पाहणी करावी अशी मागणी झाली. यातून तिथे दंगल झाली. ही दंगल शांत होते न होते तोच विद्युत विभागातर्फे केलेल्या पाहणीत चक्क एक लपवलेले मंदिर पुढे आले. भगवान महादेव आणि हनुमानाच्या या मंदिराला घराच्या भींतींमध्ये लिलया लपवलेले होते. याच मंदिराच्या बाजुला एक विहिर मिळाली आणि त्यात शिवपरिवार ही मिळाला. यातील काही मुर्ती या तुटलेल्या होत्या. या सर्वांवरुन संभळबाबत भारतीय पुराणात सांगितलेली महती पुन्हा एकदा पुढे आली. संभळ हे शहर काही वर्षापूर्वी हिंदूंचे आस्थास्थान होते. येथे 68 देवस्थाने आणि 19 विहिरी होत्या. या सर्वांची परिक्रमा ही पवित्र मानली जायची. याशिवाय येथे तीन प्रमुख शिवलिंगे असल्याची माहिती पुढे आली. (Uttar Pradesh)
यात पूर्वेला चंद्रशेखर, उत्तरेला भुवनेश्वर आणि दक्षिणेला संभलेश्वर अशी ही मंदिरे भाविकांनी गजबजलेली असायची. मात्र अचानक ही मंदिरे ओस पडली. जुन्या नकाशात दिसणारी यातील काही मंदिरे आणि पवित्र विहिरी गायब झाल्या. असं काय अचानक झालं की चक्क हिंदूंधर्माचा हजारो वर्षाचा इतिहास सांगणारी धर्मस्थाने गायब झाली. तर त्याचे उत्तर आहे, 29 मार्च 1978 या तारखेमध्ये. आपल्या देशात ज्या अनेक भीषण दंगली झाल्या आहेत आणि त्या नंतर पुसल्या गेल्या आहेत, त्यातील सर्वात भीषण दंगल 29 मार्च 1978 रोजी संभलमध्ये झाली. या दिवशी हे पवित्र शहर पेटवण्यात आले. यात किती हिंदू जळून खाक झाले याचा निश्चित आकडा अद्यापही समोर नाही. पण किमान 18 हिंदूंना जिवंत जाळण्यात आल्याची माहिती आहे. या दिवसानंतर हे शहर हिंदूंसाठी ओस पडले. अनेकांनी आपल्या जमिनी, खानदानी घरे अक्षरशः मिळेल त्या दराला विकली आणि दुस-या शहरात घर केले. काहींनी तर यातील काहीच मिळाले नाही. पण घरातील महिलांवर झालेले अत्याचार बघत अनेक कुटुंबांनी रातोरात संभळ सोडलं. आता याच संभळमध्ये एकापाठोपाठ एक मंदिरे समोर आल्यानं या पलायन केलेल्या हिंदू कुटुंबापैकी काहींनी आपल्या शहरात पुन्हा येण्याचे बळ मिळाले आहे. भारताच्या इतिहासातून पुसलेल्या या 29 मार्च 1978 तारखेला त्यांना पुन्हा एकदा लिहिण्याचा आणि आपल्यावर काय अन्याय झाला हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. (Social News)
29 मार्च 1978 या दिवशी संभळमध्ये अचानक दंगल झाली नाही. यासाठी काही दिवसांपूर्वीची धुसपूस एका ज्वाळेसारखी ठरली. संभळमध्ये महात्मा गांधी मेमोरियल डिग्री कॉलेज या नावाने पालिका कार्यालयाजवळ एकच पदवी महाविद्यालय होते. संस्थेच्या घटनेनुसार, व्यवस्थापन समिती दहा हजार रुपये देणगी देऊन संस्थेचे आजीवन सदस्य बनवू शकते. मंजर अली नावाच्या एका व्यक्तीला महाविद्यालयाच्या समितीवर सदस्यत्व हवे होते. यासाठी त्यानं महाविद्यालयाला देणगीचा धनादेश दिला. मात्र त्यानंतरही सदस्यत्व न मिळाल्यामुळे त्याच्या मनात राग होता. 25 मार्च 1978 रोजी होळीचा सण होता. यावेळीही दोन समुदायामध्ये होलीका दहनावरुन वाद झाला. त्यानंतर 28 मार्च 1978 हा दिवस आला. यादिवशी महात्मा गांधी मेमोरियल कॉलेजमध्ये मोठा कार्यक्रम साजरा होणार होता. मात्र या कार्यक्रमापूर्वी काही मुस्लीम विद्यार्थिनींनी मुख्याध्यापकांची भेट घेतली आणि कार्यक्रम रद्द करण्याची मागणी केली. (Uttar Pradesh)
