दिल्लीमध्ये झालेल्या पद्मश्री पुरस्कार वितरण सोहळ्यात एका व्यक्तिनं अवघ्या जगाचे लक्ष वेधून घेतले. ब्राझीलच्या जोनास मासेट्टी यांनी हा करिष्मा केला. दिल्लीमधील समारंभात आचार्य जोनास मासेट्टी, अध्यात्म, अशी घोषणा झाल्यावर गळ्यात रुद्राक्षांची माळ आणि अंगावर घेतलेली पांढरी शुभ्र शाल घेतलेले आचार्य जोनास पुढे आले. अनवाणी पायांनी चालत आलेल्या आचार्य जोनास यांनी राष्ट्रपतींना नमस्कार केला, आणि पद्मश्री पुरस्कार स्विकारला. एका परदेशी व्यक्तिने भारतीय अध्यात्माचा अभ्यास करुन त्याचा फक्त अंगीकारच केला नाही, तर त्याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आपले अवघे आयुष्यच समर्पित केले आहे. पद्मश्री जोनास मासेट्टी यांचा हा सगळा प्रवास जाणण्यासारखा आहे. (Jonas Masetti)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2020 मध्ये त्यांच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमात ब्राझिल निवासी जोनास मासेट्टी यांचे कौतुक केले होते. पंतप्रधान मोदी यांनी जोनास यांचा उल्लेख ‘भारताचे सांस्कृतिक राजदूत’ असा केला होता. आता त्याच आचार्य जोनास यांना पद्मश्री या भारतातील गौरवपूर्ण पुरस्कारानं सन्मानित कऱण्यात आले आहे. आचार्य जोनास मासेट्टी हे ब्राझीलमध्ये वेदांत तत्वज्ञानाचा प्रचार करत आहेत. हे ब्राझिलियन आचार्य विश्वनाथ म्हणूनही ओळखले जातात. जोनास मासेट्टी यांचा जन्म ब्राझीलमध्ये झाला. (Latest News)
त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये शिक्षण घेतले. काही कंपन्यांमध्ये काम करतांना शेअर बाजारातही काम केले. पण या सर्वांत मानसिक शांतता लाभत नाही, अशी रुखरुख त्यांना होती. त्यामुळे जोनास मासेट्टी मानसिक शांततेच्या शोधात भारतात आले. भारतात आल्यावर त्यांनी योग आणि अध्यात्माचा अभ्यास करण्याचा निश्चय केला. कोइम्बतूरमधील विद्या गुरुकुलम येथे चार वर्ष त्यांनी भगवतगीतेचा अभ्यास केला, वेदांचा अभ्यास केला, योगाचे प्रशिक्षण घेतले. आचार्य दयानंद सरस्वती यांच्या आश्रमात जोनास मासेट्टी यांनी भारतीय संस्कृतीचाही अभ्यास केला. या काळात जोनास यांचे संपूर्ण परिवर्तन झाले होते. त्यांनी भारतीय जीवनशैली स्विकारली. फक्त अध्यात्माचा अभ्यासच न करता, त्यावर ते व्याख्यानेही देऊ लागले. शिवाय भारतीय पोशाख पद्धतीचाही त्यांनी अंगिकार केला. भारतात चार वर्ष राहिल्यावर जोनास ब्राझीलमध्ये परतले. पण भारतीय अध्यात्म आणि भगवत गीतेचा प्रचार करण्य़ासाठी त्यांनी प्रयत्न सुरु केले. ब्राझीलमधील रिओ दि जानेरोपासून सुमारे एक तासाच्या अंतरावर असलेल्या पेट्रोपोलिसच्या टेकड्यांमध्ये जोनास यांनी ‘विश्व विद्या‘ नावाची एक संस्था स्थापन केली. (Jonas Masetti)
या संस्थेत भारतीय संस्कृतीची शिकवण दिली जाते. आता या संस्थेत शेकडो विद्यार्थी येतात. त्यांना भारतातील प्राचीन आणि पवित्र ग्रंथांचा परिचय करुन देण्यात येतो. जोनास या विद्यार्थ्यांना गीता, वेद, संस्कृत श्लोक, आणि वैदिक संस्कृती यांचे धडे शिकवतात. विशेष म्हणजे, जोनास यांच्या मार्गदर्शनाखाली ब्राझीलमध्ये अनेक विद्यार्थी रामायणाचा अभ्यास करीत आहेत. आतापर्यंत दीड लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी जोनास यांच्या विश्व विद्या या संस्थेतून भारतीय संस्कृतीचा अभ्यास केला आहे. या संस्थेत संस्कृत भाषाही शिकवली जाते. यामुळे येथील अनेक विद्यार्थी मंत्रोच्चाराचे शिक्षण घेत आहेत. पद्मश्री जोनास मासेट्टी यांचा सोशल मिडियावर खूप मोठा चाहता वर्ग आहे. त्यांच्या विविध माध्यमातून मुलाखती प्रसिद्ध होतात. शिवाय ते ऑनलाइन अभ्यासक्रम देखील चालवतात. यात भारतीय ग्रंथ आणि वेदांचे धडे जोनास देतात. (Latest News)
या सर्व कार्यामुळे जोनास मासेट्टी यांना ब्राझीलमध्ये विश्वनाथ म्हणून ओळखले जाते. त्यांच्या या कार्याची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही घेतली आहे. मन की बात या कार्यक्रमात त्यांनी जोनास यांनी उभारलेल्या विश्व विद्याची माहिती भारतीयांना करुन दिली होती. आता या जोनास मासेट्टी यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे. या पुरस्कार सोहळ्यासाठी जोनास ज्या वेशात आले होते, त्यावरुन त्यांचा भारतीय संस्कृतीवर किती गाढ विश्वास आहे, हे स्पष्ट होते. पद्मश्री पुरस्कार मिळाल्यावर, जोनास मासेट्टी यांनी हा आपला पुरस्कार नसून आपल्या विश्व विद्या कुटुंबाचा पुरस्कार असल्याचे सांगितले आहे. पद्मश्री हा पुरस्कार मोठा आशीर्वाद आहे. हा पुरस्कार तरुण पिढीला भारतीय संस्कृतीकडे आकर्षित करण्यास मदत करेल, असे सांगून पद्मश्री जोनास यांनी तमाम भारतीयांची मने जिंकली आहेत. (Jonas Masetti)
सई बने