Home » ‘हे’ आहे तरंगणारे एकमेव सरोवर

‘हे’ आहे तरंगणारे एकमेव सरोवर

by Team Gajawaja
0 comment
Manipur Tourism
Share

जागतिक पाणथळ प्रदेश दिवस नुकताच, म्हणजे  2 फेब्रुवारीला साजरा झाला.  पण पाणथळ प्रदेश म्हणजे काय, हा प्रश्न अनेकांना पडतो.  पाणथळ प्रदेश, म्हणजे वैटलँड.  वैटलँड म्हणजे आर्द्र जमीन किंवा ओलसर जमीन. जमिनीच्या ज्या भागामध्ये पाणी आणि जमीन एकत्र येतात त्याला वैटलँड म्हणतात. वर्षभर किंवा वर्षातील बहुतेक महिने पाण्याने भरलेली जमीन.  पर्यावरणाच्या दृष्टीने वैटलँड चे महत्त्व जाणून 1997 मध्ये प्रथमच वैटलँड दिवस साजरा करण्यात आला.  वैटलँडमुळे जलप्रदूषण होण्यास अटकाव होतो.  पाण्यावर अवलंबून असलेल्या जीवसृष्टीसाठी या भागाचे अनन्य साधारण महत्त्व आहे, तसेच पाण्याच्या आतील औषधी वनस्पतींनाही याची गरज आहे.  असेच एक वैटलँड भारतात आहे, ज्याला जगातील एकमेव तरंगणारे सरोवर असल्याचा मान मिळाला आहे. (Manipur Tourism)

हा तरंगणारा तलाव म्हणजे, निसर्गाचा अदभूत चमत्कार आहे.  आणि तो बघण्यासाठी अनेक पर्यटकांची गर्दी असते.  सोबतच अनेक पक्षीतज्ञ आणि वनस्पती तज्ञही या तरंगणा-या तलावाला भेट देतात.  हा तरंगणारा तलाव आहे ईशान्य भारतात.  मणिपूर राज्यातील लोकटक हा तरंगारा तलाव जगातील एकमेव आहे.  अनेक वैशिष्ट्यांनी परिपूर्ण असलेल्या या तलावाला बघण्यासाठी अनेक पर्यटक मणिपूरला भेट देतात.  

Manipur Tourism

ईशान्य भारतातील मणिपूरमध्ये असलेला लोकटक तलाव म्हणजे, निसर्गाची मोठी देणगी आहे.  हा तलाव मोइरांग येथे आहे.  अनेक वैशिष्ट्यांनी भरलेला हा लोकटक तलाव अतिशय सुंदर आणि भव्य आहे.  लोकटक तलावाचे प्रमुख वैशिष्ट म्हणजे हा जगातील एकमेव तलाव आहे जो तरंगत असल्यासारखे दिसते.  त्यामुळेच या तलावाला तरंगणारा तलाव असेही म्हटले जाते.  मणिपूरमधील जनतेच्या अनेक नित्य गरजा पूर्ण करणारा हा लोकटक तलाव त्याच्या याच वैशिष्ट्यामुळे जगभर प्रसिद्ध आहे. (Manipur Tourism)

या तलावाच्या पृष्ठभागावर तरंगणाऱ्या वनस्पती आहेत.  पाण्यावर झाडांच्या कुंड्या तरंगत आहेत, असा भास त्यातून होतो.  या तलावाचे एकूण क्षेत्रफळ सुमारे 280 चौरस किमी आहे. या तलावात अनेक छोटी छोटी बेटे तरंगत आहेत.  त्यातील सर्वात मोठ्या बेटाला केबुल लमजाओ हे नाव आहे.  त्याचे  क्षेत्रफळ 40 चौरस किमी आहे.  या केबुल लमजाओ बेटाचेही वेगळे वैशिष्ट आहे.  येथे संगाई हरीणे मोठ्या संख्येनं आढळतात.  हरीणांमधील संगाई हरीणे ही लुप्तप्राय प्रजाती मानण्यात येते.  त्यामुळे या हरीणांना मोठ्या संख्येनं बघायचे असेल तर याच लोकटक बेटाला भेट द्यावी लागते.  संगाई हरीण हा मणिपूरचा राज्य प्राणीही आहे.  याशिवाय रुसेर्वस एल्डी एल्डी किंवा मणिपूर ब्रो-एंटलेर्ड हरीण यांचेही नैसर्गिक आश्रयस्थान हेच लोकटक तलाव आहे.  

या लोकटक तलावाच्या मध्ये मध्ये तरंगणा-या वनस्पती, माती यामुळे काही क्षेत्र अतिशय कठिण तयार झाले आहे.  त्यावर मुक्तपण चालताही येऊ शकते.  याच भागात अनेक दुर्मिळ फुलांच्या प्रजातीही आढळून येतात.  लोकटक तलावातील 40 चौरस किलोमीटर वर्तुळाकार भागाला  भारत सरकारने केबुल लामजाओ  असे नाव देऊन राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा दिला आहे. केबुल लामजाओ राष्ट्रीय उद्यान हे जगातील एकमेव तरंगणारे राष्ट्रीय उद्यान आहे.  या उद्यानाला पहाणारे पर्यटक त्याच्या सौदर्यात आणि तेथील जैव विविधतेत हरवून जातात.  (Manipur Tourism)

या लोकटक तलावातील याच जैव विविधतेमुळे मणिपूरी जनतेच्या आयुष्यात या तलावाचे मोठे महत्त्व आहे.  लोकटक तलाव हे स्थानिक जनतेची जीवनरेखा असल्याचेही सांगितले जाते.  याच तलावाच्या पाण्यावर मणिपूरमध्ये जलविद्युत निर्मिती होते.  सिंचन आणि पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यासाठी येथील पाण्याचा स्त्रोत वापरला जातो. परिसरातील ग्रामीण मच्छिमारांसाठीही हा तलाव उदरनिर्वाहाचे साधन आहे.  मणिपूरच्या मत्स्यव्यवसाय विभागाने मत्स्यव्यवसाय विकासासाठी या परिसरातील टकमू पाट येथे मत्स्यव्यवसाय केंद्र स्थापन केले आहे. 

=============

हे देखील वाचा : उत्तराखंडातील या मंदिरात डोळ्यांवर पट्टी बांधून देवाची केली जाते पूजा

=============

या सर्वांमुळेच लोकटक तलाव पर्यटकांना आकर्षून घेते.  या तलाव क्षेत्रात  तरंगणाऱ्या पानांच्या जलीय मॅक्रोफाइट्सच्या 233 प्रजाती आढळतात.  तर इचॉर्निया क्रॅसिप्स, फ्रॅगमाइट्स कर्का, ओरिझा सॅटिवा, झिझानिया लॅटिफोलिया, सॅकरम लॅटिफोलियम, एरिअनथस पुसेरस, सारख्या दुर्मिळ वनस्पतींच्या प्रजातींचा अभ्यास करण्यासाठी अनेक संशोधक या भागाला भेट देतात.   या भागातील हवामानही सदैव अल्हाददायक असते.  त्यामुळे ईशान्य भारताला भेट द्यायची असेल तर त्यात मणिपूरमधील लोकटक तलावाचा समावेश नक्की हवा.  

सई बने.  

 


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.