जिद्द, चिकाटी आणि अपार मेहनत घेण्याची तयारी असली तर कोणत्याही क्षेत्रात यश गाठता येते, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे महिला क्रिकेटपटू मिताली राज होय. मिताली जगप्रसिद्ध भारतीय खेळाडू आहे. उत्तम आणि संयमी व्यक्तिमत्त्व म्हणूनही तिची ओळख आहे. मितालीने आपल्या चाहत्यांना कधीही आपल्या खेळाने निराश केले नाही. अशा या मिताली विषयी जाणून घेऊया . . (captain cool Mithali Raj)
‘शाब्बास मितु’ आहे चित्रपटाचे नाव
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दहा हजार धावांचा टप्पा गाठणारी आणि एकदिवसीय सामन्यात सात हजार धावा करणारी एकमेव भारतीय क्रिकेटपटू मिताली राजला ‘लेडी कॅप्टन कूल ‘ या नावानेही ओळखले जाते. अशा या धाडसी क्रिकेटपटूंच्या चरित्रपटावर आधारित एक चित्रपट आला आहे. ‘शाब्बास मितू,’ असे या चित्रपटाचे नाव असून यात प्रख्यात अभिनेत्री तापसी पन्नूने मितालीची व्यक्तिरेखा साकारली आहे. मितालीने आफ्रिकेविरुद्ध तिसऱ्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात ३५ धाव घेत दहा हजार धावा पूर्ण केल्या होत्या. अशी कामगिरी करणारी ती भारतातली पहिली, तर जगातली दुसरी महिला क्रिकेटपटू आहे.(captain cool Mithali Raj)
दहाव्या वर्षी घेतली हातात बॅट
मितालीचा जन्म राजस्थानमधील जोधपूर शहरात ३ डिसेंबर, १९८२ रोजी झाला. मिताली लहानपणी खूप आळस करायची. तिला झोप खूप आवडायची. शाळेच्या एक तास आधी ती झोपेतून उठायची. तिच्या वडिलांना तिची ही सवय बिलकुल आवडत नसे. तिचे वडील दोराई राज त्या काळात भारतीय वायुदलात कार्यरत होते. तिची ही सवय मोडून काढण्यासाठी त्यांनी तिचा मोठा भाऊ मिथुनच्या बरोबर तिला सिकंदराबादला क्रिकेट प्रशिक्षणासाठी पाठवण्याचा निर्णय घेतला. नंतर संपूर्ण राज कुटुंबही हैदराबाद येथे स्थायिक झाले. तिथूनच मितालीच्या आयुष्याला वेगळे वळण मिळाले. वयाच्या १०व्या वर्षी मिताली क्रिकेट खेळू लागली. पण मितालीला क्रिकेटबरोबरच नृत्याचीही प्रचंड आवड होती. शालेय पातळीवर मितालीने भारतनाट्यम मध्ये अनेक पारितोषिके पटकावली होती. मात्र दोन्ही क्षेत्रात पारंगत असलं तरी कारकीर्द घडवण्यासाठी एकच क्षेत्र निवडणे गरजेचे होते. त्यामुळे मितालीने १२व्या वर्षी क्रिकेटकडे वळण्याचा धाडसी निर्णय घेतला. मितालीच्या निर्णयाला प्रशिक्षक संपत कुमार आणि पालकांनीही पाठिंबा दिला.(captain cool Mithali Raj)
संयम, स्थिरता आणि सातत्य हेच यशामागचे सूत्र
क्रिकेट खेळायला सुरूवात केल्यानंतर मिताली मधे बरेच बदल झाले. तिच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू दिसू लागले. संयम आणि स्थिरता तिच्या वास्तविक जीवनाचा भाग बनले. त्यामुळे संयम, स्थिरता आणि सातत्य हेच स्वतःच्या यशामागचे सूत्र असल्याचे ती मानते. महिलांना भारतीय संघातर्फे खेळायची इच्छा असेल तर त्यांनी वर्षानुवर्षे मेहनत केली पाहिजे. कष्टाशिवाय यश प्राप्त होऊच शकत नाही, असे मिताली म्हणते.
====
हे देखील वाचा – बापाच्या रंगेल आयुष्याचा फटका मुलांना! विजय मल्ल्याची कहाणी वाचून थक्क व्हाल….
====
मितालीला सचिन म्हणूनही संबोधले जाते
मिताली राजने २६ जून १९९९ रोजी टीम इंडियासाठी खेळायला सुरुवात केली. ती गेली २३ वर्षे भारतीय संघाकडून खेळत होती. ३९ वर्षीय मितालीने टीम इंडियासाठी १० हजारांहून अधिक धावा केल्या आहेत. तिने २००० मधे भारतासाठी पहिला विश्वचषक खेळला आहे. यानंतर २००५, २००९, २०१३, २०१७ आणि २०२२ मध्येही ती टीम इंडियासाठी मैदानात आली होती.
मिताली राजला सचिन तेंडुलकर म्हणूनही ओळखले जाते. मितालीने आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. मितालीच्या या घोषणेने संपूर्ण क्रिकेट जगताला धक्का बसला आहे.(captain cool Mithali Raj)
२०० हून अधिक एकदिवसीय सामने खेळणारी पहिली महिला क्रिकेटपटू
२००७ च्या विश्वचषकात मितालीने लगातार ७ अर्धशतक करत आपल्या फलंदाजीची झलक दाखवली होती. असा विक्रम करणारी ती पहिलीच महिला क्रिकेटपटू ठरली होती. भारतासाठी सलग १०९ सामने खेळण्याचा विक्रमही मितालीच्या नावावर आहे. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये २००० हून अधिक धावा करणारी मिताली राज ही पहिली भारतीय आहे. भारतीय संघासाठी २० वर्षांहून अधिक काळ खेळण्याचा विक्रमही मितालीच्या नावावर आहे. २०० हून अधिक एकदिवसीय सामने खेळणारी मिताली ही पहिली महिला क्रिकेटपटू आहे. भारताकडून कसोटीत द्विशतक झळकावणारी मिताली ही एकमेव महिला फलंदाज आहे. मितालीने २००२ मध्ये इंग्लंडविरुद्ध २१४ धावा केल्या होत्या. मितालीला आपल्या दीर्घ कारकीर्दीत बऱ्याचदा चढ उताराचा सामना करावा लागला. कोणताही खेळ असो महिला आणि पुरुषांमध्ये समानता असायला हवी, अशी मिताली अनेकदा म्हणाली आहे.(captain cool Mithali Raj)