या आठवड्यात कुठल्या राशींचा भाग्योदय होणार? कुठल्या राशींना परदेश प्रवास घडणार? कुठल्या राशींना त्रास होणार, पाहूया या आठवड्याचे राशिभविष्य (August Weekly Horoscope) –

मेष – आपल्या राशीत राहू आणि हर्षल तर धनस्थानात राशी स्वामी मंगळाचे भ्रमण होत आहे, तर चंद्राचे भ्रमण तृतीय स्थानातून म्हणजेच पराक्रम स्थानातून होत आहे. सुखस्थानातून शुक्राचे, पंचमस्थानातून रवीचे, षष्ठस्थानातून बुधाचे भ्रमण होत आहे. परदेशस्थ भावंडांच्या गाठीभेटी होतील. भावंडांनी दिलेला सल्ला अतिशय महत्त्वाचा ठरेल. महत्त्वाची कागदपत्रे हाती लागतील. कुटुंबातील वातावरण अतिशय आनंदी राहील पाहुण्यांची वर्दळ वाढेल. गृहसुशोभीकरणासाठी शोभेच्या वस्तूंची खरेदी कराल. नवीन वास्तूचे योग येतील. मातृसौख्य लाभेल. महिन्याच्या उत्तरार्धात सुखस्थानातून होणारे शुक्राचे आणि चंद्राचे भ्रमण अतिशय शुभ फळे देणारे राहील. आठवड्याच्या उत्तरार्धात पंचमस्थानातील पंचमेश रवीवरून होणारे चंद्राचे भ्रमण संततीच्या प्रगती अनुकूल राहील. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा चांगले यश प्राप्त होईल. अंगभूत कलागुणांना वाव मिळेल. नोकरीत अनपेक्षित भाग्योदय होईल. (August Weekly Horoscope)
शुभ दिनांक 24, 25

वृषभ – आपल्या राशीतून मंगळाचे, तृतीय स्थानातून म्हणजेच पराक्रम स्थानातून शुक्राचे, तर सुखस्थानातून रवीचे भ्रमण होत आहे. पंचमस्थानातून बुधाचे आणि षष्ठ स्थानातून केतूचे आणि भाग्यस्थानातून शनीचे भ्रमण होत आहे, तर राशीच्या लाभस्थानात गुरु महाराज विराजमान झालेले आहेत. आठवड्याच्या सुरुवातीला आपल्या राशीच्या धनस्थानातून चंद्राचे होणारे भ्रमण चांगले आर्थिक लाभ देणारे राहील. वर्षासहलीचे आयोजन केले जाईल. भावंडांच्या गाठीभेटी होतील. एखादा महत्त्वाचा निर्णय घेताना भावंडांचा सल्ला घ्याल. गृहसुशोभीकरण करण्यासाठी खरेदी केली जाईल. नवीन गृहउद्योग, लघुउद्योग सुरू केले जातील. कारण सिंह राशीत म्हणजेच स्वराशीत आलेला रवी बलवान असतो. त्यामुळे स्थावर मालमत्ते संबंधीची कामे मार्गी लागतील. वडीलधाऱ्या व्यक्ती घरी येतील त्यामुळे जबाबदाऱ्या वाढतील. वास्तू खरेदीचे योग मूळ पत्रिकेत असल्यास नवीन वास्तू खरेदी केली जाईल. लाभस्थानातील गुरुची स्वराशीतून शुक्र आणि चंद्रावर असलेली शुभदृष्टी आपणास अनुकूल फलदायी ठरेल.
शुभ दिनांक 24 ते 26

मिथुन – आठवड्याच्या सुरुवातीला आपल्याच राशीतून धनेश चंद्राचे भ्रमण होत आहे. त्यामुळे आठवड्याच्या सुरुवातीला जुनी येणी वसूल होतील. धनस्थानात शुक्र तर पराक्रम स्थानात रवी आहे. दशम स्थानातून वक्री गुरुची धनस्थानातील शुक्रावर दृष्टी आहे, तर लाभेश मंगळ व्यय स्थानात आहे. त्यामुळे ज्या प्रमाणात आपली आवक वाढणार आहे त्याच प्रमाणात खर्च देखील समोर उभे राहतील. उत्तरार्धात घरात मोकळेपणाचे वातावरण राहील. कुटुंबात शुभ समारंभाचे आयोजन केले जाईल, आप्तस्वकियांच्या गाठीभेटी होतील. सुरुची भोजनाचे योग येतील. स्थावरासंबंधीची तसेच सरकारी रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. स्वराशीत असणारा मंगळदृष्ट रवी पराक्रम स्थानातून भ्रमण करत असल्यामुळे धाडसी निर्णय घेतले जातील. सामाजिक पतप्रतिष्ठा उंचावेल. (August Weekly Horoscope)
शुभ दिनांक – 27, 28.

