अयोध्येतील भगवान श्रीरामांच्या भव्य मंदिरामध्ये पुन्हा एकदा लगबग सुरु झाली आहे. रामलल्लाच्या अभिषेकानंतर श्री राम मंदिरात आणखी एक ऐतिहासिक आणि भव्य धार्मिक सोहळा होणार आहे. गंगा दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर, राम मंदिरातील भव्य राम दरबाराचा अभिषेक सोहळा होणार आहे. हा सोहळा होणार आहे, त्या दिवशीही अतिशय दुर्मिळ योग आहे. हा सर्व सोहळा 2 ते 5 जून दरम्यान होणार आहे. यातील मुख्य अभिषेक सोहळा 5 जून रोजी होणार असून या दिवशी द्वापर युगासारखा शुभ योग आहे. त्याच योगावर राम दरबाराची प्राणप्रतिष्ठा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते आणि देशभरातील साधू संतांच्या उपस्थितीत होणार आहे. (Ayodhya)
22 जानेवारी 2024 रोजी, संपूर्ण जगाने उत्तर प्रदेशमधील अयोध्येत झालेला श्रीराम मंदिराचा भव्य अभिषेक सोहळा पाहिला होता. या सोहळ्यानंतर हे राम मंदिर भाविकांना खुले करण्यात आले. त्यानंतर रोज लाखो रामभक्त अयोध्येत दाखल होत असून श्रीरामांचे दर्शन घेत आहेत. या रामभक्तांसाठी या भव्य मंदिरातील आणखी एक मजला आता खुला करण्यात येणार आहे. त्यात रामदरबार असून या रामदरबाराचा अभिषेक सोहळाही मान्यवरांच्या उपस्थितीत आणि विशिष्ट मुहूर्तावर होणार आहे. 5 जून रोजी गंगा दस-याच्या शुभ मुहूर्तावर हा सोहळा होणार आहे. या सोहळ्याआधी होणारे पवित्र विधी सुरु झाले आहेत. (Latest News)
चार युगांपैकी एक असलेल्या द्वापर युगात ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दशमी तिथीला गंगा दसरा सुरू झाला. या वर्षी गंगा दसरा 5 जून रोजी आहे. माता गंगा याच दिवशी पृथ्वीवर आली. त्यामुळे हाच दिवस अयोध्येतील श्रीराम मंदिरात असलेल्या राम दरबाराच्या अभिषेकासाठी निवडण्यात आला आहे. 5 जून रोजी हा सोहळा भल्या पहाटेपासून सुरु होणार आहे. या प्रमुख सोहळ्या व्यतिरिक्त श्रीराम मंदिरात आता अन्य पूजा विधीही सुरु झाले आहेत. (Ayodhya)
31 मे रोजी येथील शिव मंदिरातील शिवलिंगाचा अभिषेक करण्यात येणार आहे. 2 जून रोजी रामदरबाराच्या प्राणप्रतिष्ठेचा विधी सुरु होईल. यासाठी अयोध्येत भव्य अशी कलश यात्रा काढण्यात येणार आहे. 3 जून रोजी यज्ञ मंडपात पूजा करण्यात येणार आहे. यात पंचांग पूजन, यज्ञमंडप पूजन, देवतांचे आवाहन, ग्रह यज्ञ, अग्निस्थापना, हवन आणि मूर्तींना जलस्नान असे सोहळे होणार आहेत. यानंतर 4 जून रोजी विविध अधिवास आणि पालखी यात्रा काढल्या जातील. मुख्य सोहळा 5 जून रोजी होणार आहे. यात राम परकोटाबाहेरील सात मंदिरांमध्ये आणि राम मंदिराच्या पहिल्या मजल्यावरील राम दरबारातील सात देवतांचा अभिषेक करण्यात येणार आहे. शिवाय शेषवतार मंदिरात लक्ष्मण मुर्तीवरही भव्य असा अभिषेक सोहळा होणार आहे. हा सगळा सोहळा अभिजित मुहूर्तावर सकाळी 11:25 ते 11:40 पर्यंत होणार आहे. पण त्याआधी श्री राम मंदिरात पहाटे 2.30 वाजताच पूजा विधी सुरु कऱण्यात येणार आहेत. या सर्व सोहळ्याला उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. (Latest News)
श्रीराम मंदिराच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या भव्य राम दरबारात भगवान श्री राम, माता सीता, भाऊ लक्ष्मण आणि हनुमानजी विराजमान आहेत. किल्ल्यात बांधलेल्या इतर सहा मंदिरांमध्येही देवतांच्या मूर्ती आहेत. या सर्वांचा अभिषेक 5 जून रोजी गंगा दशहराच्या निमित्ताने एकत्रितपणे केला जाईल. यासाठी होणा-या सोहळ्यासाठी काशी पीठाधीश्वर शंकराचार्य स्वामी अवधेशानंद गिरी, आचार्य विद्या रामानुजाचार्य स्वामी, सौभाग्य नारायणाचार्य स्वामी, पंडित इंद्रेश मिश्रा आणि आचार्य प्रवीण शर्मा यांनाही दिल्लीहून खास आमंत्रित करण्यात आले आहे. शिवाय देशभरातील मान्यवर साधू, संत, दक्षिण भारतातील वैदिक आचार्य आणि पीठाधीश्वर सोहळ्यात सहभागी होणार आहेत. (Ayodhya)
================
हे देखील वाचा : Egypt : 5000 वर्षापूर्वीच्या राणीच्या थडग्यात सापडलं असं काही !
Lucknow Case : शेवटी ३२ वर्षांचा बदला धनुष्यबाणाने घेतला!
================
श्रीराम मंदिर भाविकांना खुले झाल्यापासून दररोज एक लाखाहून अधिक भाविक अयोध्येत दर्शनासाठी येत आहेत. आतापर्यंत दीड कोटींहून अधिक भाविकांनी भगवान श्रीरामाचे दर्शन घेतले आहे. 2023-24 मध्ये श्रीराम मंदिराचे उत्पन्न 376 कोटी रुपये होते. तर 2025 च्या पहिल्या दोन महिन्यांत हा आकडा 26.89 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. आता श्रीराम मंदिराचा आणखी एक मजला भाविकांसाठी खुला झाल्यावर येथे भाविकांच्या संख्येत वाढ होणार आहे. (Latest News)
सई बने