Home » ‘या’ राजकारणी महिलेने कोरोनामुळे दुसऱ्यांदा लग्नाची तारीख पुढे ढकलली

‘या’ राजकारणी महिलेने कोरोनामुळे दुसऱ्यांदा लग्नाची तारीख पुढे ढकलली

by Team Gajawaja
0 comment
जैसिंडा आर्डेन Jacinda Ardern
Share

जागतिक राजकारणात महिला राजकारणी अगदी हाताच्या बोटावर आहेत. ज्यांचा उल्लेख कायम मानानं आणि अग्रक्रमानं घेण्यात येतो. त्यामध्ये भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी, ब्रिटनच्या पंतप्रधान मार्गारेट थॅचर, जर्मनीच्या चांन्सलर एंजेला मर्केल आणि न्युझिलंडच्या पंतप्रधान जैसिंडा आर्डेन (Jacinda Ardern) यांची नावं सामील आहेत. 

जैसिंडा सर्वात तरुण पंतप्रधान म्हणून ओळखल्या जातात. भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याप्रमाणेच न्युझिलंडच्या पंतप्रधान जैसिंडा आर्डेन यांनी पंतप्रधानपदाची धुरा सांभाळल्यावर अनेक धाडसी निर्णय घेतले आहेत. याचा सकारात्मक परिणाम झाला असून, यामुळे त्यांच्या लोकप्रियतेत भर पडली आहे. विशेषतः कोरोना काळात जैसिंडा यांनी प्रशासनावर पकड ठेऊन देशात अत्यंत कडक निर्बंध लागू केले आणि त्यांचे पालनही केले. परिणामी कोरोनामुक्त देशांमध्ये न्यूझीलंडचा नंबर लागला.

न्यूझिलंडमध्ये आत्तापर्यंत पंधरा हजार कोरोनाच्या रुग्णांची नोंद झाली असून, बावन्न रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अन्य देशांच्या तुलनेत ही रुग्ण संख्या अत्यंत कमी आहे. याचे सर्व श्रेय पंतप्रधान जैसिंडा आर्डेन (Jacinda Ardern) यांनी राबविलेल्या उपाययोजनांना जाते.

जैसिंडा आर्डेन यांनी फक्त देशावरच निर्बंध घातले नाहीत, तर ते निर्बंध त्यांनी स्वतःवरही लावून घेतले. त्या अत्यंत हुशार असून त्यांनी घेतलेल्या एका निर्णयाचं जागतिक स्तरावर कौतुक केलं गेलं. हा निर्णय म्हणजे त्यांच्या स्वतःच्या लग्नाबाबतचा निर्णय. कोरोनाच्या संक्रमणाचा धोका लक्षात घेऊन त्यांनी त्यांचे लग्न पुढे ढकलले आहे. 

Who Is Jacinda Ardern's Fiance Clarke Gayford? Know All About New Zealand  PM's Partner

“सध्या न्यूझिलंडमध्ये शंभरहून अधिक नागरिक एकत्र येऊ शकत नाहीत. चार वर्षावरील सर्व मुलांना मास्क अत्यावश्यक आहे. देशात असे कडक निर्बंध असताना मला लग्न करता येणार नाही. मी पंतप्रधान असले, तरी प्रथम मी या देशाची नागरिक आहे आणि नियम सर्वांसाठी सारखे आहेत.” असे बोलून जैसिंडा यांनी आपल्या निर्णयांचे समर्थन केले.

जैसिंडा यांचा विवाह क्लार्क गेफोर्ड (Clarke Gayford) यांच्याबरोबर होणार होता. पण कोरोनाच्या निर्बंधांमुळे जैसिंडा यांनी आपला विवाहसोहळा दुसऱ्यांदा पुढे ढकलला आहे. “याला जीवन ऐसे नाव”, असे म्हणत जैसिंडा यांनी आपल्या कृतीचे समर्थन केले. हा निर्णय घेतल्यानंतर काही दिवसातच जैसिंडा कोरोना रुग्णांच्या संपर्कात आल्या. याबरोबर त्यांनी त्वरित कोरोना निर्बंधानुसार स्वतःला आयसोलेटेड करुन घेतले.  