कर्क – आठवड्याच्या सुरुवातीला आपल्या राशीच्या व्ययस्थानातून चंद्राचे, राशीतून शुक्राचे तर धनस्थानातून स्वराशीच्या रवीचे भ्रमण होत आहे. कुटुंबाची आर्थिक घडी चांगली बसेल. आवक वाढल्याने आर्थिक स्थैर्य येईल. मोठ्या माणसांना आपण मोठे का म्हणतो कारण ते बरोबर असल्यावर त्यांच्या उपस्थितीमुळे आपला मान वाढतो अशीच काहीशी अनुभूती आपणास या आठवड्यात येणार आहे. आपल्या अंगभूत कलागुणांना चांगला वाव मिळेल. कलाकार, गायक, वादक, कारागीर यांना आपले कौशल्य दाखवता येईल. आपल्या कार्याचा आवाका वाढत जाईल आणि त्यानिमित्तानेच यशस्वी प्रवास होतील. गृहसजावटीसाठी खरेदी केली जाईल. या आठवड्यात आपल्या कर्तृत्वाला चांगली झळाळी येईल आणि त्यामुळेच आपले व्यक्तिमत्व फुलून उठेल. उंची वस्त्रालंकारांची खरेदी केली जाईल.
शुभ दिनांक – 24, 25

सिंह – राशीस्वामी रवी आपल्याच राशीत, धनेश बुध धनस्थानात, तृतीय स्थानात केतू, तर षष्ठस्थानात षष्ठेश शनि, अष्टमस्थानात अष्टमेश गुरु, भाग्यस्थानात राहू हर्षल तर दशमस्थानात भाग्येश मंगळ आणि व्ययस्थानात लाभेश शुक्र असे या आठवड्याचे ग्रहमान आहे. चंद्राचे भ्रमण मात्र लाभस्थानातून होत असल्यामुळे व्यवसाय उद्योगात चांगल्या संधी चालून येतील. अनुकूल ग्रहमानामुळे शुभ फळे मिळतील. सामाजिक पतप्रतिष्ठा उंचावेल अशी खरेदी केली जाईल. आपल्या कर्तृत्वाला चांगली झळाळी येईल. कामात बदल करावासा वाटेल. नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांना मनाजोगे काम मिळेल. कुटुंबासाठी खर्च केला जाईल. शेअर्स मधून लाभ होतील. जोडीदाराकडून अथवा सासुरवाडीहून देखील चांगली आवक होईल. एकंदरीत हा आठवडा आपल्यासाठी आवक वाढवणारा राहील. घरातील वातावरण आनंदी, उत्साही राहील. आप्तस्वकीयांच्या गाठीभेटी होतील. मन प्रसन्न राहील. (August Weekly Horoscope)
शुभ दिनांक 27, 28

कन्या – राशीस्वामी व दशमेश बुधाचे आपल्या राशीतून, तर दशमस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. त्यामुळे व्यवसाय उद्योगातून स्थिरता लाभेल. लाभस्थानातील चंद्र आणि शुक्र आपली इच्छापूर्ती करणारे राहतील. आपल्या ध्येयापासून विचलित होऊ नका. आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर मोठी मजल माराल. वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. कामानिमित्त दूरचे प्रवास होतील. महत्त्वाची कागदपत्रे हाती लागतील. हाती आलेला पैसा खर्च न करता गुंतवला जाईल. जुन्या मैत्रीला उजाळा मिळेल. विवाहित चूक तरुणांना मनापासून तो जोडीदार मिळेल. विवाहितांना सासुरवाडीहून आर्थिक लाभ संभवतो. प्रकृतीच्या तक्रारी दूर होतील. संततीच्या उत्कर्षाची वार्ता कानी येईल. आपल्या संभाषण चतुर्याच्या जोरावर किचकट कामे मार्गी लावता येतील. उत्तरार्धात मनोरंजनाच्या कार्यक्रमात सहभागी व्हाल. कवी, कलाकार, गायक, वादक यांच्यासाठी हा आठवडा शुभफलदायी आहे.
शुभ दिनांक 22, 23

