इंग्रजांनाही दाद न देण्याची जिद्दच त्यांची न्यारी,
राणी असूनही वेगळी जिची छाप,अशी होती अहिल्याराणी !
महाराष्ट्राच्या मातीत आजवर अनेक राजे महाराजे झाले. त्यात अनेक स्त्रियांनीही राज्यकारभार सांभाळला. पण केवळ एक राणी म्हणून नाही तर एक दूरदृष्टी असलेल्या प्रशासक, समाजसुधारक आणि धर्मनिष्ठ व्यक्तिमत्व असलेली एक स्त्री जी इतिहासाच्या पानांवर अजरामर झाली ती म्हणजे राणी अहिल्याबाई होळकर! त्यांचा जीवनप्रवास म्हणजे आपल्यासाठी साहस, बुद्धिमत्ता आणि निःस्वार्थ सेवेचा एक धडाच आहे. त्यांच्या याच जीवनप्रवासाबद्दल आणि महत्वाचं म्हणजे भारतातील हिंदू मंदिरांच्या पुनर्बांधणी आणि जीर्णोद्धारात त्यांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल जाणून घेऊ. (Ahilyabai Holkar)
पानिपतची घावांनी सुन्न झालेलं राज्य, जातीपातीच्या भिंतींनी विभागलेला समाज आणि दिशाहीन झालेली संस्कृती…अशा काळात एक स्त्री उठली, शांत पण निर्धाराने भरलेली. तिच्या हातात तलवार नव्हती, पण ती न्यायासाठी लढली; तिच्याकडे सेनाही नव्हती, पण तिने समाजाचं नेतृत्व केलं. ही विद्वान स्त्री म्हणजे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर ! अहिल्याबाईंचा जन्म महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील चोंडी या गावात झाला. त्यांचे वडील, माणकोजीराव शिंदे, गावचे पाटील होते. त्या काळातल्या स्त्रिया शाळेत जात नव्हत्या तरीही त्यांनी अहिल्याबाईंना लिहायला,वाचायला शिकवले. पुढे अहिल्याबाई आठ वर्षांच्या असताना, माळवा प्रदेशचे प्रमुख आणि मराठा पेशवे बाजीराव प्रथम यांच्या सैन्यातील सेनापती मल्हारराव होळकर यांचा मुलगा खंडेराव यांच्याशी त्यांचा विवाह झाला. (Top Stories)
१७४५ मध्ये त्यांनी मालेराव नावाच्या मुलाला जन्म दिला. १७४८ मध्ये त्यांना मुक्ताबाई नावाची मुलगी झाली. दरम्यान त्या अनेक लष्करी मोहिमांमध्ये खंडेराव आणि सासऱ्यांसोबत काम करत होत्या आणि त्यांच्याकडून प्रशासन आणि राजनैतिक कूटनीति याबद्दल शिकत होत्या. पण दुर्दैवाने १७५४ मध्ये, त्यांच्या पतीचा एका युद्धात मृत्यू झाला आणि १७६६ मध्ये त्यांच्या सासऱ्यांचही निधन झाल आणि वयाच्या अवघ्या ४० व्या वर्षी अहिल्याबाईंनी माळवा प्रांताच्या सुभेदारीची सूत्र हाती घेतली.(Ahilyabai Holkar)
अहिल्याबाईंची प्रशासकीय कारकीर्द म्हणजे एक सुवर्णकाळ होता. त्यांनी माहेश्वरला आपली राजधानी बनवली आणि तिथून एक आदर्श प्रशासन राबवल. त्यांनी आर्थिक व सामाजिक उद्योजकतेचीही चळवळ उभारली. विशेषतः १८ व्या शतकात महेश्वर येथे सुरू केलेला महेश्वरी साडी उद्योग हा त्या काळात महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाचा महत्त्वपूर्ण टप्पा ठरला. त्यांनी या उद्योगाच्या माध्यमातून केवळ वस्त्रोद्योगच उभा केला नाही, तर स्त्री सक्षमीकरण, ग्रामीण अर्थव्यवस्था आणि स्थानिक हस्तकलेचा विकास यांचा एक समांतर प्रवाह सुरू केला. थोडक्यात त्यांनी उद्योजकतेचा पाया रचला. आजही त्यांनी उभारलेला महेश्वरी साड्यांचा वस्त्रोद्योग त्यांच्या नावाने ओळखला जातो.
याशिवाय हस्तकला, लघुउद्योग व बाजारव्यवस्थेला चालना देणाऱ्या योजना त्यांनी त्या काळात राबवल्या. त्यांच्याच या प्रयत्नांमुळे महेश्वर हे हातमागाच मोठ केंद्र बनल.अहिल्याबाईंनी या महेश्वरी साड्या स्वतः वापरल्या आणि आपल्या दरबारी स्त्रियांनाही भेट दिल्या. त्यामुळे त्या साड्यांना धार्मिक व सांस्कृतिक मूल्यसुद्धा मिळालं. त्यांनी उद्योगांना केवळ नफा मिळवणारा व्यवसाय म्हणून पाहिल नाही, तर तो लोककल्याणाचा एक मार्ग आहे, अस मानल. आज “व्होकल फॉर लोकल”, “मेक इन इंडिया”, “स्टार्टअप इंडिया” यांसारख्या मोहिमा चालू असताना, त्याची मूळ बीजं अहिल्याबाईंनीच पेरली होती असं प्रकर्षाने जाणवतं.(Ahilyabai Holkar)
उत्तरेत काशीला जा किंवा दक्षिणेत रामेश्वरमला जा. प्रत्येक मंदिरात मराठी पुजारी दिसतोच याच कारण म्हणजे या मंदिरांचा जीर्णोद्धार केलाय पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी. अहिल्याबाई एक धर्माभिमानी हिंदू आणि भगवान शिवाच्या अनुयायी होत्या. हिंदू धर्माच रक्षण करण आणि त्याला प्रोत्साहन देण आणि आई म्हणून लोकांची सेवा करणे हे त्यांच कर्तव्य आहे असं त्या मानत. मुघलांनी, विशेषतः औरंगजेबाने, हिंदू धर्मातील सर्वात पवित्र तीर्थस्थळांपैकी एक असलेल्या वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिर पाडल्यानंतर अहिल्याबाईंनी काशी विश्वनाथ मंदिराची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय घेतला आणि १७८० मध्ये, त्यांनी वाराणसीचे नियंत्रण असलेल्या अवधच्या नवाबाला एक पत्र पाठवून त्यांची परवानगी आणि सहकार्य मागितल. नवाबांनी सहमती दर्शवली आणि अहिल्याबाईंनी त्यांचे दूत, सुतार, गवंडी आणि शिल्पकार वाराणसीला पैसे, साहित्य आणि मंदिराच्या मॉडेलसह पाठवले. (Social News / Updates)
१७८५ मध्ये मंदिर पूर्ण झाले आणि अहिल्याबाईंनी स्वतः अभिषेक समारंभ केला.पण काशी विश्वनाथ मंदिर हे एकमेव मंदिर नव्हत ज्याचा त्यांनी जीर्णोद्धार केला तर त्यांनी अयोध्या, सोमनाथ, त्र्यंबकेश्वर, परळी वैजनाथ, वेरूळ येथील मंदिरांचा जीर्णोद्धार केला. केदारनाथ, रामेश्वरम, मथुरा, प्रयाग इथे धर्मशाळा बांधल्या. नाशिक, पंढरपूर, जेजुरी इथे मंदिरं बांधली. पैठणला अन्नछत्र सुरु केलं. कोल्हापूर जगन्नाथपुरी इथे मंदिराच्या पूजा अर्चनेची व्यवस्था करून दिली. याव्यतिरिक्त द्वारका, गया, हरिद्वार, बद्रीनाथ, ऋषिकेश, उज्जैन, ओंकारेश्वर, कुरुक्षेत्र, पशुपतिनाथ, श्रीशैलम, उडुपी, गोकर्ण आणि काठमांडू या प्रत्येक ठिकाणी मंदिरांच नूतनीकरण किंवा बांधकाम केलं. अनेक मंदिरांना स्वतःच्या पैशातून देणगी दिली. याव्यतिरिक १७९१ मध्ये अहिल्याबाई होळकर यांनी संपूर्ण मणिकर्णिका घाट पुन्हा बांधला. शिवाय अनेक ठिकाणी घाट, विहिरी, तलाव, बागा, धर्मशाळा आणि शाळा देखील बांधल्या आणि यातून विखुरलेल्या भारत देशाला पुन्हा एकदा एकत्र जोडण्याचं काम केलं.(Ahilyabai Holkar)
===============
हे देखील वाचा : Indian Fort : किल्ल्यात दडलाय अरबो रुपयांचा खजिना !
===============
अहिल्याबाईंच वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा साधेपणा आणि प्रजेला आईसारखे पाहण्याची वृत्ती. त्यांनी कधीही भेदभाव केला नाही, मग तो जातीचा असो वा धर्माचा. त्या खऱ्या अर्थाने समाजसुधारक होत्या. त्यांनी विधवांच्या पुनर्विवाहाला प्रोत्साहन दिले आणि सामाजिक रूढींना आव्हान दिले. आपल्या धर्मनिष्ठ, सेवाभावी आणि समरस दृष्टिकोनातून त्यांनी भारताच्या सांस्कृतिक आत्म्याला नवा श्वास दिला. छत्रपती शिवाजी महाराजांपासून प्रेरणा घेत, त्यांनी न्यायनिष्ठ, धर्मप्रधान आणि जनकल्याणकारी असं ‘रामराज्य’च उभं केलं.(Ahilyabai Holkar)
यादरम्यान अहिल्याबाईंच्या जीवनातही अनेक आव्हाने आली, पण त्या प्रत्येक संकटाला धैर्याने सामोर गेल्या. त्या केवळ एक राणी नव्हत्या, तर त्या होत्या एक युगकर्त्या, ज्यांनी आपल्या कर्तृत्वाने इतिहासाला दिशा दिली. पुढे २९ वर्ष राज्य केल्यानंतर, १७९५ मध्ये वयाच्या ७० व्या वर्षी अहिल्याबाईंचे निधन झाल. पण त्यांचा साधेपणा, त्यांची प्रजाप्रेमी वृत्ती आणि त्यांच समाजसुधारणेच कार्य यामुळे त्या आजही लाखो भारतीयांच्या हृदयात जिवंत आहेत. अहिल्याबाईंच्या या थोर प्रवासातून आपण शिकतो की खर नेतृत्व म्हणजे केवळ सत्ता नाही, तर प्रजेच्या कल्याणासाठी निःस्वार्थपणे झटणे! पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांना विनम्र अभिवादन !