बोमन इराणी हे नाव ऐकल्याबरोबर एकापेक्षा एक दर्जेदार कॅरेक्टरची यादीच आपल्या डोळ्यांसमोर उभी राहते. मुन्नाभाईचा जे डॉट अस्थाना, थ्री इडियटसचा विरू सहस्त्रबुद्धे, लगे रहोचा लकी सिंघ अशी कित्येक पात्रे बोमन इराणी (Boman Irani) या माणसाने अक्षरशः जिवंत करून ठेवली आहेत. त्यांच्या जबरदस्त अभिनयाचे, त्यांना मिळालेल्या दैदिप्यमान यशाचे कौतुक करताना आज कुणीच थकत नाहीत. पण म्हणतात ना, सुर्याला जर आपल्या पूर्ण क्षमतेने चमकायचं असेल तर त्याला अगोदर एका लांबलचक काळोख्या रात्रीला पार करावं लागत. यशाचं गणित देखील असच काहीस असत. यशाचा डोळे दिपवणारा प्रकाश बघण्या अगोदर खडतर काळोखी रात्र प्रत्येकालाच अनुभवावी लागते. इराणी यांच्या बाबतीत देखील हेच घडलं. या यशापर्यंत पोहोचण्याअगोदर त्यांचा प्रवास अतिशय खडतर राहिला आहे.
मुंबईमध्ये जन्मलेल्या इराणी (Boman Irani) यांना त्यांच्या आईनेच वाढवलं. त्यांच्या जन्माच्या सहा महिने अगोदरच त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला होता. इराणी यांना लहानपणी डिसलेक्सियाचा आजार होता. आता हा आजार काय असतो? थोडक्यात सांगायचं झालं तर तारे जमीन पर मधला इशान अवस्थी आठवतोय का? त्याला जे काही व्हायचं ना, म्हणजे लिहिण्यावाचण्याचा त्रास, ज्या इतर लोकं अगदी सहज करू शकतात अशा साध्या गोष्टी करणसुद्धा अगदी अशक्य वाटण, अक्षरे ओळखता न येणं. काहीसा अशाच प्रकारचा त्रास इराणी यांना व्हायचा. हळूहळू त्यांनी त्याच्यावर मात केली.
लहानपणी त्यांची आई त्यांना फिल्म्स बघण्यासाठी सतत प्रोत्साहित करायची. मुंबईतील अलेक्झांडर सिनेमामध्ये इराणी (Boman Irani) सिनेमा बघायला लागले. सिनेमांची गाणी, हिरोची एन्ट्री, त्याचे डायलॉग्स हे सगळं बघायला तेव्हा प्रत्येकजण थेटरमध्ये यायचा. पण इराणी यांना त्यात काहीच रस नसायचा. ते कायम सिनेमाचं कलादिग्दर्शन आणि छायांकन याकडे आकर्षित व्हायचे.
त्यांनी मिठीबाई कॉलेजमधून दोन वर्षांचा वेटरचा कोर्स पूर्ण केला. त्यांनतर ताज हॉटेलमध्ये दोन वर्ष वेटर म्हणून काम देखील केले. ताजमध्ये काम करत असतांना त्यांना लोकांकडून ज्या काही टिप्स मिळायच्या त्या साठवून त्यांनी एक कॅमेरा विकत घेतला आणि फोटोग्राफी करायला लागले. तेव्हा शाळेच्या मुलांच्या ज्या क्रिकेट, फुटबॉलच्या मॅचेस व्हायच्या त्या ते जाऊन शूट करायचे आणि २० ते ३० रुपयांना एक अशा भावात त्यांना फोटोज विकायचे. त्यादरम्यान ते ग्रांट रोडवरील त्यांच्या चिप्स फरसाणच्या दुकानात देखील काम करायचे.
