Home » ‘या’ मंदिरात होतो महाशिवरात्रीला चमत्कार!

‘या’ मंदिरात होतो महाशिवरात्रीला चमत्कार!

by Team Gajawaja
0 comment
bhootnath mandir
Share

उत्तराखंडला देवभूमी म्हटले जाते. भगवान शंकाराची अनेक स्थाने उत्तराखंडमध्ये आहेत. याच उत्तराखंडमधील ऋषिकेशच्या स्वर्गाश्रम परिसरातील जंगलांमध्ये भूतनाथ मंदिर आहे. भगवान शंकराच्या या मंदिरात महाशिवरात्रीसाठी विशेष सजावट करण्यास सुरुवात झाली आहे. 8 मार्च 2024 रोजी देशभर महाशिवरात्र साजरी होणार आहे. महाशिवरात्र आणि भूतनाथ मंदिर यांचे अनोखे नाते आहे. माता सतीबरोबर लग्न करण्यासाठी भगवान शंकर जेव्हा आपल्या गणांसह मिरवणुकीनं आले होते, तेव्हा त्यांची ही मिरवणूक याच मंदिरात थांबल्याची माहिती आहे. भगवान शंकरांची ही मिरवणूक हरिद्वारला जात होती. देव आणि भूतांसह निघालेल्या या मिरवणुकीसह भगवान शंकरांनी मणिकूट पर्वतावर मुक्काम केला. 1952 मध्ये स्वामी कैलाशानंद मिशन ट्रस्टने या ठिकाणी भूतनाथ (bhootnath mandir) मंदिर बांधले. भगवान शंकर आणि माता सती यांचा विवाह झाला तो महाशिवरात्रीचा दिवस असल्याची मान्यता आहे. त्या दिवशी या भूतनाथ मंदिरात भगवान शंकराच्या मिरवणुकीतील विविध वाद्यांच्या आवाजाचा भास होतो, अशी भक्तांनी धारणा आहे. सातमजली असलेल्या या मंदिराबाबत भक्तांमध्ये मोठी आस्था आहे.

पौराणिक कथांनुसार महाशिवरात्रीचे महत्त्व खूप आहे. याच दिवशी भगवान शंकर आणि माता सती यांचा विवाह झाला होता. यादिवशी भगवान शंकाराची आराधना केल्यास मनातील इच्छापूर्ण होतात असे सांगण्यात येते. यादिवशी भगवान शंकराच्या सर्वच मंदिरात भक्तांची गर्दी असते. मात्र उत्तराखंडमधील भूतनाथ मंदिरात भक्तांची अहोरात्र गर्दी असते. येत्या 8 मार्चला महाशिवरात्र येत असल्यानं या मंदिराची सजावट सुरु झाली आहे. भगवान शंकर आपल्या लग्नासाठी जात असतांना त्यांच्या मिरवणुकीनं येथे काही काळ विश्राम केला होता. या सात मजली भूतनाथ (bhootnath mandir) मंदिराच्या प्रत्येक मजल्यावर त्या घटनेची साक्ष सांगणारी भव्य चित्रे आहेत.

हे भूतनाथ (bhootnath mandir)  मंदिर जेथे आहे, त्या उत्तराखंडला भगवान शिवाची भूमी मानण्यात येते. तेथून कैलास पर्वताचे दर्शन घेता येते. याच भूमीवर असलेल्या भूतनाथ मंदिराला गुप्त मंदिर म्हणूनही ओळखण्यात येते. या मंदिरासंदर्भात स्थानिक अनेक कथा सांगतात. तसेच या भागात भगवान शंकाराचा वास असल्याचीही श्रद्धा शिवभक्तांमध्ये आहे. भूतनाथ मंदिरात अनेक चमत्कार होतात. महाशिवरात्रीला भगवान शंकराच्या मिरवणुकीतील वाद्यांचा आवाज येतो, असेही भाविक सांगतात. असे मानले जाते की, या मंदिरातील शिवलिंगाचे फक्त दर्शन केल्याने सर्व बाधा दूर होतात. त्याचबरोबर असाध्य रोग झालेले रोगीही या मंदिरात मोठ्या श्रद्धेनं येतात. या मंदिराचे वैशिष्ट म्हणजे, या मंदिराच्या सर्व परिसरात भगवान शंकाराचे अस्तित्व असल्याचे मानले जाते. त्यामुळे जे भक्त मंदिरात दर्शनासाठी येतात, ते या परिसरातील थोडी माती आपल्या घरी घेऊन जातात.

शिवाय जर कोणी व्यक्ती नैराश्याने आणि अंमली पदार्थांच्या व्यसनाने त्रस्त असेल, कोणाला मानसिक त्रास जाणवत असेल, तर अशांना आवर्जून या मंदिरात आणण्यात येते. येथे शिवलिंगाचे दर्शन घेतल्यावर अशा व्यक्तीच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होते, असे सांगितले जाते. या भूतनाथ मंदिरातील शिवलिंगाभोवती 10 घंटा बसवलेल्या आहेत. या प्रत्येक 10 घंटांमधून वेगवेगळे आवाज निघतात. आरतीच्या वेळी या दहाही घंटा एकत्रितरित्या वाजवण्यात येतात. मात्र तेव्हाही यातून वेगवेगळे आवाज निघतात. सात मजली असलेल्या या भूतनाथ मंदिराच्या (bhootnath mandir) पहिल्या मजल्यावर भगवान शंकराशी संबंधित कथांचे वर्णन आहे. भगवान शंकराच्या जिवनावरील अनेक चित्र येथे काढण्यात आली आहेत. तसेच मंदिराच्या प्रत्येक मजल्यावर हनुमान आणि नंदीशिवाय सर्व देवी-देवतांची चित्रे आहेत. सर्वात शेवटी म्हणजे, सातव्या मजल्यावर छोटेसे शिवमंदिर आहे. यात भगवान शंकर आणि त्यांच्या मिरवणुकीचे चित्रांच्या माध्यमातून वर्णन करण्यात आले आहे.

========

हे देखील पहा : उत्तरप्रदेश प्रयागराज येथे 2025 मध्ये महाकुंभ होणार 

========

भूतनाथ मंदिर (bhootnath mandir)  तीन बाजूंनी राजाजी राष्ट्रीय उद्यानाने वेढलेले आहे. या मंदिरातून हिरवाईसह संपूर्ण शहर दिसते. त्यामुळे उत्तराखंडमध्ये येणारे पर्यटक आवर्जून या मंदिराला भेट देतात. या संपूर्ण परिसारत घनदाट झाडी आहेत. असे सांगण्यात येते की, जेव्हा भगवान शंकाराची मिरवणूक आली होती, त्यात अनेक पशू पक्षीही होते. त्यापैकीच काही पशूपक्षी या भागात राहिले. त्यामुळे या पशूपक्षांना स्थानिक पूज्य मानतात. 8 मार्चसाठी या भागात मोठी गर्दी होणार असल्यानं स्थानिक प्रशासनानं आत्तापासून तयारी सुरु केली आहे.

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.