Home » शनिवार, रविवार आणि कारवार..

शनिवार, रविवार आणि कारवार..

by Correspondent
0 comment
Karwar | K Facts
Share

कारवारला जायच तर ठरवलं. पण तिकडे दिवसाच पोचणारी गाडी हवी असल्याने बरीच शोधाशोध करावी लागली. शेवटी कारवारला माणशी रु.६० भरून १२ तासासाठी उत्तम रेल्वे रिटायरिंग रूम्स मिळतात. तिथेच ताजेतवाने होऊन भटकायला बाहेर पडलो. लाल मातीचा रस्ता, जवळ समुद्र त्यामुळे दुतर्फा माडाची झाडं, वाऱ्यामुळे होणारा झावळ्यांचा नाद आणि कौलारू घरांच्या वाड्या. सगळी कोकण किनारपट्टी, तरीही वेगळेपणा असलेले कारवार म्हणजे स्वर्गच जणू! वीकएण्ड पिकनिकसाठी कारवारसारखं दुसरं ठिकाण नसावं.

कारवार स्टेशनपासून कारवार गाव अवघ्या ८ कि.मी. अंतरावर आहे. कारवारमध्ये प्रेक्षणीय म्हणजे देवबाग बीच आणि रवींद्रनाथ टागोर बीच म्हणजे आपली चौपाटीच. जवळच समुद्रात छोटसं बेट दिसतं ते देवबाग बीच. तिथे बोटीने जाता येतं. पण बीचवर राहायला असलेली रिसॉर्टस मात्र खूपच महाग आहेत. समुद्रात मोठमोठ्या बोटी जवळून दिसतात. आणि लाल मातीच्या रस्त्याचं कारण म्हणजे कारवारला मँगनीजच्या खाणी आहेत. मँगनीजच्या उत्पादनाचे, उत्खननाचे अनेक कारखाने, मोठमोठी अवजारे तिथे आढळतात. रस्त्याला लागून असणाऱ्या खाणींच्या बाजूला उंचच उंच भिंती आहेत आणि पाहाराही आहे. इतकच काय पण तिथून समुद्राचे फोटो काढायलाही मनाई आहे. हे सर्व पाहत पाहतच आम्ही गोकर्णकडे रवाना झालो. गोकर्ण गाव तसं  साधंच. गोवा-मंगलोर मुख्य रस्त्यावरून उजवीकडे कारवारपासून ५० कि.मी. वर एक फाटा वळतो. तो रस्ता गोकर्णकडे जातो.

दुतर्फा हिरवी शेती आणि अनेक ठिकाणी खाडीचं पाणी आत आलेलं. त्यावरून छोटे छोटे पूल बांधलेले. नारळाच्या बागामधून घोंघावणारा वारा, भर दुपारीही आल्हाददायक वातावरण, साधारण दीड वाजेपर्यंत आम्ही मंदिराजवळ पोहोचलो. गाडी मंदिरापासून २०० मीटर अंतरापर्यंत उभी करता येते. तिथे समोरच भला मोठा, काळपट तपकिरी रंगाचा, एखाद्या रो-हाउस बंगल्याइतक्या उंचीचा रथ उभा केला होता. चाकांवर व रथावर नक्षीदार कोरीवकाम केलेलं. अतिशय सुबक आणि सुशोभित असा रथ पाहून अचंबित व्हायला होतं. थोडं पुढे गेल्यावर तिथे अहिल्याबाई होळकरांचा वाडा पाहायला मिळतो. गोकर्ण, महाबळेश्वर क्षेत्री त्या नेहमी येत असत अशी माहिती सध्या वाड्यात राहणाऱ्या कुटुंबाने दिली. सध्या हा वाडा सरकारजमा असून वाड्यातील एका छोट्या मंदिराचे पुजारी व त्यांचे कुटुंब तिथे वस्तीला असून तिथली देखभाल पाहण्याचा पगार त्यांना मिळतो. शिवाय देवळातील उत्पन्न मिळते.

