Home » अजित आगरकर(Ajit Agarkar): पूर्ण न उमललेले फुल

अजित आगरकर(Ajit Agarkar): पूर्ण न उमललेले फुल

by Team Gajawaja
0 comment
Ajit Agarkar
Share

अजित आगरकर (Ajit Agarkar)

पूर्ण न उमललेलं फुल हे विशेषण फिट बसतं ते अजित आगरकर (Ajit Agarkar) याच्यासाठी. साधारण २००० साल असावं. मी ज्या बँकेत काम करत होतो त्या बँकेच्या दादर शाखेच्या नूतनीकरणाचा समारंभ आयोजित केला गेला होता. या समारंभासाठी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते. त्यांच्याबरोबरच एक महाविद्यालयीन वाटावा असा एक युवक प्रमुख पाहुणा म्हणून आपल्या आई वडिलांबरोबर आला होता. तो आल्याआल्या सर्वांच्या नजरा त्याच्यावर खिळून राहिल्या. तो राजबिंडा तरुण होता अजित आगरकर. त्यावेळचा भारतातील लोकप्रिय उगवता अष्टपैलू क्रिकेटपटू. आज आठवण होण्याचे कारण म्हणजे ४ डिसेंबर रोजी त्याचा ४४ वा वाढदिवस आहे.

पक्का मुंबईकर असलेल्या अजितचे नाव शालेय क्रिकेटपासूनच मुंबईच्या क्रिकेटविश्वात दुमदुमत होते. त्याच्या अष्टपैलू कामगिरीची वर्णने वृत्तपत्रात रकाने भरून येत होती. तो शारदाश्रम शाळेत होता तर महाविद्यालयीन शिक्षण माटुंग्याच्या प्रसिद्ध रुपारेल महाविद्यालयात घेतले. सचिनचे गुरु रमाकांत आचरेकर यांच्याकडे त्याने क्रिकेटचे धडे गिरवले. 

सर्वप्रथम १९९८मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांसाठी त्याची भारतीय संघात निवड झाली. या मालिकेत त्याने भारतातर्फे सर्वाधिक विकेट्स घेतल्या. यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही. शारजातील एकदिवसीय स्पर्धेत त्याने आपली चुणूक दाखवली. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात मोक्याच्या वेळी ४ बळी मिळवून त्याने भारताला सामना तर जिंकून दिलाच, त्याशिवाय तो सामनावीर पण ठरला.

त्याकाळी एकदिवसीय सामन्यात सर्वात जलद ५० बळी मिळवण्याचा विक्रम त्याच्या नावावर होता. तसेच सर्वात कमी सामन्यात २०० विकेट्स व १००० धावा पूर्ण करण्याचा विक्रमही त्याने नोंदवला होता. त्याने १९१ एकदिवसीय सामन्यात २८८ विकेट्स काढल्या. भारतातर्फे एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक बळी टिपण्यात तो तिसऱ्या स्थानी आहे. तो १९९९, २००३, २००७ अशा ३ विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचा सदस्य होता. २००७ च्या पहिल्या टी २० विश्वचषक स्पर्धेतही त्याची भारतीय संघात निवड झाली होती.

अजित आगरकरांच्या खेळाचे वैशिष्ट्य म्हणजे तो भारताला पहिल्या काही विकेट्स झटपट मिळवून द्यायचा. त्याची किरकोळ शरीरयष्टी आणि मध्यम रन अप यांच्या मानाने त्याच्या चेंडूचा वेग फलंदाजाला आश्चर्यचकित करत असे. बरेचदा त्याच्या चेंडूच्या वेगाला फलंदाज चकायचे. अशाच एका चेंडूवर त्याने मार्क वॉ च्या यष्ट्या तीनताड उडवल्याचे अजूनही समरणात आहे.

त्याच्याकडे चांगला आऊटस्विनगर होता. त्याचा मारा स्वैर असायचा त्यामुळे त्याच्या गोलंदाजीवर धावासुद्धा खूप निघायच्या. १९९९ च्या इंग्लंडमधील विश्वचषक स्पर्धेत पहिल्याच झिम्बाब्वे विरुद्धच्या सामन्यात त्याने वाईड चेंडूची खैरात केली होती. भारत तो सामना फक्त ३ धावांनी हरला तेव्हा आगरकर टीकेचा धनी झाला होता. या पराभवामुळे भारताचा उपांत्य फेरीतील प्रवेश हुकला होता.

मात्र एकदिवसीय क्रिकेटमध्ये मैदान  गाजवणारा आगरकर कसोटीत त्या पराक्रमाची पुनरावृत्ती करू शकला नाही.त्यामुळे त्याच्यावर एकदिवसीय क्रिकेटसाठीच उपयुक्त खेळाडू असा शिक्का बसला. वास्तविक त्याची गुणवत्ता एवढी अमाप होती की तो कसोटीत भारताचा नवा ‘कपिल देव’ होऊ शकला असता.

