Home » भगवान महादेवांच्या अश्रूंनी झालेले तलाव

भगवान महादेवांच्या अश्रूंनी झालेले तलाव

by Team Gajawaja
0 comment
Mahadev
Share

भारत देश पूर्णपणे महादेवमय (Mahadev)  झाला आहे. महाशिवरात्री पर्वा निमित्तानं देशभरातील पवित्र ज्योतिर्लिंगांपासून ते छोट्या शिवमंदिरातही भक्तांची गर्दी झाली आहे. मात्र यासोबत आपल्या शेजारील पाकिस्तानातही शिवभक्तांची मोठी गर्दी एका मंदिरात झाली आहे. या मंदिराला पौराणिक महत्त्व आहे. जवळपास 5000 वर्ष जुने असलेले हे मंदिर महाभारतकालीन आहे. मुख्य म्हणजे, जेव्हा देवी सतीचा मृत्यू झाला, तेव्हा देवीच्या वियोगानं महादेवाच्या डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते. याच अश्रूंपासून दोन तलाव तयार झाले. त्यातील एक राजस्थानमधील पुष्कर येथे आहे, तर दुसरा तलाव पाकिस्तानमध्ये आहे. या तलावाला कटासराज कुंड म्हणतात, तर येथील शिवलिंगाची कटासराज महादेव (Mahadev)  म्हणून पुजा केली जाते. याच कटासराज महादेव मंदिराची मोठी आख्यायिका पौराणिक ग्रंथांमध्ये आहे. महादेवाच्या या जागृत स्थानाची आता दैना झाली असली तरी भारतातून काही मोजके शिवभक्त या ठिकाणी महाशिवरात्रीला जातात. यावर्षीही शंभरावर शिवभक्त या कटासराज मंदिरात जाऊन महाशिवरात्रीला महादेवाचे दर्शन घेणारा आहेत.

भारतापासून पाकिस्तान वेगळा देश झाला असला तरी हिंदू धर्मातील अनेक मंदिरे या देशात आहेत. धार्मिक वारसा सांगणा-या या पौराणिक मंदिरांचे हिंदू धर्मात अनन्य साधारण महत्त्व आहे. त्यापैकीच प्रमुख मंदिर म्हणजे, पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील चकवाल जिल्ह्यातील कटासराज धाम मंदिर. भगवान शिवाला (Mahadev) समर्पित हे मंदिर 5000 वर्षे जुने आहे. महाभारत काळापासून असलेल्या या मंदिराला दरवर्षी शेकडो भारतीय हिंदू भाविक भेट देतात. यावेळीही भारतातून या मंदिरात जाण्यासाठी शंभर भाविक पाकिस्तानात गेले आहेत.

कटास राज हे पाकिस्तानी पंजाबच्या उत्तरेकडील नमक कोह या पर्वताच्या रांगेत असलेले प्रसिद्ध हिंदू तीर्थक्षेत्र आहे. कटासराज मंदिराची उभारणी ही खटाना गुर्जर घराण्याने केल्याची माहिती आहे. या मंदिर परिसरात अन्य देवदेवतांचीही अनेक मंदिरे आहेत. दहाव्या शतकातील या मंदिरांचीही उभारणीही मोठ्या कलाकुसरीनं करण्यात आली आहे. माता पार्वतीच्या मृत्यूनंतर भगवान शंकराच्या (Mahadev) डोळ्यातून दोन अश्रू टपकले. एक अश्रू कटासवर पडला दुसरा अश्रू अजमेर राजस्थान येथे पडला. तिथे पुष्करराज तीर्थक्षेत्र आहे.

