कॉम्बॅट एव्हिएटर नेमकं काय करतो?
हरियाणाच्या कॅप्टन अभिलाषा बराकचं (Combat Aviator abhilasha barak) आज देशभरात कौतुक होतंय… आर्मी एव्हिएशन कॉर्प्समध्ये कॉम्बॅट एव्हिएटर म्हणून रूजू होणार असलेली २६ वर्षांची अभिलाषा ही भारतातली पहिली महिला अधिकारी आहे. नाशिकमधल्या कॉम्बॅट एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलमध्ये झालेल्या दीक्षांत समारंभात आर्मी एव्हिएशनचे महासंचालक आणि कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल अजय कुमार सुरी यांनी अभिलाषाला प्रतिष्ठित ‘विंग्ज’ चिन्ह प्रदान केले आणि देशात नवा इतिहास रचला गेला.
सप्टेंबर २०१८ पासून अभिलाषा मध्ये सैन्यदलाच्या एअर डिफेन्स कॉर्प्समध्ये कार्यरत होत्या आणि आता 2072 आर्मी एव्हिएशन स्क्वाड्रन सेकंड फ्लाइटसाठी त्यांची नियुक्ती करण्यात आल्याचं सैन्यदलानं जाहीर केलं आहे. ज्या कॉम्बॅट एव्हिटरचं स्थान मिळाल्याबद्दल अभिलाषाचा देशभरात गौरव होत आहे, त्याचं नेमकं काय काम असतं, आतापर्यंत महिलांना या क्षेत्रांना प्रवेश का दिला जात नव्हता हे तुम्हाला माहीत आहे का?
…म्हणून कॉम्बॅट एव्हिएटर
कॉम्बॅट एव्हिएटर म्हणजे लढाऊ वैमानिक! संरक्षण दलांमध्ये लढाऊ अधिकाऱ्यांना वेगळं स्थान असतं. लढाऊ तुकडीत समाविष्ट होण्यासाठी एरवी सैन्यदलात प्रवेश मिळवताना जे कठीण प्रशिक्षण घ्यावं लागतं, त्याहीपेक्षा कितीतरी पटींनी जास्त खडतर व कठोर प्रशिक्षणातून जावं लागतं. युद्धजन्य किंवा आपत्कालीन परिस्थिती, रेस्क्यु मोहिमा या व अशा नेहमीपेक्षा वेगळ्या मोहिमांवर जाण्याची कामगिरी त्यांच्यावर सोपवली जाते. लढाऊ वैमानिकाला फायटर विमान, हेलिकॉप्टर किंवा वाहतुकीसाठी वापरलं जाणारं विमान यापैकी कशाचीही जबाबदारी दिली जाऊ शकते. (Combat Aviator abhilasha barak)
इतिहास घडला
आतापर्यंत भारतीय वायुसेना तसंच नौदलामध्ये महिला अधिकारी हेलिकॉप्टर चालवत होत्या, मात्र सैन्यदलाच्या आर्मी एव्हिएशन कॉर्प्स या लढाऊ तुकडीत आतापर्यंत महिलांना केवळ ग्राउंड ड्युटी किंवा ट्रॅफिक कंट्रोलचे काम दिलं जायचं. अखेर २०२१ मध्ये महिला अधिकाऱ्यांनाही एव्हिएशन कॉर्प्समध्ये प्रवेश देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.
त्यानंतर या कॉर्प्समध्ये सहभागी होण्यासाठी १५ महिला अधिकारी पुढे आल्या, मात्र पायलट अप्टिट्यूट बॅटरी टेस्ट आणि वैद्यकीय चाचणीनंतर केवळ दोघींचीच त्यासाठी दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली. नाशिकमधल्या कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलमध्ये हे कठोर प्रशिक्षण दिलं जातं.
आर्मी एव्हिएशन कॉर्प्सची स्थापना नोव्हेंबर १९८६ मध्ये झाली होती आणि आज हा विभाग सैन्यदलातला सर्वात प्रतिष्ठित आणि महत्त्वाचा विभाग म्हणून ओळखला जातो. लढाऊ परिस्थितीसाठी आवश्यक शस्त्रास्त्र, उपकरणं आणि वाहतुकीची आधुनिक साधनं या विभागाकडे आहेत.
कोण आहेत अभिलाषा? (Combat Aviator abhilasha barak)
निवृत्त कर्नल एस ओम सिंग यांची मुलगी असल्यामुळे अभिलाषा मिलिटरी कँटोनमेंटमध्येच वाढली. लहानपणापासून आजूबाजूला युनिफॉर्ममधल्या अधिकाऱ्यांना पाहाणाऱ्या अभिलाषाला कित्येक दिवस सगळे जण सैन्यातच काम करतात असं वाटायचं. दुसऱ्या ठिकाणी राहायला गेल्यानंतर कुठे तिला जगात इतरही व्यवसाय असतात हे समजलं.
अशा वातावरणात वाढल्यानंतर सैन्यदलाची करियर म्हणून निवड करणं तिच्यासाठी अगदी स्वाभाविक होतं. हिमाचल प्रदेशात शालेय शिक्षण घेतल्यानंतर तिनं दिल्लीतून इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनियरिंगमध्ये बीटेक केलं. तिला डेलॉइट, अमेरिका इथे नोकरीही मिळाली होती. मात्र, आधी ठरल्याप्रमाणे तिनं सैन्यात जाण्याचा निर्णय घेतला आणि चेन्नईतल्या ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमीमध्ये रूजू झाली.
तिथलं प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिनं पुढच्या कामासाठी आर्मी एव्हिशन कॉर्प्सची निवड केली. अभिलाषा सांगतात, ‘एव्हिएशन कॉर्प्समध्ये जाण्यासाठीचा अर्ज भरताना मला माहीत होतं, की इथं मला फक्त ग्राउंड ड्युटी मिळू शकते, पण तरी मी तो अर्ज भरला आणि त्यात पायलट अप्टिट्यूट बॅटरी टेस्ट आणि कम्प्युटराइज्ड पायलट सिलेक्शन सिस्टीमसाठी पात्र ठरल्याचं नमूद केलं. जणू मला मनात कुठेतरी माहीत होतं, की या महिलांना लढाऊ वैमानिक म्हणून सामील करून घेण्याची वेळ जवळ येत आहे.’ (Combat Aviator abhilasha barak)
नवी सुरवात
३० वर्षांपूर्वी भारतीय सैन्यदलांत महिला अधिकाऱ्यांना प्रवेश देण्यास सुरुवात झाली होती आणि आज अभिलाषाच्या रुपाने देशाला सैन्यदलाची पहिली लढाऊ वैमानिक मिळाली आहे. अभिलाषाला प्रदान करण्यात आलेले ‘विंग्ज’ देशभरातील अशा कित्येक मुलींसाठी प्रतीकात्मक ठरतील आणि त्यांच्यातल्या लढवय्या वृत्तीला आकाशात भरारी घेण्याचं नवं स्वप्न देतील अशी आशा आहे! (Combat Aviator abhilasha barak)
– कीर्ती परचुरे