तूळ – आठवड्याच्या सुरुवातीला आपल्या राशीच्या भाग्यस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. भाग्येश बुध व्ययस्थानात स्वराशीत, तर राशी स्वामी शुक्र दशमस्थानात म्हणजेच आपल्या कर्मस्थानातून भ्रमण करत आहे. आपल्या अंगभूत कलागुणांना चांगला भाव मिळेल. कलाकार, गायक, वादक यांना नवीन संधी चालून येतील. कामानिमित्त परदेश प्रवास होतील. लाभस्थानातील स्वराशीतील रवीमुळे रेंगाळलेली सरकारी कामे मार्गी लागतील. हाती घेतलेली आम्ही जबाबदारीने पूर्ण कराल. नवीन ओळखी होतील. कर्क राशीतल्या शुक्रामुळे केमिकल्स, औषधे, सुगंधी द्रव्ये यांचे व्यावसायिकांना व्यवसायात चांगला फायदा होईल. लाभस्थानातील स्वराशीतील रवीमुळे तसेच स्वराशीतील बुधामुळे योग्य मार्गाने आणि अपेक्षेपेक्षा अधिक फायदा होईल. चांगले अनुभव येतील. दांपत्य जीवनात कुरबुरी वाढू देऊ नका. काही मतभेद असल्यास सामंजस्याने सोडवण्याचा प्रयत्न करा इतरांना हस्तक्षेप करू देऊ नका. वाहन चालवताना वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा.
शुभ दिनांक 22, 27.

वृश्चिक – आठवड्याच्या सुरुवातीला आपल्या राशीच्या अष्टमस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. त्यामुळे आठवड्याच्या सुरुवातीलाच काही मनस्वास्थ्य बिघडवणाऱ्या घटना घडण्याची शक्यता राहते. या आव्हानात्मक घटनांना सामोरे जाताना योग्य व्यक्तीचे मार्गदर्शन घ्यावे. गडबडून जाऊन चुकीचे कोणतेही निर्णय घेऊ नयेत. तसेच कौटुंबिक वादंग होणार नाहीत याचीही काळजी घ्यावी. भाग्यस्थानातील चंद्र शुक्राची युती कलाकारांना चांगल्या संधी देणारी राहील. जोडीदाराच्या उत्कर्षाची वार्ता कानी येईल. भागीदारी व्यवसायातून नवीन करार केले जातील. दशमस्थानातील म्हणजेच कर्मस्थानातील सिंह राशीतला रवी आपल्या मेहनतीला योग्य न्याय देणारा राहील. आपल्या कामाची वरिष्ठांकडून दखल घेतली जाईल बढती बदलीचे योग संभवतात. दशमस्थ स्वरशीच्या रवी मुळे हाती अधिकारी येतील. सामाजिक पत प्रतिष्ठा उंचावेल. मूळ प्रवेशद्वारापासून अथवा मुख्य रस्त्यापासून आतल्या बाजूला वास्तु घेण्याचा योग येईल. शुभ दिनांक – 26, 27.

धनु – आपल्या राशीच्या सप्तमस्थानातून चंद्राचे होणारे भ्रमण जोडीदाराच्या उत्कर्ष करणारे राहील. आपल्या मनाप्रमाणे घटना घडल्यामुळे आपण अतिशय आनंदी उत्साही राहाल. व्यवसाय उद्योगाच्या दृष्टीने ग्रहमान अतिशय अनुकूल असल्याने मोठे व्यावसायिक निर्णय घेतले जातील. नवीन करार केले जातील. मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाली केल्या जातील. मात्र कोणत्याही कागदपत्रावर सही करण्यापूर्वी त्याचा तपशील नजरेखाखालून घालणे अतिशय आवश्यक आहे. प्रवासात आपले खिसा पाकीट मौल्यवान वस्तू सांभाळा. आपली महत्त्वाकांक्षा तसेच जिद्द वाढवणारे हे ग्रहमान आपणास लाभले आहे. योग्य रीतीने घेतलेले निर्णय आपला भाग्योदय करणारे ठरतील. विवाहेच्छुक तरुणांचे परिचयोत्तर विवाह ठरतील. प्रियजनांच्या गाठीभेटी होतील. आठवड्याच्या उत्तरार्धात सामाजिक पत प्रतिष्ठा वाढवणाऱ्या घटना घडतील. नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील. मंगल कार्यात सहभागी व्हाल.
शुभ दिनांक – 27, 28