कटासराज मंदिर पाकिस्तानच्या चकवाल जिल्ह्यापासून 40 किमी अंतरावर आहे. या मंदिर संकुलात सात मंदिरे आहेत. असे मानले जाते की ज्या तलावाभोवती कटास मंदिर बांधले आहे ते भगवान शंकराच्या अश्रूंनी झालेले आहे. पौराणिक कथेनुसार भगवान शंकर आपली पत्नी सतीसह येथे वास्तव्यास होते. देवी सतीच्या मृत्यूनंतर शोकाकुल झालेल्या शिवाला (Mahadev) आपले अश्रू आवरता आले नाहीत. भगवान शंकर एवढे रडले की त्यांच्या अश्रूतून दोन तळी तयार झाली. एक कटासराज आणि दुसरी राजस्थानमधील पुष्करमध्ये तळे तयार झाले. कटासराजमंदिरात असलेल्या या तलावाला काटाक्ष कुंड असेही म्हणतात. तलाव आणि मंदिराचे नाव देखील याच नावावरुन पडले. कटस म्हणजे डोळ्यात पाणी.

दुसऱ्या आख्यायिकेनुसार, कटासराज हे तेच ठिकाण आहे जेथे पांडवांनी 12 वर्षाच्या वनवासात वास्तव्य केले. जंगलात भटकत असताना पांडवांना तहान लागली तेव्हा त्यांच्यापैकी एकजण कटाक्ष कुंडावर पाणी घेण्यासाठी गेला. त्यावेळी हा तलाव यक्षाच्या ताब्यात होता. त्यांनी पाणी घेण्यासाठी आलेल्या पांडवांना त्यांच्या प्रश्नाचे उत्तर दिल्यानंतरच पाणी घेण्यास सांगितले. मात्र चारही पांडवांना यक्षाच्या प्रश्नाचे उत्तर देता आले नाही. ते तलावाकाठी बेशुद्ध झाले. शेवटी युधिष्ठिर आले आणि त्यांनी सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे दिली. युधिष्ठिरावर यक्ष इतके प्रसन्न झाले की त्यांनी पांडवांना पुन्हा शुद्धीवर आणले आणि त्यांना पाणी प्यायला दिले.

==========

हे देखील पहा : शिवशंकराची पूजा आणि धोत्र्याच्या फळाचे महत्त्व

==========

या कटासराज मंदिर परिसरात बौद्ध धर्मासंबंधित 900 वर्षांपूर्वी बांधलेले बौद्ध स्तूप, वाड्या आणि मंदिरे आहेत. यापैकी बहुतेक मंदिरे भगवान शिवाला (Mahadev) समर्पित आहेत. तसेच भगवान हनुमान आणि राम यांचीही मंदिर आहेत. याच मंदिर संकुलात एका प्राचीन गुरुद्वाराचे अवशेषही आहेत. 19व्या शतकात येथे गुरू नानक आल्याची माहिती आहे. या मंदिरांच्या वास्तुकलेवर काश्मिरी कलेचा प्रभाव आहे. ही सर्व मंदिरे चौकोनी असून मंदिरांच्या भिंतींवर भिंतीवरील चित्रेही पाहायला मिळतात.

आता हा सर्व भाग ओसाड झाला आहे. जिथे हजारो वर्षापूर्वी भगवान शंकराचे वास्तव्य होते, तो भाग पाकिस्तानमधील शासकांच्या दुर्लक्षामुळे दुरावस्थेत आहे. मात्र या भागात आजही शिवरात्रीनिमित्त येथे मोठी गर्दी होते. भगवान शिवाची पुजा करतांना आलेले भक्त कटासराज तलावात स्नान करतात आणि ओल्यात्यानं भगवान शंकराची (Mahadev) आराधना करतात. यावेळी वाघा बॉर्डरमार्गे भारतातून काही भाविक या मंदिरात गेले आहेत. हे भाविक 10 मार्च रोजी कटासहून लाहोरला परततील. लाहोरला आल्यानंतर ते 11 मार्चला कृष्ण मंदिराला भेट देणार आहेत. यासोबतच लाहोरचा किल्लाही हे भक्त बघणार आहेत. प्रभू रामचंद्रांचे पुत्र लव यांनी या किल्ल्याची उभारणी केल्याची माहिती आहे.

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.