Home » भारताच्या स्कॉटलंडला पाहिलंत का ?

भारताच्या स्कॉटलंडला पाहिलंत का ?

by Team Gajawaja
0 comment
India Scotland
Share

परदेशात कुठे फिरायला आवडेल या प्रश्नावर सर्वाधिक येणारे उत्तर म्हणजे, स्कॉटलंड.  फक्त भारतातील नागरिकांनाच नव्हे तर जगभरातील ऐंशी टक्के नागरिक स्कॉटलंडला जाण्याचे स्वप्न बघतात.  त्यामुळे स्कॉटलंड हे जगातील सर्वाधिक लोकप्रिय पर्यटन स्थळ ठरले आहे.  भव्य किल्ले, मोठ्या बागा,  नितांत सुंदर निसर्ग,  विस्तृत जंगल आणि पर्यटकांना हवी असते तशी शांतता ही स्कॉटलंडची काही वैशिष्टेय आहेत.  पण अशीच वैशिष्टे असणारे एक पर्यटन स्थळ भारतातही आहे.  त्याला भारताचे स्कॉटलंड (India Scotland) म्हटले जाते.  सदाहरित असलेली जंगले, धुक्याच्या आवरणात असलेल्या टेकड्या, हिरव्यागार दऱ्या आणि कॉफीच्या मोठ्या बागा, असे हे शहर आहे.  या शहराचे नाव आहे कुर्ग.  कुर्गला भारताचे स्कॉटलंड  म्हणून ओळखले जाते.  उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये फिरायला कुठे जायचे हा प्रश्न पडला असेल तर कुर्ग हा सर्वोत्तम पर्याय आहे.  

भारताचे स्कॉटलंड म्हणून ओळखले जाणारे कुर्ग हे कर्नाटक राज्याच्या पश्चिम भागात आहे.  कूर्गला पूर्वी कोडागू म्हटले जात असे, परंतु ब्रिटिशांनी त्याचे कूर्ग असे नामातंर केले.  या कुर्गचे वातावरण वर्षभर पर्यटकांना आकर्षित करेल असेच असते.  स्वच्छ निळे आकाश आणि कॉफीच्या वासानं दरवळलेल्या बागा अशा या कुर्गला आता परदेशी पर्यटकही मोठ्या प्रमाणात भेट देत आहेत.  याशिवाय निसर्ग चित्रकार आणि छायाचित्रकार यांची वर्षभर या कुर्गमध्ये गर्दी असते.  

कुर्ग हे हिल्स स्टेशन त्याच्या बागा आणि खोऱ्यांसाठी ओळखले जाते. येथे चहा, कॉफीचे मोठ्या प्रमाणात मळे आहेत.  कुर्ग हे कावेरी नदीचे उगमस्थान आहे.  येथे ओंकारेश्वर मंदिर,  ब्रह्मगिरी वन्यजीव अभयारण्य, पाडी इग्गुथाप्पा मंदिर अशी अनेक स्थाने पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहेत.  शिवाय कुर्गची कॉफीही प्रसिद्ध आहे.  कूर्गमध्ये कॉफी बागा अनेक एकरांमध्ये पसरलेल्या आहे.  याच बागांमध्ये नद्या आणि धबधबे यांचाही समावेश होतो. भारतातील बहुतांश कॉफी याच भागातून येते.  याच कॉफीच्या मळ्यातून पर्यटकांना मनमुराद भटकंती करता येते.  याशिवाय काही बागांमध्ये पर्यटकांना कॉफीच्या बिया झाडावरुन काढण्यापासून ते त्याची कॉफी पूड करेपर्यंत सर्व माहिती प्रत्यक्षपणे जाणून देता येते.  तसेच पर्यटकांसमोर केलेली कॉफी तयार करुन त्यांना पिण्यासही दिली जाते. (India Scotland)