मकर – आठवड्याच्या सुरुवातीला आपल्या राशीच्या शत्रूस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. त्यामुळे हितशत्रूंच्या कारवायांना बळी पडू नका. आपली मते ठाम ठेवून निर्णय घ्या. मकर राशीचा स्वभाव आधीच गंभीर आणि त्यात राशीत शनी असल्यामुळे अधिकच भर पडली, परंतु सप्तमस्थानातून चंद्र शुक्राच्या भ्रमणामुळे जोडीदार मात्र मनमोकळेपणाने हसण्याच्या मूडमध्ये राहणार आहे. भागीदारी व्यवसायातून नवीन संधी चालून येतील. व्यवसाय उद्योगात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली जाईल. मोठ्या लोकांच्या ओळखीतून मध्यस्थीतून आपली कामे मार्गी लागण्यास मदत होईल. सरकार दरबारी पत प्रतिष्ठा वाढेल. जबाबदारीची कामे योग्य पद्धतीने पार पाडाल. कुटुंबातील वडीलधाऱ्या व्यक्तींच्या प्रकृतीची काळजी जाणवेल. स्थावर मालमत्तेतून अनपेक्षित लाभ होतील. आपल्या राशीतील शनीमुळे आपल्याला कठोर परिश्रम घ्यावेे लागणार आहेत. आपण घेतलेल्या श्रमांना भविष्यात योग्य न्याय मिळेल.
शुभ दिनांक – 24 ते 26

कुंभ – आठवड्याच्या सुरुवातीला आपल्या राशीच्या पंचमस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे दर षष्ठ स्थानात शुक्र व सप्तमस्थानात स्व-राशी रवी आहे संततीच्या हुशारीमुळे हजरजबाबीपणामुळे एखादे रेंगाळलेले काम मार्गी लागण्यात मदत होईल. संतती संबंधीची सुवार्ता कानी येईल. नोकरी व्यवसायात स्त्री अधिकारी व्यक्तींकडून सहकार्य लाभेल. बढती बदलीचे योग येतील. हाताखालील लोकांचे चांगले सहकार्य लाभेल. कामाची योग्य प्रकाराने आखणी आणि कार्यपूर्ती यामुळे वरिष्ठांची मर्जी संपादन केली जाईल. अपेक्षेपेक्षा जास्त लाभ झाल्यामुळे आनंदी, उत्साही आणि कार्यतत्पर राहाल. सामाजिक कार्यात विशेष सहभाग घेतला जाईल. उत्तरार्धात जोडीदाराचे चांगले सहकार्य लाभेल. कौटुंबिक शुभ समारंभात सहभागी व्हाल. आप्तस्वकीयांच्या गाठीभेटी होतील. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षातून चांगले यश लाभेल. मनोरंजनाच्या कार्यक्रमातून आनंद घ्याल. (August Weekly Horoscope)
शुभ दिनांक – 27, 28

मीन – राशीतून गुरु चे तर सुखस्थानातून चंद्राचे होणारे भ्रमण यामुळे कौटुंबिक शुभ समारंभात सहभागी व्हाल. संत-सज्जनांचा सहवास लाभेल. गृहसुशोभीकरणासाठी नवीन वस्तूंची खरेदी केली जाईल. कुटुंबात पाहुण्यांची वर्दळ राहील. पंचमस्थानातील शुक्र हा गुरुदृष्ट आहे. नवपरिणितांना गोड बातमीची चाहूल लागेल. मित्र परिवाराचे सहकार्य लाभेल. आपल्या अंगभूत कलागुणांना चांगला वाव मिळेल. मनोरंजनाच्या कार्यक्रमातून आनंद मिळेल. भविष्यकाळासाठी योग्य गुंतवणूक केली जाईल. नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांना नोकरी धंदा मिळू शकेल, पण फार मोठी उडी घेण्याचा हा काळ नाही, हे लक्षात ठेवावे. सरकार दरबारी रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. कर्ज मिळेल. प्रकृतीच्या तक्रारी दूर होतील. विद्यार्थ्यांना हा आठवडा अनपेक्षित यशप्राप्ती करून देणारा राहील. धाडसी निर्णय घेतले जातील. परंतु कोणत्याही प्रलोभनांना मात्र बळी पडू नका.
शुभ दिनांक – 25, 26
- श्री बालाजी ज्योतिषालय आणि वास्तू कन्सल्टन्सी, पुणे
9011149780 / 8668293104
टीप : या लेखातील माहिती आणि मते ही सर्वस्वी लेखकाची आहेत. क फॅक्टस टीम याची पुष्टी करत नाही. तसेच लेखकाच्या मतांशी आम्ही सहमत असू असेही नाही.