Karwar

मुख्य गोकर्ण मंदिराच्या आधी आम्ही गणपती मंदिरात जाऊन आलो. या गणपतीने शिवलिंग हातात धरले त्या गणपतीची तिथे स्थापना करण्यात आली आहे. नंतर आम्ही गोकर्ण मंदिरात गेलो. मंदिरात मोठा घेर असणरे काळ्या पाषाणाचे पुष्कळ खांब होते खांबाच्या मधोमध पितळी दांडा व त्यापुढे महाद्वार, महाद्वारातून आत गेल्यावर आणखी एक दार व आत गाभारा आहे. दाक्षिणात्य पद्धतीनुसार इथेही गाभाऱ्यात अंधारच परंतु पणत्यांचा प्रकाश मात्र इथे असतो. इथली मुख्य पिंडी तिथे असलेल्या खड्ड्यात हात घालून चपापता येते. अशा या गोकर्णहून अवघ्या ५ कि. मी अंतरावरील ॐ बीच पाहायला गेलो.

थोड्या उंच टेकडीवरील ही नयनरम्य जागा खरोखरच आनंददायी आहे. तिथून वरच्या बाजूने समोर जो समुद्रकिनारा दिसतो तो ॐ आकाराचा असल्याने त्यास ॐ बीच असे नाव पडले. खरोखरच तिथे नावाप्रमाणेच समुद्रात जमिनीचा किंवा वाळूचा असा काही अर्धगोलाकार भाग निर्माण झाला आहे की पाहणारा स्तिमित होऊन जातो. पण या ठिकाणची खरी मजा घ्यायची तर संध्याकाळी ५.३० नंतर पोहोचावं. म्हणजे ॐ बीच व त्यापुढे पसरलेला अथांग सागर, त्या समुद्रात सोडलेल्या नौका, किनाऱ्यावर वाळूत खेळणारी मुलं आणि पर्यटक, आकाशातून विहरणारे शुभ्र थवे, निळ्याशार पाण्यावरच्या तरंगात सूर्यबिंबाची प्रतिमा उमटल्याने त्यावर चढलेली केशरी व सोनसळी झाक आणि मावळतीला कललेलं सूर्यबिंब, ढगांचे मनोहारी रंग हे सगळे कॅमेऱ्यात व डोळ्यांत साठवून घेता येतं.

आता वाटा वळल्या त्या मुर्डेश्वराच्या दिशेने. हे ९० कि.मी. अंतर पार करायला २ तास पुरतात. गोकर्णप्रमाणेच कारवार-मंगलोर रस्त्यावर उजवीकडे कुमठ्यानंतर एक फाटा जातो. तिथूनही २०/२२ कि.मी. अंतरावर मुर्डेश्वर असावं. पण शंकराच्या भव्य पुतळ्याचे ओझरतं  दर्शन २ कि.मी. आधी घडतं, पण नंतर एकदम गायब झालेला पुतळा देवळापासून आणि समुद्रकिनार्यापासून ५०० मीटर अंतरावर दिसून येतो. जेमतेम ५०-६० पायऱ्या पार करून वर गेल्यावर शंकराच्या भव्य पुतळ्याच्या पायथ्याशी आपण असतो आणि पुतळ्याच्या मागे अथांग पसरलेला सागर व त्यात अस्ताचलास जाणारा दिनमणी सुर्य।

Karwar

आताच्या मुंबईतल्या गगनचुंबी इमारती म्हणजे १० ते १२ मजली असाव्यात. साधारण एवढ्या उंचीचा शंकराचा पुतळा. तो पाहूनच  आपण थक्क होतो. शंकराची तपस्यामूर्ती गडद निळ्या रंगाची. त्रिशूल, डमरू, पिनाकपाणी । चंद्रकला शिरी, सर्प गळ्यातुनी ।। अशा काव्यपंक्ती न स्फुरल्या तरच नवल ! पद्मासनात बसलेली मूर्ती एका मोठ्या दगडी चौथऱ्यावर आहे. त्या मूर्तीच्या बरोबर खाली शंकराची पिंडी, मंदिर त्यामागे प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा बनवलेला हिमालय पर्वताचा आकार. त्या पार्वतावर गणेश व शंकर पार्वती आणि नारदादी देव असे सर्व वसलेले आहेत मंदिराच्या डाव्या बाजूने तिकीट काढून आत जाण्याचा मार्ग आहे.