आगरकरने एकूण २६ कसोटी सामने खेळले त्यात त्याने १६.७९ च्या सरासरीने ५७१ धावा काढल्या आणि ४७ च्या सरासरीने ५८ विकेट्स घेतल्या. ही सरासरी जरा उलटी असती तर तो खरोखरच कपिल देवचा वारस ठरला असता. 

सिद्धू म्हणतो त्याप्रमाणे ‘statistics is just like a mini skirt that hides more than it reveals’ हे आगरकरच्या बाबतीत लागू पडते.त्याच्या आकडेवारीवरून त्याच्या गुणवत्तेची कल्पना येत नाही. १९९९ च्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यात तो सहा डावांपैकी लागोपाठ पाच डावात शून्यावर बाद झाला तेव्हा चेष्टेचा विषय बनला होता. ऑस्ट्रेलियन खेळाडू तर त्याला टोमणे मारण्याची एकही संधी सोडत नसत. पण जिद्दी आगरकरने हार मानली नाही.

२००२ च्या इंग्लिश दौऱ्यात लॉर्ड्स वरील पहिल्या कसोटीत दुसऱ्या डावात पराभव स्पष्ट दिसत असताना त्याने आपल्या फलंदाजीचे कौशल्य पणाला लावून नाबाद १०९ धावा ठोकल्या. अकराव्या क्रमांकाच्या आशिष नेहराला सांभाळत त्याने आपले शतक पूर्ण केले. त्याने मारलेले ड्राईव्हज, पूल्स आणि कट्स नेत्रदीपक होते. त्यावेळी त्याच्या खेळीचे सुनील गावस्करांनीही कौतुक केले होते.

आगरकरच्या या खेळीने आपल्या संघात आत्मविश्वास निर्माण केला. पुढील सामन्यांमध्ये भारतीयांनी धावांचे इमले तर रचलेच पण लीड्सची कसोटी जिंकून मालिकाही बरोबरीत सोडवली. त्याच्या नावावर २१ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक मारण्याचा भारतीय विक्रम आहे. कदाचित त्याला वरच्या क्रमांकावर खेळायला मिळाले असते, तर तो आपल्या फलंदाजीला न्याय देऊ शकला असता असे वाटते.

गोलंदाजीतही तो काहीसा दुरलक्षित राहिला. त्याला कायम झहीर खान, आशिष नेहरा, इरफान पठाण, बालाजी आणि सुरवातीला श्रीनाथ यांच्या तीव्र स्पर्धेला तोंड द्यावे लागले. २००३-४ च्या ऑस्ट्रेलियातील मालिकेतील ऍडलेड येथील विजयात अगरकरचा द्रविड व लक्ष्मण यांच्या बरोबरीने सिंहाचा वाटा होता.

त्याने ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात केवळ ४१ धावांच्या मोबदल्यात ६ बळी घेऊन ऑस्ट्रेलियाला माफक धावसंख्येत गुंडाळून भारताचा विजय आवाक्यात आणून ठेवला. या डावात त्याने अत्यंत शिस्तबद्ध मारा करून हेडन व पॉन्टिंगचे महत्वाचे बळी पण मिळवले.

सन २०१३ मध्ये  त्याने आपल्या नेतृत्वाखाली मुंबईला रणजी करंडक जिंकून दिला होता. त्या वर्षी मुंबईने सौराष्ट्राला अंतिम सामन्यात हरवले होते. विशेष म्हणजे या सामन्यात सचिन तेंडुलकर अजित आगरकरच्या हाताखाली खेळला होता.

२०१३ मध्ये क्रिकेटमधून सन्यास घेतल्यावर त्याने मुंबईच्या निवड समितीचे अध्यक्षपद भूषवले. सध्या तो क्रिकेट समालोचक म्हणून लोकप्रिय आहे. नुकतेच न्यूझीलंडविरुद्धच्या टी २० मालिकेत राहुल द्रविडने, हर्षल पटेलला भारताची ‘कॅप ‘देण्यासाठी खास अजित आगरकरला बोलावले होते.

आगरकरच्या कारकिर्दीकडे दृष्टिक्षेप टाकल्यास असे म्हणावेसे वाटते की हे फूल खूप लवकर उगवले पण पूर्ण फुलायच्या आतच कोमेजून गेले. त्यामुळे त्यातील मधाचा आस्वाद भारतीय क्रिकेटप्रेमींना फार काळ घेता आला नाही हे त्याचे दुर्दैव.

– रघुनंदन भागवत
(लेखक क्रीडा अभ्यासक आहेत)

टीप : या लेखातील माहिती आणि मते ही सर्वस्वी लेखकाची आहेत. क फॅक्टस टीम याची पुष्टी करत नाही. तसेच लेखकाच्या मतांशी आम्ही सहमत असूच असेही नाही.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.