कडाक्याची थंडी आणि समोरची व्यक्ती दिसणार नाही, असे दाट धुके असतांनाही तिर्थराज प्रयागमध्ये सनातन धर्माच्या शक्तीची आगळी उर्जा निर्माण झाली आहे. 13 जानेवारीपासून सुरु होणा-या महाकुंभसाठी लाखो भाविक या पावन भूमीवर दाखल झाले आहेत. लाखो साधू, लाखो नागा साधू पहिल्या शाही स्नानाच्या दिवशी ब्रह्ममुहूर्ताच्या एका क्षणाची वाट बघत असतात. या क्षणासाठी ते 12 वर्षाची प्रतीक्षा करतात. यापुढे शून्य तापमान असेल तरी त्यांना त्याची चिंता नसते. त्यांना फक्त पहिल्या शाही स्नानाची उत्सुकता असते. गंगा, यमुना आणि गुप्त रुपानं वाहणा-या सरस्वती नदीच्या पवित्र संगमस्थळावर अशा लाखो साधूंनी गर्दी केली आहे. हर हर महादेव जय श्रीराम या जयघोषात या त्रिवेणी स्थानावर स्नानासाठी जाणा-या साधू-संतांच्या जयघोषांनी संपूर्ण प्रयागराज नगरी दुमदुमून गेली आहे. शाही स्नानाला जमलेल्या लाखो साधूंच्या गर्दीमुळे या भागात आलेल्या अन्य भाविकांना त्रिवेणी संगमापासून थोडे दूर ठेवण्यात आले आहे. मात्र या भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून त्यांच्यासाठी अन्य घाट तयार करण्यात आले आहेत. (Maha Kumbha)
प्रयागराज महाकुंभ 2025 ची सुरुवात अतिशय भव्य झाली असून पुढचे 45 दिवस अशाच जयघोषांनी या नगरीमध्ये लाखो भाविकांचे स्वागत करण्यात येणार आहे. प्रयागराजमध्ये पहिल्या शाही स्नानानं महाकुंभ सुरू आहे. या मेळ्यात देशभरातून भाविक प्रयागराजमध्ये दाखल झाले आहेत. तसेच परदेशातूनही हजारो भाविक दाखल झाले आहेत. अब्जाधिश स्टीव्ह जॉब्सची पत्नी लॉरा याही कुंभमेळ्यासाठी दाखल झाल्या आहेत. महाकुंभतील विधींमध्ये सहभागी होण्यासाठी त्यांनी कमला हे नाव धारण केले असून त्यांना अच्युत गोत्र देण्यात आले आहे. निरंजनी आखाड्याचे प्रमुखे कैलाशानंद गिरी महाराज यांच्या देखरेखीखाली त्या यज्ञ, होम, हवन करणार आहेत. प्रयागराजमध्ये होणा-या महाकुंभला विशेष महत्त्व आहे. यावर्षीचा महाकुंभचा योग हा 144 वर्षात आलेला योग असल्यानं याला पूर्णमहाकुंभ म्हणण्यात येत आहे. (Social News)
गंगा, यमुना आणि अदृश्य सरस्वती नद्यांच्या येथील त्रिवणी संगमावर पुढच्या 45 दिवसात 45 करोड स्नानासाठी येणार आहेत. यातही शाही स्नानांचा मुहूर्त सर्वात पवित्र मानला जातो. महाकुंभाचे पहिले शाही स्नान पौष पौर्णिमेला होत आहे. 13 जानेवारी रोजी पहाटे 5 वाजून 3 मिनीटांनी हा मुहूर्त सुरु होत असून 14 जानेवारी रोजी दुपारी 3.56 पर्यंत शाही स्नानाचा मुहूर्त असणार आहे. 14 रोजीच मकरसंक्रांत असल्यामुळे या दुस-या शाही स्नानालाही महत्त्व आहे. तिसरे शाही स्नान 29 जानेवारी रोजी मौनी अमावस्येला होईल. चौथे शाही स्नान 3 फेब्रुवारी रोजी वसंत पंचमीच्या दिवशी होईल. पाचवे शाही स्नान माघ पौर्णिमेला, 12 फेब्रुवारी रोजी होईल. शेवटचे शाही स्नान 26 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीला होणार आहे. या शाही स्नानाव्यतिरिक्त अन्य दिवसातही या त्रिवेणी स्थानावर स्नान करण्यास भाविकांची मोठी गर्दी रहाणार आहे. (Maha Kumbha)
शाही स्नानाच्या दिवशी साधुसंत मोठ्या संख्येनं त्रिवेणी संगमावर जातात. तसेच आखाड्यातील साधू, नागा साधू यांना या शाही स्नानाचा पहिला मान असतो. त्यामुळेच अन्य भाविक अन्य दिवशी या संगम स्थळावर येऊन स्नान आणि पूजाअर्चना करणार आहेत. शाही स्नान आणि त्यानंतरच्या दिवसाताही होणारी संगम स्थानावरची गर्दी पाहता प्रयागराज कुंभमेळा प्रशासनानं अनेक छोटे घाट तयार केले आहेत. येथे स्नान केल्यावर भाविकांना कपडे बदलण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. त्यातही महिलांसाठी विशेष स्वच्छतागृहांची निर्मिती कऱण्यात आली आहे. महाकुंभात भाविकांना चार ठिकाणांहून प्रवेश करण्याची सुविधा दिली आहे. यात जीटी जवाहर, हर्षवर्धन तिरहा, बांगड चौराहा आणि काली मार्ग-2. यांचा समावेश आहे. (Social News)
===============
हे देखील वाचा : Uttar Pradesh : महाकुंभमधून देवी लक्ष्मीचे वरदान मिळणार
Maha Khumbh Mela: महाकुंभमध्ये कल्पवास करणार या अब्जाधीशाची पत्नी !
===============
प्रयागराज येथे होत असलेला हा महाकुंभ बघण्यासाठीही मोठी गर्दी झाली आहे. त्यात परदेशी नागरिकांचा मोठा सहभाग आहे. प्रयागराज येते अर्धकुंभ 6 वर्षांत, पूर्णकुंभ 12 वर्षांत आणि पूर्ण महाकुंभ 12 पूर्णकुंभांनंतर होतो, तो योग यावर्षी असल्यामुळे या महाकुंभबद्दल अनेकांना उत्सुकता आहे. त्यात तरुणांची संख्या मोठी आहे. मोठ्या संख्येनं तरुण वर्ग या महाकुंभच्या आयोजनातही व्यस्त आहे, शिवाय महाकुंभची व्यवस्था आणि त्याची भव्यता सांगण्यासाठी सोशल मिडियाच्या माध्यमातूनही अनेक तरुण कार्यरत आहेत. या सर्वांचे येथील आखाड्यांच्या प्रमुखांनीही स्वागत केले आहे. मोठ्या संख्येनं तरुण स्वयंसेवक म्हणून या कुंभमेळ्यात पुढे आले आहेत. करोडोच्या संख्येनं आलेल्या या सर्व भाविकांची सेवा कऱण्यासाठी येथे आखाड्यांनीही मोठे पंडाल टाकले असून त्यात अहोरात्र मोफत भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. पुढच्या 45 दिवसातला हा जगातला सर्वात मोठा धार्मिक उत्सव अनुभवण्यासाठी आता भारताच्या कानाकोप-यातील भाविक येथे दाखल होणार आहेत. (Maha Kumbha)
सई बने