त्या मंदिरात संपूर्ण गोलाकार प्रदक्षिणा होईल अशा पद्धतीने गोकर्णाची म्हणजे रावणाची कथा प्रसंगरूप मुर्तीमय चित्रांकित केलेली आहे. ती कथा कन्नड भाषेत आहे. पण ती भाषा साधारण समजत होती. सूर्यास्नाचा देखावा आणि शंकराच्या उंच मूर्तीचा देखावा पाहून डोळ्यांचं  पारणं फिटलं .समोर सूर्याचा सात घोड्यांचा रथ, महाभारतातील भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनास गीता सांगितली तो प्रसंग व इतर अनेक कथा मूर्तिबद्ध केलेल्या आहेत. त्याच्या सभोवतालची संपूर्ण दाट हिरव्या गवताची नक्षी, हिरवळ आणि त्यामागे अथांग समुद्र. आमचं PWD चं बुकिंग कुमठा इथं झालेलं असल्यामुळे ६० कि.मी. चा प्रवास करून परतून मागे जाणं भाग होतं.

या सहलीत एक दिवस खास आरक्षित ठेवावा तो ‘जोग फॉलसाठी’. यालाच काहीजण गिरसप्पाचा धबधबा संबोधतात. पण प्रत्यक्षात ते दोन वेगवेगळे धबधबे आहेत. वळणावळणांचा घाटाचा रस्ता, गर्द हिरवाई, पण बऱ्याच ठिकाणी धबधबे दिसूनही वाहत्या पाण्याचे प्रमाण तसं कमीच आहे. पण उन्हाची काहिली मात्र जाणवत नाही. रस्ता संपूर्ण वाकडातिकडा, पावसाळ्यात कोणीही जोग फॉलला जाण्याचे धाडस करू नये असा. जोग फॉलला गेल्यावर आम्ही दीडशे फूट खोल दरीत कोसळणारा धबधबा पाहिला आणि हा आपल्या भारतभूमीवर असल्याचा सार्थ अभिमान, थोडी भीती अशा सर्वच भावनांनी मन भरून गेलं खाली धबधबा जिथे कोसळतो तिथपर्यंत जाण्यासाठी थोड्या पायऱ्या, थोडा मातीचा खडबडीत उताराचा रस्ता आहे.

Karwar

वरून माणसं अगदी मुंगीएवढी दिसत होती. तिथून वर पाहिल्यानंतर प्रपाताचं दिसणारं रूप आणि तिथला एवढ्या जवळून ऐकू येणारा आवाज याची नुसती कल्पनाच केलेली बरी, खरं तर आम्हाला तिथे खालपर्यंत जायचं होतं. पण परत वरती येताना या दरीचा उंच सुळका चढणं कठीण होतं. हे सर्व विचारात घेऊन समोरच्या कड्यावरून दुरूनच त्या जोग धबधब्याचं  मनमुराद दर्शन घेतलं, धबधब्याच्या वरच्या अंगाला धरण बांधल्यामुळे सध्या हा प्रपात कमी प्रमाणात होत असल्याची माहिती तिथे मिळाली. पण भर पावसात याचा रुद्रावतार प्रेक्षणीय असतो असं म्हणतात. पुन्हा पावसाळ्यात येण्याची स्वप्न घेऊन परतीला निघालो. पुढचं ठिकाण होत बनवासी