कुर्गचा ॲबी फॉल्सही पर्यटकांचा आवडता आहे.  इंग्रजांच्या राजवटीत या ठिकाणी अनेक इंग्रज अधिकारी सुट्टी घालवण्यासाठी गर्दी करत असत.   ब्रिटीश धर्मगुरूने त्याच्या मुलीच्या स्मरणार्थ या जागेचे नाव  ॲबी  ठेवले.  या ॲबी धबधब्याच्या भोवती कॉफीचे मोठे मळे आहेत.  सोबत  मिरी आणि वेलचीचे उत्पादनही येथे घेण्यात येते.  याशिवाय मंडलपट्टी  येथे पर्यटकांची गर्दी असते.  मंडलपट्टी म्हणजे ढगांचा बाजार‘.  सुमारे 4050 फूट उंचीवर वसलेला हा भाग डोंगरमाथा पुष्पगिरी राखीव जंगलाचा एक भाग आहे.  या उंचीवरुन कुर्गचे सौदर्य बघण्यासारखे असते.  

कुर्गमध्ये अनेक मंदिरेही प्रसिद्ध आहेत.  त्यात सुवर्ण मंदिराचा उल्लेख होतो.  म्हणजेच नामड्रोलिंग मठ पर्यटकांच्या श्रद्धेचे केंद्र आहे. नामद्रोलिंग मठ हे तिबेटी बौद्ध धर्माशी संबंधित शाळांचे सर्वात मोठे शिक्षण केंद्र आहे. जगातील दुसरी सर्वात मोठी तिबेटी वस्ती येथे आहे.    हा मठ म्हणजे, 3 मजली बौद्ध मंदिर, 5000 हून अधिक भिक्षुंचे निवासस्थान आहे.

कुर्गमध्ये पक्षी प्रेमींची मोठ्या संख्येनं गर्दी असते.  कारण येथील पुष्पगिरी वन्यजीव अभयारण्यात नानाप्रकारचे पक्षी आणि प्राणी आढळतात.  ग्रे हॉर्नबिल, युकॅलिप्टस फ्लायकॅचर, ग्रे-ब्रेस्टेड लाफिंग थ्रश अशा अनेक लुप्तप्राय आणि दुर्मिळ पक्ष्यांना बघण्याची संधी येथे मिळते.   याशिवाय भारतीय राक्षस गिलहरी, तपकिरी पाम सिव्हेट, ठिपकेदार हरीण आणि आशियाई हत्ती यासारखे अनेक प्राणी या अभयारण्याच्या डोंगराळ भागात आहेत.  पावसाळ्यातही हे अभयअरण्या पर्यटकांसाठी खुले असते.  तेव्हा डुबेरे एलिफंट कॅम्पजवळ रिव्हर राफ्टिंगची व्यवस्था पर्यटकांसाठी केली जाते.  याशिवाय कुर्गमध्ये राजाचे सीट हे प्रमुख ठिकाण आहे. माडीकेरी येथील सुंदर फुलांचे हे  सीट गार्डन कायम रंगिबेरंगी फुलांनी सजलेले असते.  येथून सूर्यास्त आणि सूर्योदयाचे सुंदर दृश्यही बघता येते.  (India Scotland)

=============

हे देखील वाचा : जपानमध्ये नेकेड फेस्टिवल अनोखा ठरणार… 

=============

कुर्गमधील दुबरे एलिफंट कॅम्पला पर्यटक भेट देतात.  येथे पर्यटक हत्तींसोबत खेळू शकतात आणि त्यांची काळजी घेऊ शकतात. कर्नाटकच्या वनविभागाच्या देखरेखीखाली सुमारे 150 हत्ती या कॅम्पमध्ये आहेत.  पर्यटक कावेरी नदीच्या काठावर हत्तींना आंघोळ घालू शकतात, हत्तींसोबत अंदाजे 3 तास ​​घालवण्याची संधी पर्यटकांना मिळते.   हा सर्व अनुभव अवर्णनीय असतो.  त्यामुळेच दक्षिणेतील या कुर्गला भेट देण्यासाठी आता आपल्या देशासह परदेशातील पर्यटकही गर्दी करत आहेत.  

सई बने

 


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.