जैसिंडा यांच्या या निर्णयामुळे न्युझिलंडमध्ये त्यांच्या लोकप्रियतेत भर पडली आहेच. शिवाय ज्या पद्धतीनं जैसिंडा जागतिक राजकारणात पुढे येत आहेत, त्यावरुन भविष्यात जागतिक राजकारणात त्यांचे स्थान अव्वल असेल, असे मानले जाते.  

वयाच्या ३७ व्या वर्षी, २०१७ मध्ये जैसिंडा आर्डेन (Jacinda Ardern) या न्यूझीलंडच्या पंतप्रधान झाल्या.  त्यांना आणि त्यांचे नियोजीत पती क्लार्क गेफोर्ड यांना नीव ते अरोहा अर्डन गेफॉर्ड ही चार वर्षाची मुलगीही आहे. पंतप्रधानपदावर असताना आई झालेल्या जैसिंडा या जगातील दुसऱ्या महिला ठरल्या आहेत. यापूर्वी पाकिस्तानच्या पंतप्रधान बेनझीर भुट्टो या पंतप्रधान पदावर असतांना आई झाल्या होत्या. 

जैसिंडा आर्डेन Jacinda Ardern

जैसिंडा यांचा जीवनप्रवास लक्षवेधक आहे. २६ जुलै १९८ रोजी जैसिंडा आर्डेन (Jacinda Ardern) यांचा जन्म झाला. त्यांचे वडील पोलीस अधिकारी, तर आई एका शाळेत व्यवस्थापक म्हणून काम करत होती. सामान्य कुटुंबात जैसिंडा यांचे बालपण गेले. वाइकाटो विश्वविद्यालयात त्यांनी राजनिती आणि जनसंपर्क या विषयांमध्ये पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. तिथे त्या विद्यार्थी प्रतिनिधी होत्या. त्यानंतर जैसिंडा पंतप्रधान हेलेन क्लार्क यांच्या कार्यालयात सहाय्यक म्हणून काम करत होत्या.  

जैसिंडा आर्डेन (Jacinda Ardern) यांना ब्रिटेनचे पंतप्रधान टोनी ब्लेअर यांच्या कार्यालयातही निती सल्लागार म्हणून काम करण्याची त्यांना संधी मिळाली. इंटरनॅशनल युनियन ऑफ सोशलिस्ट युथच्या अध्यक्षपदाची धुराही जैसिंडा यांनी सांभाळली आहे. 

जैसिंडा यांची एक नातेवाईक लेबर पार्टीची सदस्य होती. त्यांनी निवडणुकीच्या प्रचार कार्यात सहाय्यक म्हणून जैसिंडा यांची मदत घेतली. तेव्हाच जैसिंडा यांनी आपल्या देशातील राजकीय परिस्थितीचा अभ्यास करुन लेबर पार्टीमध्ये प्रवेश केला. एक अभ्यासू नेता म्हणून ओळख मिळवत पार्टीमध्ये अव्वल स्थान पटकवत पंतप्रधान पदाकडे वाटचाल केली.  

हे ही वाचा: उघड्या डोळ्यांनी बघता येणार धूमकेतू आणि ग्रहांच्या स्वर्गीय भेटी! २०२२ मध्ये घडणार १५ विशेष खगोलशास्त्रीय घटना

चीनमुळे कर्जबाजारी झालेल्या ‘या’ देशाला भारत देतोय मदतीचा हात

जैसिंडा आर्डेन (Jacinda Ardern) या स्वतंत्र विचाराच्या महिला आहेत. संयुक्त राष्ट्र महासभेत त्यांनी आपल्या लहान मुलीसोबत हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांच्या स्वतंत्र्य बाण्याकडे अवघ्या जगाचे लक्ष वेधले होते.  

आत्ताही त्यांनी लग्नाचा बेत पुढे करुन देशातील जनतेला चांगला संदेश दिला आहे. जैसिंडा आर्डेन ज्याप्रमाणे लोकप्रिय ठरत आहेत, त्यावरुन चाळीशीच्या जवळपास पोहचलेल्या जैसिंडा या भविष्यात जागतिक राजकारणात अव्वल स्थानी असतील, यात शंकाच नाही. 

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.