वयाच्या बत्तिसाव्या वर्षापर्यंत ते अशीच छोटीमोठी कामे करत राहिले. आयुष्य असंच किती दिवस चालू द्यायचं? स्वतःच्या कुटुंबाला उटीला एका साध्या ट्रीपसाठी घेऊन जायला त्यांना सात वर्षे पैसे जमा करावे लागले होते आणि त्यातल्या त्यात त्या ट्रीपमध्ये त्यांनी बुक केलेल्या हॉटेलचा त्यांना अतिशय घाणेरडा अनुभव आलेला. स्वतःच्या आयुष्यासोबत काहीतरी केलं पाहिजे असा निश्चय करूनच ते उटीवरून परत आले.
सहा महिन्यांनी भारतात बॉक्सिंगच्या वर्ल्डकपचे आयोजन होणार होते. इराणी तेव्हाचे भारतीय बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष अस्पी अदजानिया यांना जाऊन भेटले आणि येऊ घातलेल्या वर्ल्डकपचा ऑफिसिअल फोटोग्राफर म्हणून स्वतःची नियुक्ती करण्याची विनंती केली. तुम्हाला बॉक्सिंग फोटोग्राफीचा काहीच अनुभव नाही हे कारण देत अदजानिया यांनी त्यांना स्पष्टपणे नकार दिला. इराणी (Boman Irani) यांना काहीही करून त्या इव्हेंटसाठी काम करायच होतं. त्यांनी अदजानिया यांना तुमच्या ऑफिसमध्ये जी पडेल ती कामे मी करतो त्या बदल्यात मला वर्ल्डकपची पास द्या अशी विनंती केली. इराणी (Boman Irani) यांची धडपड आणि जिद्द बघून अदजानिया यांनी त्यांना राज्य बॉक्सिंगच्या स्पर्धा ज्या त्या वेळी पार पडत होत्या त्या अगोदर शूट करून दाखव तेव्हा बघुयात म्हणून सांगितले. इराणी यांनी ती स्पर्धा शूट करून त्याचे फोटोज अद्जानियांना जेव्हा दाखवले तेव्हा त्यांच्या कौशल्याने प्रभावित होऊन इराणी यांना वर्ल्डकपचा अधिकृत फोटोग्राफर म्हणून नियुक्त करण्यात आलेलं.
=======
हे देखील वाचा : जेव्हा एका सिनेमासाठी अनिल कपुरला रद्द कराव्या लागल्या होत्या सर्व तारख्या
======
इराणी यांना लहानपणापासुनच अभिनयाची आवड होती. हंसराज सिद्धीया यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी अभिनयाचे धडे गिरवले होते. ‘रोशनी’ या नाट्यकलाकृतीच्या माध्यमातून त्यांनी रंगमंचावर पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी बऱ्याच नाटकांमध्ये भूमिका केल्या. ‘आय अम नॉट बाजीराव’ हे त्याचं सर्वात गाजलेलं नाटक, ज्याने तब्बल दहा वर्षे रसिकांच्या मनावर अन रंगभूमीवर राज्य केलं. २००० साली इरानींनी रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं. सुरुवातीला बऱ्याच जाहिरातींमध्ये काम केल्यानंतर त्यांच्या ‘डरना मना है’ या चित्रपटातील भूमिकेचं विशेष कौतुक झालं. पण त्यांना खरी ओळख मिळाली ती मुन्नाभाई MBBS मधील डॉ. अस्थानांच्या भूमिकेमुळे. फिल्म सामिक्षाकांपासून सामान्य चाहत्यांपर्यंत त्यांच्या अभिनयाने अगदी सर्वांनाच भुरळ घातली. त्यानंतर इराणी यांनी कधी मागे वळून पाहिले नाही. एकापेक्षा एक दमदार भूमिका साकारत त्यांनी लोकांच्या मनावर आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटवला आहे.(Boman Irani)
लिहिण्यावाचण्याची समस्या असलेला मुलगा, हॉटेलमध्ये काम करणारा वेटर, बेकरी चालवणारा गृहस्थ, क्षुल्लक पैशांना आपल्या फोटोज विकणारा कॅमेरामन ते एक अत्यंत यशस्वी नट. इराणी यांचा हा प्रवास येणाऱ्या कित्येक पिढ्यांसाठी प्रेरणा देणारा आहे.