तहानलेल्या जिवाला थंड पेय पाजून भर दुपारी दीड वाजता आम्ही बनवासीला पोहोचलो. वाटेत शिरसी आलं, पण आता तिथे न थांबता तडक बनवासी येथे जायचं ठरवलं. बनवासीला मधुकेश्वराचं मंदिर आहे. ते शंकराचंच आहे. मंदिराच्या अगदी जवळ ५० फुटांपर्यत गाडी थांबवता येते. दर्शनी भागातच  मोठे आवार. प्रशस्त प्रांगण. त्यापुढे मंदिर काळ्या पाषाणातलं. या मंदिरात अनेक खांब, प्रत्येक खांब वरून कोरलेला, मधला भाग गुळगुळीत आणि एकेका खांबाचा घेर किंवा परीघच मुळी मोठ्या पिंपाच्या आकाराचा. आपण खांबाला विळखा घातला तर आपले दोन्ही हात एकमेकांपर्यंत पोहोचतही नाहीत. तिथली नंदीची मूर्ती साधारण ९-१० फूट उंचीची आहे. आणि हा नंदी वाकड्या मानेने व तिरक्या नजरेने बघतो. असं का? तर तिथे बाजूलाच पार्वतीचं मंदिर आहे आणि त्या खांबांच्या आडून एक जागा अशी आहे की त्या नंदीच्या मानेजवळ उभे राहून आपण पाहिलं तर आपल्याला पार्वतीची मूर्ती छान दिसते. हा नंदी एका डोळ्याने पार्वतीकडे पाहतो. अर्थातच भक्तिभावानेच

मंदिर दुपारी ३ वाजता उघडणार होतं. आसपास मंदिर समूह पाहायला आम्ही सोबत गाइड घेतला. प्रशस्त आवारातली सगळी मंदिरं पाहिली. तरी फक्त अडीच वाजले होते. आम्ही पुन्हा गाभाऱ्यासमोर येऊन बसलो. पुढचं ठिकाण होतं सहस्रलिंग बनवासी. मधुकेश्वरहन ४-५ कि.मी. अंतरावर गर्द वनराईत एक नदी वाहते. त्या नदीकाठी आम्ही पोहोचलो. ३०-४० पायऱ्या उतरून पाहतो तो काय, त्या प्रवाहात शेकडो शिवलिंग, काही अगदी छोटी, काही मोठी, काही नंदीजवळ असलेली, काही तुटलेली आणि प्रत्येक शिवलिंग दगडात कोरून त्या दगडासकट तिथे रुतलेलं किंवा मुद्दाम अर्धवट सोडलेलं, त्यावेळी नदीचा प्रवाह उथळ खळखळाटाचा होता.

Karwar

पण पावसाळ्यात हीच नदी प्रत्येक शिवलिंगावर नैसर्गिक जलाभिषेक करीत वाहते असं कळलं. उतार असल्यामुळे पाणी जसं वाहतं तसतसा पुढल्या शिवलिंगांवर त्याचा अभिषेक होतो. असा झळझळ प्रवाह, मागच्या गर्द राईतून डोकावणारी सूर्याची सोनसळी तिरपी किरणं, दुपारी साडेचार वाजताही जंगलातला मंद गारवा आणि नीरव शांतता, ऋषिमुनी, तपस्वी, साधकांना आत्मचिंतनामाठी याहून सुंदर जागा क्वचितच सापडेल. पण आम्हाला तिथून काढता पाय घेणं भाग होतं. अजून मदिकांबिकेचं मंदिर व शिरसी पाहायचं होतं.

मदिकांबिकेच मंदिर भव्य आणि सुबक आहे. मूर्तीचे भाव आनंददायी आहेत. मंदिराच्या आतील व बाहेरील रंगीत नक्षी सुबक आणि मनोवेधक आहे. शेवटच्या दिवशी इडगुजीचा गणपती पाहून कारवार दर्शन आणि मुंबईकडे परतीचा प्रवास असा आराखडा ठरल्याप्रमाणे पार पडला. मुर्डेश्वरहन परत येताना होनावरच्या जवळ उजवीकडे फक्त ५ कि.मी. अंतरावर एक फाटा जातो तो इडगुंजी गावाकडे. इथे असलेली गणपतीची उभी मूर्ती मनमोहक आहे. पण हे मंदिर वास्तुशिल्प किंवा बांधकाम अशा दृष्टीने खास नाही. पण तरीही त्याला माहात्म्य आहे.

अशी आमची वीकएण्ड पिकनिक खरोखरच खूप छान झाली, मग तुम्ही कधी निघणार शनिवार रविवारच्या सुट्टीत कारवारला?

” शुभं भवतु “

लेखक – युधामन्यु गद्रे
Contact: yudhamanyu@gmail.com


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.