यावरुन विद्यार्थ्यांच्या दोन गटात बाचाबाची झाली. या सर्वांची पाश्वभूमी भयानक अशा दंगलीमध्ये झाली. संभळच्या बाजारपेठेत याचवेळी तहसीलदारांना निषेध आणि घेराव सुरु होता. यावेळी मोठी गर्दी झाली. यातील काहींनी दुकाने बंद करा अशी मागणी केली. मंजर याफी या स्थानिक नेत्यानं त्यात पुढाकार घेतला. मंजर याफी आणि त्याच्या साथीदारांनी बनियागर्दी चालणार नाही अशा घोषणा देत जबरदस्तीने मार्केट बंद करण्यास सुरुवात केली. यावर पंजाबी वर्ग प्रमुख असलेल्या व्यापारी वर्गाने प्रमोद पानवाला यांना पाठिंबा देण्यासाठी घटनास्थळी धाव घेतली. त्याचवेळी भाजी मंडईत लुटमार आणि चेंगराचेंगरी सुरू झाली. त्यानंतर ठिकठिकाणी अफवा पसरावयाला पद्धतशीरपणे सुरुवात झाली. यात मंजर शफीची हत्या, आणि पोलिस ठाण्याजवळ बांधलेली मशीद उद्ध्वस्त झाली. अशा अफवा प्रमुख होत्या. त्यामुळे मोठा जमाव आला आणि सर्वत्र जाळपोळ सुरु झाली. ही परिस्थिती पाहता विभागीय अधिकाऱ्यांकडून तात्काळ कर्फ्यू लावण्याचे आदेश जारी करण्यात आले होते. (Social News)
मात्र अतिरिक्त पोलीस फौजफाटा प्राप्त होईपर्यंत दंगलखोरांनी ठिकठिकाणी जाळपोळ केली. अनेकांना मारण्यात आले. यात काही ठिकाणी आगी लावण्यात आल्या. या घटनेत बनवारीलाल मलिकसह 10-12 हिंदूंना जाळण्यात आल्याची माहिती आहे. बनवारीलाल मलिक हे येथील मोठे व्यापारी होते. या जाळपोळीत सराफा बाजार, गंज, नखासा तिराहा, भाजी मंडई आणि कोट बाजार येथे मोठ्या आगी लागल्या आणि अनेक हिंदू धर्मियांच्या संपत्तीला जाळून टाकण्यात आले. जमावाने संपूर्ण भाजी मंडई आणि हिंदूंच्या मालकीची सुमारे 40 दुकाने जाळली आणि लुटली. ही दंगल एवढी मोठी होती की, 29 मार्च 1978 ते 20 मे या कालावधीत शहरातील भागात संचारबंदी लागू करण्यात आली होती. दरम्यान, 2 एप्रिल रोजी पहिल्याच दिवशी कर्फ्यू उघडण्यात आला होता. या सर्वात 184 जणांचे मृत्यू झाल्याची नोंद आहे. शिवय अनेकांचे हातपाय कापण्यात आले. अनेक महिलांवर बलात्कार करण्यात आले. अनेकांचे अंत्यसंस्कार करण्यासाठीही पूर्ण शरीर मिळाले नाही. कपाडी पुतळे बनवून ब्रिजघाटावर सामुदायिक अत्यंसंस्कार करण्यात आले. हरद्वारीलाल शर्मा आणि सुभाषचंद्र रस्तोगी हे या सर्व प्रकरणातील साक्षीदार होते. 2010 मध्ये कोर्टाने 48 आरोपींची कोर्टात पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. त्यानंतर येथील उरल्या सुरल्या हिंदूंनी आपली घरे सोडून दुसरीकडे रहाणेच पंसत केले. (Uttar Pradesh)
========
हे देखील वाचा : चला, सामान भरा !
======
संभलमधील बंद असलेले पुरातन शिवमंदिर 46 नंतर पुन्हा उघडल्यावर काही हिंदू येथे परतले आहेत. त्यांनी या भिषण दंगलींची आठवण काढत आपले नातेवाईक एका रात्रीत अचानक गायब झाले, त्यांचा कधीही ठावठिकाणा लागला नसल्याचे दुःखाने सांगितले आहे. संभळच्या खग्गु सराय येथील विष्णू शरण रस्तोगी हे ही अशाच मुळ संभळ नागरिकांपैकी एक आहेत. आपण दिवस-रात्र ज्या मंदिरामध्ये आरती करायचो, ते मंदिर आता कसे आहे, हे बघायला त्यांच्यासारखेच अनेक संभळवासी परत येत आहेत. येथील घरांच्या भिंतींवर हात फिरवून आपल्या हरवलेल्या नातेवाईकांची डोळ्यातील अश्रूंसह आठवण काढत आहेत. आता संभळमधील अन्यही मंदिरे खुली करावीत आणि येथील प्रदक्षिणा मार्गावरील सर्वच अतिक्रमणे तोडून तो मोकळा करावा अशीही त्यांची मागणी आहे. शिवाय 28 मार्च 1978 च्या दंगलीमध्ये जे निरपराध मारले गेले, त्यांना न्याय मिळावा, अशी मागणीही आता कऱण्यात येत आहे. (Social News)
सई बने