Home » वारी: केवळ संस्कृती नाही, तर पंढरपुरच्या अर्थकारणाचा महत्त्वाचा भाग  

वारी: केवळ संस्कृती नाही, तर पंढरपुरच्या अर्थकारणाचा महत्त्वाचा भाग  

by Team Gajawaja
0 comment
Pandharpur Wari
Share

मागची दोन वर्ष न झालेली आषाढी एकादशीची वारी यंदा होणार या कल्पनेनेच अवघ्या वारकरी पंथामध्ये चैतन्य पसरलं. यंदा पायी वारी होणार या बातमीनं वारकरी आनंदले कारण रोगराईच्या संकटामुळे दोन वर्ष चुकलेली विठुरायाची भेट होणार. गावाचं ठप्प झालेलं आर्थिक चक्र विठुरायाच्या कृपेनं यंदा सुरळित होणार म्हणून पंढरपूरकरांच्याही जीवात नाही म्हटलं तरी जरा जीव आला. जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात राज्याच्या कानाकोपऱ्यांतून संतांच्या पालख्यांनी पंढरपूरकडे प्रस्थान करायला सुरुवात केली आणि सर्वत्र ज्ञानोबा माऊली तुकारामचा जयघोष सुरु झाला. (Ekadashi, Pandharpur Yatra, Pandharpur Wari)

पंढरपूरची पायी वारी हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक श्रीमंतीचा वारसा म्हणून अनेक वर्षे ज्ञात आहे. पंढरपुरात वसलेल्या विठुरायाने या गावाला जागतिक नकाशावर महत्त्वाचं स्थान मिळवून दिलं आहे. साहजिकच पंढरपूरचं अर्थकारणही वारी आणि विठूमाऊलीच्या सभोवती विणलेलं आहे. आषाढी एकादशी हा पंढरपूरच्या अर्थचक्राला गती देणारा सगळ्यात मोठा आणि मानाचा दिवस. वारीच्या निमित्तानं इथे मोठी जत्रा भरते.

राज्याच्या कानाकोपऱ्यांतून वारकरी पंढरीत दाखल होतात. हे वारकरीही वारी व्यतिरिक्त एरवी क्वचितच आपलं घरदार सोडून बाहेर पडणारे. त्यामुळे वारीच्या निमित्तानं चार पैसे खर्च करायचे, घराकडे परत जाताना कधी प्रसाद, तर कापड-चोपडाची खरेदी करायची अशी तजवीज करुनच वारकरी पंढरीत येतात. गेली दोन वर्ष वारी झाली नाही. त्यामुळे वारकऱ्यांना जसं विठ्ठलभेटीपासून वंचित राहावं लागलं तसं पंढरपूर गावालाही आर्थिक सुबत्तेला मुकावं लागलं. यंदा वारीच्या निमित्तानं पंढरी पुन्हा दुमदुमणार असल्यामुळे गेल्या दोन वर्षांत झालेलं आर्थिक नुकसान थोडंफार भरुन निघणार याचा स्वाभाविक आनंद पंढरपूरकरांना आहे. (Ekadashi, Pandharpur Yatra, Pandharpur Wari)

पंढरपूरचं संपूर्ण आर्थिक चक्र हे प्रामुख्याने आषाढी एकादशीवर अवलंबून आहे. आषाढी एकादशीसोबत कार्तिकी एकादशीला वारी करणारे वारकरीही आहेत. पण त्यांचं प्रमाण आषाढीच्या तुलनेत अगदीच कमी आहे. आषाढी एकादशीला पंढरपूर गावात होणारी आर्थिक उलाढाल थोडीथोडकी नव्हे, तर कमीत कमी दोनशे कोटी रुपयांची असते. आषाढीच्या निमित्ताने भरणारा बाज़ार, होणारी खरेदी विक्री आणि सेवा यांवर पंढरपूरकर आपली वर्षाची बेगमी करतात म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही.

====

हे देखील वाचा – कोणार्क सूर्य मंदिर – येथे सूर्यास्तानंतर येतो घुंगरांचा आवाज…. 

====

पंढरपूरच्या जत्रेत काय नसतं? अबीर-गुलाल-बुक्का-हळद-कुंकू अशा केवळ तीर्थक्षेत्रांवरच खरेदी केल्या जाणाऱ्या गोष्टी या जत्रेत असतात. प्रसाद म्हणून विकले जाणारे कित्येक खाद्यपदार्थ ही आषाढीच्या काळात एक मोठी इंडस्ट्री आहे. कापड-चोपड, देवांच्या पितळी मूर्ती, पंढरपूरची ओळख असलेल्या विठू-रखुमाईच्या काळ्या दगडी मूर्ती अशा अनेक गोष्टींची या काळात पंढरपूरमध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्री होते. आषाढीनिमित्त पंढरपूरला येणाऱ्या वारकऱ्यांच्या राहण्या-खाण्याची सशुल्क सोय करणारी घरे या एका दिवसावर आपला उदरनिर्वाह करतात. (Ekadashi, Pandharpur Yatra, Pandharpur Wari)

वारकरी आपल्या दिंडीसाठी लागणाऱ्या वाद्यांची खरेदीही अगदी आवर्जून पंढरपूरात आले की करतात. आषाढीच्या निमित्ताने होणाऱ्या शासकीय पूजेनिमित्त मुख्यमंत्री आणि त्यांचा मोठा लवाजमा पंढरपूरात दाखल होतो. त्यामुळे एरवी तशी दुर्लक्षित असलेली पंढरपूरातील हॉटेल्स आणि लॉजही या काळात फुल्ल होतात आणि भरभक्कम कमाई करतात.(Ekadashi, Pandharpur Yatra, Pandharpur Wari)

वारकरी पंढरपूरला आपलं माहेर मानतात! पंढरपूरला जाताना त्यांची भावना आपण माहेरी जातोय अशीच असते. साधु संत येती घरा, तोचि दिवाळी दसरा या न्यायानं आषाढीच्या निमित्तानं आर्थिक स्थैर्य, भरभराट आणि उत्साह घेऊन येणाऱ्या या दिंड्यांचं स्वागत करताना म्हणूनच पंढरपूरही दुमदुमून जातं. (Ekadashi, Pandharpur Yatra, Pandharpur Wari)


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.