गणपती विसर्जन झाले आणि आता सध्या पितृपक्ष सुरु आहे. दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमेपासून हा 15 दिवसांचा पितृपक्षाचा काळ सुरू होतो. यादरम्यान आपल्या पूर्वजांच्या पितरांच्या आत्म्याला शांती मिळावी आणि आपल्याला त्यांचा आशीर्वाद मिळावा यासाठी त्यांचे श्राद्ध, तर्पण करत विविध उपाय केले जातात.
अशी मान्यता आहे की, या पितृपक्षातील काळात आपले पूर्वज पितृलोकातून पृथ्वीवर येतात. त्यामुळे त्यांच्या निधन झालेल्या तिथीनुसार त्यांचे श्राद्ध करत त्यांच्या शांतीसाठी विविध धार्मिक विधी केले जातात. याच पितृपक्षातील एक तिथी म्हणजे ‘अविधवा नवमी’. अतिशय महत्वाची तिथी म्हणून हा दिवस ओळखला जातो. या दिवशी सौभाग्यवती निधन झालेल्या महिलांचे श्राद्ध करण्याची पद्धत आहे. यंदा 25 सप्टेंबरला ही अविधवा नवमी आहे. या दिवसाचे महत्व आणि इतर माहिती जाणून घेऊया.
मातृ नवमी ही भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या नवव्या तिथीला येते. या दिवशी मरण पावलेली आई, सुना आणि परिवारातील इतर विवाहित महिला ज्या सवाष्ण म्हणून मरण पावलेल्या त्या महिलांसाठी पिंड दान केले जाते. याला मातृ नवमी श्राद्ध म्हणतात. याला नवमी श्राद्ध आणि अविधवा श्राद्ध असेही म्हणतात.
पती जिवंत असताना ज्या स्त्रीचे निधन होते, तिच्या शांतीसाठी केलेल्या श्राद्धला अविधवा नवमीचे श्राद्ध म्हटले जाते. सवाष्ण स्त्रीला मरण प्राप्त झाल्यानंतर तिच्यासाठी मुलांनी किंवा तिच्या पतीने पितृपक्षातील नवमीस पार्वणाविधीने ‘अविधवा नवमी श्राद्ध’ करण्याबद्दल आपल्या शास्त्रात सांगितले जाते. सवाष्ण म्हणून मरण आल्यानंतर त्या स्त्रीची गणना सधवा म्हणून होते. तिच्या पतीचे निधन झाल्यानंतर देखील ती सधवाच असते.
सवाष्ण स्त्रीचे निधन झाल्यानंतर पितृपक्षातील ‘अविधवा नवमी’ तिथीला तिचे श्राद्ध तिचा पती अथवा तिचा मुलगा करू शकतात. मुलाची मुंज झालेली नसली तरी त्याला हे श्राद्ध करण्याचा अधिकार दिला आहे. पतीच्या निधनानंतर मुलं हे श्राद्ध करू शकतात. तर मुलाच्या निधनानंतर त्याच्या मुलाला आपल्या आजीचे श्राद्ध केले नाही तरी चालते.
अविधवा नवमीच्या दिवशी घरी श्राद्धाच्या नैवेद्याचा सर्व परंपरा आणि रितीनुसार स्वयंपाक करावा. गेलेल्या व्यक्तीच्या आवडीच्या पदार्थांचा देखील या खास समावेश असावा. शिवाय या दिवशी घरी सवाष्णीला बोलावून तिला जेवू घालावे. साडी, दक्षिणा आणि इतर सौभाग्य अलंकार आणि भेट देऊन तिची पाठवणी करावी. या दिवशी तुम्ही घरात सवाष्णीला जेवू घालणे लाभदायक ठरते.
======
हे देखील वाचा : महेश कोठारे आणि सचिन यांचे नाते कसे आहे..?
======
संसार अर्ध्यातून सोडून ज्या स्त्रिया मधेच मरण पावतात अशा स्त्रिया त्यांच्या अपूर्ण इच्छा आकांक्षा, मुलांची काळजी, कुटुंबाची काळजी यातच अडकून राहतात. गेलेल्या स्त्रीचा आत्मा संतुष्ट व्हावा, तिची काळजी मिटावी, म्हणून अविधवा नवमी श्राद्ध केले जाते.
ही तिथी दिवंगत सौभाग्यवती गेलेल्या स्त्रियांसाठी राखून ठेवलेली असली, तरीदेखील श्राद्धाच्या इतर दिवशी विधवा मातांप्रतीदेखील तेवढाच आदरभाव आपल्या शास्त्रात आणि धर्मात दाखवला आहे. या दिवशी आपल्या दिवंगत सवाष्ण स्त्रियांचे श्राद्ध केल्याने आशीर्वाद प्राप्त होतो. जमल्यास पितृ पक्षातील मातृ नवमीच्या दिवशी गरीब ब्राह्मण स्त्रीला आदरपूर्वक आपल्या घरी बोलावून जेवण द्यावे आणि दान करावे.