राजस्थानच्या उदयपूरमधील मेवाड राजवंश आणि त्यातील भांडणे सध्या चर्चेत आली आहेत. महान महाराणा प्रताप यांचे वंशज असलेल्या या राजघराण्यातील वारसांमध्ये सुरु असलेल्या या भांडणांमध्ये त्यांचे पाठिराखेही सामिल झाले आहेत. अगदी तलवार नाही, तर दगडाच्या सहाय्यानं या समर्थकांमध्ये मारामारी सुरु आहे. या सर्वाला कारण ठरलं आहे, एक अभिषेक आणि त्यासाठी लागणारा कुलदेवीचा आशीर्वाद. मेवाडच्या राजघराण्यातील महाराणा आणि भाजपचे आमदार विश्वराज सिंह यांचा राज्यभिषेक झाला आहे. हा राज्यभिषेक झाल्यावर परंपरेनुसार मेवाड राजघराण्याची कुलदेवी असलेल्या धुनी मातेचा आशीर्वाद घ्यावा लागतो. हा आशीर्वाद घेतला नाही, तर राज्यभिषेक सोहळा हा अर्धवट मानला जातो. धुनी मातेचा आशीर्वाद घेण्यासाठी विश्वराज सिंह मेवाड हे लवाजम्यासह उदयपूरच्या प्रसिद्ध सिटी पॅलेसमध्ये गेलेही. मात्र या पॅलेसचे दरवाजे त्यांच्यासाठी उघडण्यात आले नाही. विश्वराज सिंह मेवाड हे शाही पोशाख आणि तलावारीसह या दरवाज्यासमोर उभे राहिले. त्यांच्यासोबत त्यांचे कुटुंबिय आणि पाठिराखे मोठ्या संख्येनं उपस्थित होते. मात्र बराचवेळ पॅलेसचे दरवाजे उघडले न गेल्यानं या पाठिराख्यांनी गोंधळ करायला सुरुवात केली. (Mewar Dynasty)
त्याला उत्तर म्हणून की काय, पॅलेसमधूनही दगड आणि काचेच्या बाटल्या टाकण्यात आल्या. यामुळे हा गोंधळ अधिक वाढला आणि पोलीसांना त्यात हस्तक्षेप करावा लागला. विश्वराज सिंह मेवाड यंना धनी देवीचा आशीर्वाद न घेताच परतावे लागले. यामुळे मेवाडच्या राजघराण्यातील वारसावाद पुन्हा पेटला आहे. सध्या ज्या सिंहासनासाठी वाद सुरु आहे, ते मेवाड घराण्याचे 71 वे सिंहासन आहे. महाराणा प्रताप यांचे वंशज लक्ष्यराज सिंह आणि त्यांचे चुलत भाऊ विश्वराज सिंह यांच्यात सिंहासनासाठी लढा आहे. हा लढा सुरु असतानाच अरविंद सिंग यांचे थोरले भाऊ महेंद्र सिंह यांचा मुलगा, विश्वराज सिंग यांचा राज्याभिषेक झाला. आता ते या मेवाड घराण्याचे 71 वे महाराणा झाले आहेत. राज्याभिषेक सोहळा पूर्ण झाल्यानंतर, विश्वराज सिंह मेवाड आपल्या मंडळासह उदयपूरच्या सिटी पॅलेसमध्ये त्यांची कुलदेवता धुनी मातेचे दर्शन घेण्यासाठी पोहोचले, परंतु ते पोहचण्यापूर्वी काही वेळआधी सिटी पॅलेसची दरवाजे बंद करण्यात आले. (Social News)
महाराणाच्या वंशजांच्या घराण्यात अशी परंपरा आहे की ज्या सदस्याला नवीन दिवाण असे नाव दिले जाते त्याचा राज्याभिषेक सोहळा केला जातो. या विधीमध्ये तलवारीने अंगठा चिरून रक्ताचा तिलक लावला जातो. त्यानंतर कुल देवी धुनी मातेचे दर्शन घेतले जाते. मग एकलिंग जीचे दर्शन घेतले जाते. मेवाड राजवंशाच्या या कुलदेवीचे मंदिर सिटी पॅलेसच्या आवारात आहे. आणि हा सिटी पॅलेस स्वर्गीय महेंद्रसिंग मेवाड यांचे भाऊ अरविंद सिंग मेवाड यांच्या ताब्यात आहे. दिवंगत भागवत सिंह मेवाड यांच्या इच्छेनुसार, अरविंद सिंग यांनी स्वतःला महाराणा मेवाड चॅरिटेबल फाउंडेशनचे अध्यक्ष म्हणून घोषित केले आहे. आता त्यांनी पॅलेस म्युझियममधील सुरक्षा लक्षात घेऊन विश्वराज सिंग यांना कुलदेवीचे दर्शन घेण्यापासून रोखल्याचा दावा केला आहे. यामुळे विश्वराज सिंग हे दुखावले आहेत. राजघराण्यातील लोकांचा असा विश्वास आहे की धुनीमातेच्या दर्शनानंतर त्यांना कोणत्याही कामात अडथळे येत नाहीत. (Mewar Dynasty)
या धुनीमातेच्या मंदिराची स्थापना महाराणा प्रताप यांनी केली होती आणि त्यांनीच ही परंपरा सुरू केली होती, अशी माहिती आहे. मात्र यावेळी ही परंपरा खंडित करुन प्रत्यक्ष महाराणा प्रताप यांचाच अपमान अरविंद सिंग यांनी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मेवाडचे महाराणा स्वतःला एकलिंगजीचे दिवाण मानतात. त्यांनी धुनीमातेचे दर्शन घेतल्यावर पुजारी त्या राजाला नियमाची काठी देतात. एक प्रकारे महाराणाची ओळख या मंदिरातूनच मिळते. आता तिच नियमांची काठी विश्वराज सिंग यांना मिळाली नाही, त्यामुळे त्यांचा राज्यभिषेक सोहळा अर्धवट राहिल्याचे मानला जाणार आहे. कारण त्यांना एकलिंगजी मंदिरातही प्रवेश दिला नाही. हे मंदिरही अरविंदसिंग मेवाड यांच्या ट्रस्टच्या अंतर्गत आहे. तिथेही विश्वराज सिंग यांना प्रवेशबंदी होती. हे एकलिंगजी मंदिर, भगवान शंकराला समर्पित असून ते उदयपूर जिल्ह्यातील सर्वात प्राचीन मंदिरांपैकी एक आहे. 734 मध्ये उदयपूरचे शासक महाराणा बाप्पा रावल यांनी ते बांधले आहे. (Social News)
=====
हे देखील वाचा : राजघराणे, राजतिलक आणि राजकारण
========
महाराणा बाप्पा रावल हे भगवान शंकराचे मोठे भक्त होते. त्यामुळे हे मंदिर त्यांनी भव्य बांधले. पिरॅमिड छत आणि सुंदर नक्षीकाम केलेले मिनार असलेले दुमजली मंदिराला तत्कालीन मेवाड शासकांनी अधिक भव्य करण्याचा प्रयत्न केला आहे. मुख्य मंदिरात काळ्या पाषाणातील पाचमुखी शिवलिंग असून हे शिवलिंग महाराणा रायमलजी यांनी स्थापन केल्याची माहिती आहे. हे मंदिर त्याच्या चारमुखी मूर्तीमुळे भारतभर प्रसिद्ध आहे. आता या वादानंतर अरविंद सिंग मेवाड यांनी पत्रक जाहीर करुन आपली भूमिका मांडली आहे. मेवाड राजघराणे एका ट्रस्टद्वारे चालवले जाते, ज्याचे व्यवस्थापन हे वाडवडीलांकडून त्यांच्याकडे आले आहे. अशा स्थितीत मेवाडच्या गादीवर अधिकार त्यांचा आणि त्यांचे चिरंजीव लक्ष्यराज सिंह यांचा असल्याचे त्यांनी या पत्रकात सांगितले आहे. अब्जो रुपये संपत्ती आणि महाराणा प्रताप सिंह सारख्या महान व्यक्तींचा वारसा सांगणा-या या राजघराण्यातील या वादामुळे मात्र सर्वसामान्यांना चर्चांसाठी नवा विषय मिळाला आहे. (Mewar Dynasty)
सई बने