Home » पंचम: बॉलीवूडला थिरकायला भाग पाडणारा बंडखोर गंधर्व!

पंचम: बॉलीवूडला थिरकायला भाग पाडणारा बंडखोर गंधर्व!

by Correspondent
0 comment
R. D. Burman | K Facts
Share

बंडखोर संगीतकार म्हणून ज्यांचा हिंदी सिनेसंगीतसृष्टीत आवर्जून उल्लेख करावा संगीतकार म्हणजे स्व. राहुलदेव बर्मन अर्थात पंचम! २७ जून रोजी त्याची ८३वी जयंती. १९७०पर्यंत ज्या संगीताचा हिंदी सिनेसृष्टीत ‘सोनेरी पर्व’ असा आदराने व अभिमानाने कायम उल्लेख होतो, त्या साठच्या दशकातील अजरामर सदाबहार व सुरेल संगीत देणाऱ्या स्व. शंकर-जयकिशन, ओ. पी. नय्यर, नौशाद, मदनमोहन, रोशन, सी. रामचंद्र, चित्रगुप्त, रवी, हेमंतकुमार यांना विसरायला लावणारा एक संगीतकार सत्तरच्या दशकाच्या पहाटे हिंदी सिनेसंगीतसृष्टीत गर्जत आला.

१९६६च्या ‘तिसरी मंझिल’पर्यंत तमाम रसिकांना अज्ञात असणाऱ्या पंचम उर्फ राहुलदेव बर्मनने (R. D. Burman) आपल्या संगीताच्या नव्या शैलीने सर्वांना अक्षरश: चकित केले. पूर्वासूरीच्या पठडीत न बसणाऱ्या पण तरुणाईला अक्षरशः वेड करणाऱ्या, धुंद-फुंद अशा पाश्चात्य सुरावटीच्या संगीताने तमाम तरुणाईला क्षणार्धात आपलेसे केले. पुढे जवळपास दोन दशके त्याने समस्त रसिकांना आपल्या अफलातून शॉकिंग म्युझिकने, अनोख्या रिदमने मंत्रमुग्ध केले.

संगीतकार म्हणून नावारूपाला आल्यावरही पंचमने वडिलांना संगीत संयोजनात मदत करणे सोडले नाही. ‘आराधना’, ‘प्रेम पुजारी’, ‘गाईड’, ‘ज्वेल थिफ’ असो नाही तर ‘नया जमाना’, ‘बारुद’ असो, वडिलांच्या आजारपणात तो जी वडिलांची जागा घेई त्यामुळे ते चित्रपट झळाळून उठत. सचिनदांच्या अखेरच्या आजारपणात तर त्यांच्या बहुतेक चित्रपटांना पंचमनेच पूर्णतः संगीत दिलेले आढळेल. असे असूनही त्याने कधीही श्रेयनामावलीत वडिलांचे श्रेय स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न केला नाही. ते चित्रपट आजही सचिनदांचे चित्रपट म्हणूनच ओळखले जातात मग तो ‘तलाश’ असो वा अन्य कोणता!

गाणाऱ्या संगीतकारांचा आपण विचार करतो तेव्हा आपल्या नजरेसमोर प्रामुख्याने स्व. हेमंतकुमार, स्व. किशोरकुमार किंवा स्व. सी. रामचंद्र, स्व. सचिनदा यांची नावे येतात. या नामावळीत आर. डी. बर्मनचे नाव घ्यावे की नाही असा कदाचित काहीजणांच्या मनात संभ्रम निर्माण झाला तर नवल नाही.

कारण स्व. सचिनदा अन् पंचम यांच्या गायनशैलीत जमीन-आस्मानाचा फरक. त्याच्यावर असलेल्या पाश्चिमात्य संगीताचा प्रभाव हा त्याच्या गायनातून नकळत जाणवतो. पॉप, रॉकपासून डिस्कोपर्यंत विदेशी संगीतात जेवढे म्हणून नृत्यसंगीताचे प्रकार आहेत तेवढे त्याने आत्मसात केले व आपल्या संगीतात त्याचा वैविध्यपूर्ण प्रयोग करत आपलं संगीत समृद्ध केलं.

