Home » युद्धाची झळ धरणाला…

युद्धाची झळ धरणाला…

by Team Gajawaja
0 comment
War
Share

रशिया-युक्रेन युद्ध कधी संपणार या प्रश्नाचे उत्तर कधी मिळणार हे स्पष्ट होत नाही. दिवसेंदिवस या युद्धाला वेगवेगळे रंग चढत असून यासर्वात सर्वसामान्य जनतेचा बळी जात आहे. नुकतेच या युद्धाचे भयावह रुप पुढे आहे. युक्रेनमधील सर्वात महत्त्वाचे काखोव्का नावाचे धरण फुटले आहे. या धरणावर रशियातर्फे स्फोटके टाकण्यात आल्याचा आरोप आहे. या धरणातून युक्रेनमधील बहुतांश नागरिकांपर्यंत पाणीपुरवठा होत आहे. आता झालेल्या स्फोटामुळे या सर्वांसाठी भविष्यात पाण्याचा मोठा प्रश्न उभा राहिला आहेच, शिवाय हे धरण फुटल्यानंतर त्याच्या पाण्यामुळे सर्वत्र विध्वंस झाला आहे. युक्रेनचा मोठा भाग पाण्याखाली गेला आहे. अनेकांचे जीव गेले आहेत, शिवाय अन्नधान्यासह इतर जीवनावश्यक वस्तूही पाण्यात गेल्या आहेत. त्यामुळे आधीच युद्धामुळे जर्जर झालेले युक्रेनचे नागरिक अधिक जर्जर झाले आहेत. (War) 

रशिया युक्रेन युद्धाचे अनेक दुर्दैवी परिणाम आहेत. हे परिणाम लगेच दिसणार नाहीत. तसेच एखाद-दोन वर्षही याचा परिणाम राहणार नाही तर तो जास्त काळ राहिल. ज्याप्रमाणे जपानवर झालेल्या अणुहल्ल्याच्या काळ्या आठवणी अजूनही आहेत, तसेच युक्रेनचे नागरिक या युद्धाच्या आठवणी काही काळ लक्षात ठेवणार आहेत. त्याला तशीच कारणं आहेत. या युद्धामुळे अनेकांनी आपलं घर गमावलं आहे. घरातील कर्ती माणसं गमावली आहेत. हजारो मुलांचे अपहरण झाले आहे. तर मुलींवर अत्याचार झाले आहे. या गोष्टी लगेच जगासमोर येणार नाहीत. पण त्या समोर आल्या की, या युद्धाचे परिणाम किती व्यापक होते, हे स्पष्ट होणार आहे. यातच आता पाण्याच्या टंचाईची भर पडणार आहे. युक्रेनच्या खेरसन भागात असलेल्या नोव्हा काखोव्का धरणात मोठा स्फोट करुन हे धरण भुईसपाट करण्यात आले. (War)

रशियन सैन्याने पहाटे हे धरण उडवले. हे धरण युक्रेनमधील सर्वात मोठे धरण होते. त्यात पाण्याचा साठाही मोठा होता. पहाटेच्या वेळी ही घटना झाल्यामुळे या पाण्याच्या लोंढ्यात नागरी वस्तीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या धरणाजवळील 80 गावे पूर्णपणे वाहून गेली आहेत. या गावातील हजारो नागरिकांचे जीव धोक्यातच आले शिवाय त्यांची सगळी जमापुंजीही पाण्याच्या लोंढ्यात नष्ट झाली आहे. अचानक  मोठे आवाज होत पहाटेच्या वेळी झालेल्या या घटनेनंतर परिसरात घबराटीचे वातावरण पसरले. सुरुवातीला कोणालाही धरणावर स्फोट करण्यात आले आहेत, याचा अंदाज आला नाही. पण जेव्हा ही घटना समजली, तोपर्यंत पाण्याचे मोठे लोंढे आले आणि सर्व गावं जवळपास नष्ट झाली आहेत. धरण  फुटल्यानंतर पाणी वाढतच गेले आणि धरणाजवळील 80 गावे पूर्णपणे वाहून गेल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणाची माहिती मिळताच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी सदर ठिकाणी तातडीने मदत रवाना केली. या घटनेचा त्यांनी दहशतवादी कृत्य म्हणून उल्लेख केला आहे. (War)

नोव्हा काखोव्का धरण फुटल्यानं आलेल्या पुरामुळे अनेक नागरिक आपल्या घरात अडकले आहेत. त्यांना या पुरातून बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. नीपर नदीवर बांधलेले हे धरण तुटल्यामुळे 4.8 अब्ज गॅलन पाणी खेरसन शहरात आले आहे. रशियानं युक्रेनवर हल्ला केला तेव्हापासून या धरणाला धोका असल्याचे युक्रेनचे राष्ट्रध्यक्ष झेलेन्स्की सांगत आहेत. त्यांना वाटणारी भीती खरी ठरली असून या धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या लाखो नागरिकांना आता पुढचे काही वर्ष पाण्याच्या मोठ्या गंभीर समस्येला सामोरे जावे लागणार आहे.(War)  

======

हे देखील वाचा : नवऱ्याची नोकरी गेल्यानंतर बायकोने असे सांभाळावे घर

======

या धरणाच्या स्फोटाचा व्हिडिओही सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. यामधून काही सेकंदात युक्रेनमध्ये कसा प्रलय घडला हे पाहता येत आहे. धरणाजवळ असलेल्या 80 गावांमध्ये सध्या पूरस्थिती आहे. युक्रेन पूरग्रस्त भागातून सुमारे 17,000 लोकांना बाहेर काढणार आहे. धरणात झालेल्या स्फोटामुळे काही जणांचा मृत्यू झाला असून काही जण जखमी झाले आहेत. या भागातील आपत्ती अभूतपूर्व असल्याचे म्हटले जात आहे. मुळात धरणातून सातत्यानं होणारा पाण्याचा प्रवाह कधी थांबेल हे सांगणे शक्य नाही. अचानक पाण्याचे लोंढा येत आहेत.  त्यामुळे नागरिकांना घरातून बाहेर पडण्यासाठी बोटींची मदत घ्यावी लागत आहे. अनेकांनी घातलेल्या कपड्यांवर घर सोडले आहे. नोव्हा काखोव्का धरण जलविद्युत प्रकल्पाचा भाग होते. या धरणातून झॅपसोरिझिया अणुऊर्जा प्रकल्पालाही पाणीपुरवठा केला जात असे. त्यामुळे संपूर्ण युक्रेनमध्ये विजेचाही प्रश्न उभा राहणार आहे. डनिपर नदीवर असलेले नोव्हा काखोव्का धरण 30 मीटर उंच होते. 3.2 किमी क्षेत्रात धरण होते. 1956 मध्ये सोव्हिएत राजवटीत हे धरण बांधले गेले होते. या धरणाबाबत एक किस्सा म्हणजे, हिटलरच्या सैन्याला रोखण्यासाठी 1941 मध्येही हे धरण अशाच प्रकारे फोडण्यात आले होते. आता तेच धरण रशियानं स्फोट करुन उडवल्याचा आरोप होत असला तरी रशियानं हे आरोप फेटाळले आहेत. उलट युक्रेननंच धरण फोडल्याचे रशियाचे म्हणणे आहे. हा वाद कधीही सुटणारा नसला तरी, या घटनेमुळे भविष्यात जर आणखी काही युद्ध झाले तर त्याचे भयानक रुप कसे असेल याची एक झलकच मिळाली आहे.  

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.