विनोदी अभिनेता स्व. महमूद याने सर्वप्रथम ‘छोटे नबाब’ मध्ये पंचमला संधी दिली. त्याचे त्याने सोने करुनही त्याला प्रसिध्दी मिळण्यासाठी ‘तिसरी मंझिल’पर्यंत वाट पहावी लागली. ‘दि ट्रेन’, ‘मेरे जीवन साथी’, ‘वारीस’, ‘यादों की बारात’, ‘सिता और गिता’, ‘कारवाँ’, ‘अधिकार’, ‘बुढ्ढा मिल गया’ अशा तिकिटाच्या बारीवर हमखास क्लिक होणाऱ्या गल्लाभरू चित्रपटांना त्याने दिलेले फास्ट रिदमचे संगीत त्याची ओळख ठरली.

‘एक बेचारा प्यारका मारा’, ‘ओ मेरे सोना रे सोना’, ‘ये जवानी है दिवानी, रुक मेरी रानी’, ‘चला जाता हूँ किसीकी धुनमें’, ‘हवाके साथ साथ, घटाके संग संग’, ‘चढती जवानी मेरी चाल मस्तानी’ अशा एकाहून एक, धडाकेबाज, नव्या पिढीला धुंदावणाऱ्या रिदमने पंचमचे नाव हा हा म्हणता सर्वतोमुखी झाले. पण एकीकडे पाश्चात्य संगीताचा व जाझ, रॉक, पॉप अशा विदेशी नृत्यसंगीतप्रकाराचा समर्पक वापर करणाऱ्या पंचमने ‘परिचय’, ‘अमर प्रेम’, ‘इजाजत’सारख्या काही चित्रपटांतील गाण्यांना अस्सल भारतीय रागदारीतील चालीत गुंफून ‘हम किसीसे कम नही’ हे सहजगत्या सिध्द केले.

केवळ संगीतकार म्हणून त्याने आपल्या संगीतात जे अनेक वैविध्यपूर्ण प्रयोग केले त्याचा विचार करायचा झाला तरी तोच एखाद्या पूर्ण लांबीच्या लेखाचा विषय ठरावा. पण संगीताबरोबरच त्याने फक्त स्वतःच्या मोजक्या चित्रपटात पार्श्वगायन करुन तरुण पिढीची नस त्या त्या वेळी अचूक पकडली.

उदा., ‘मेरी जाँ मैने कहा, मेरी जाँ तुमने सुना’, ‘दुनियामे लोगोंको धोका कभी हो जाता हैं’ ‘मेहबूबा मेहबूबा’, ‘यम्मा यम्मा’ ‘गोलमाल है भाई सब गोलमाल है’, ‘जाना ओ मेरी जाना’, ‘अरे मै हूँ तेरे ख्वाबोंका राजा’ अशी आजच्या पिढीलाही मोहीनी घालणारी, आपल्या आवाजाची ‘फ्रीडम फ्रीडम फ्रीडम’ ची साद घालत, त्याने केवळ आजच्याच नव्हे तर उद्याच्याही संगीताला गवसणी घातली.

‘दम मारो दम’ गाण्यातील वाद्यवृंदांतील अफलातून धुंदपणा अजूनही तितकाच ताजा व तितकाच मादक वाटतो. पंचमदा यांनी बऱ्याचदा, विशेषतः आशा भोसले यांनी गायलेल्या गाण्यात त्याने गाण्याच्या इंटरल्यूड पीसमध्ये जे अफलातून आवाज काढले आहेत ते नुसते आठवले तरी मोठी गंमत वाटते. मग तो ‘पिया तूऽऽऽ अब तो आजा’ असेल वा ‘एक बेचारा प्यारका मारा’ असेल किंवा ‘सपना मेरा टूट गया’ असेल.

पंचम हा ज्येष्ठ संगीतकार स्व. सचिनदांचा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या रोमारोमात भिनलेल्या संगीताची चाहुल तशी सचिनदांना १९५५ साली पंचम केवळ नऊ वर्षाचा असतानाच झाली. त्यावेळी ते देवआनंद-गीताबालीच्या ‘फंटुश’ चित्रपटाला संगीत देत होते. पंचमने त्यावेळी सहज ऐकवलेल्या चालीवरच मग ‘फंटुश’मधील देव आनंदवर चित्रित किशोरकुमारने गायलेले ‘ए मेरी टोपी पलटके आ’ हे विनोदी गाणे ध्वनिमुद्रित झाले जे लोकांच्या ओठी चपखल बसले.

‘प्यासा’ चित्रपटातील स्व. गीता दत्तने गायलेले ‘जाने क्या तूने कही’ किंवा ‘सर जो तेरा चकराये हे’ या जॉनी वॉकरवर चित्रित गाण्यातील लहानग्या पंचमचे योगदान सांगूनही खरं वाटत नाही. पण ‘सोलवा साल’ चित्रपटातील स्व. हेमंतकुमारच्या आवाजातील देवआनंदवर चित्रित ‘है अपना दिल तो आवारा’ या गाण्यातील उसळते फेसाळते माऊथऑर्गनचे स्वर पंचमचेच होते हे सांगायला कोण्या कुडमुड्या जाणकारांची गरज नाही.

कारण तबला व माऊथऑर्गन ही पंचमची मर्मस्थाने होती. त्याने लक्ष्मीकांत प्यारेलालसह अनेक संगीतकारांकडे काही गाण्यासाठी माऊथऑर्गनची सुरावट वाजवून गाण्यात चार चाँद लावले आहेत. मग ते ‘दोस्ती’मधील ‘जानेवालो जरा मुडके देखो मुझे’ असेल वा अन्य कुठले.

त्याच्या वडिलांसाठी तर तो जेव्हा गरज पडेल तेव्हा सहाय्यक बनायचा. मग तो ‘आराधना’, ‘गाईड’, ‘ज्वेल थिफ’, ‘तलाश’, सचिनदांच्या अखेरच्या आजारपणातील चित्रपट असोत वा ‘चलती का नाम गाडी’, ‘सोलवा साल’, ‘कागज के फूल’, ‘तीन देवियाँ’, ‘बंदिनी’ असो. गायक म्हणून तो काही फार मोठया लंबी रेसका घोडा नव्हता तरी तो ज्या जातकुळीचे बंडखोर संगीत द्यायचा, धक्कादायक प्रयोग करायचा त्यात त्याच्यासारख्या अनवट आवाजाचीच गरज असायची.

मग ते ‘दुनियामे लोगोको धोका कभी हो जाता है’ असो वा ‘मेहबूबा मेहबूबा’, त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत जवळपास २२ गाण्यात आपला उसना आवाज दिला. पूर्वाश्रमीच्या कोणत्याही प्रस्थापित आवाजाशी फटकून असणारी त्याची गायनशैली चटकन लक्ष वेधून घेत असे. एकप्रकारे तो बंडखोर संगीतकाराप्रमाणे बंडखोर गायकही होता असं म्हटल तर वावग ठरणार नाही.

कोणत्याही गोष्टीचा गाण्यात वाद्यवृंद रचनेत अचूक वापर करावा तर तो त्यानेच. परत तो वैचित्र्यपूर्ण असा रिदम रसिकांना अपील होत असे. त्याने आपल्या वाद्यवृंद रचनेत कशाकशाचा रिदम म्हणून वापर केला नसेल हा संशोधनाचाच विषय ठरावा.

शब्दांकन: दिलीप कुकडे (मुक्त पत्रकार)

टीप : या लेखातील माहिती आणि मते ही सर्वस्वी लेखकाची आहेत. आम्ही याची पुष्टी करत नाही. तसेच लेखकाच्या मतांशी आम्ही सहमत असूच असेही नाही.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.