Home » लिखे जो खत तुझे वो तेरी यादमे…

लिखे जो खत तुझे वो तेरी यादमे…

by Correspondent
0 comment
Shashi Kapoor | K Facts
Share

प्रिय शशी बाबास,

मेहेरबान लिखूं या दिलरुबा लिखूं, हैरान हूँ के इस खतमे तुम्हे क्या लिखू…

दादासाहेब फाळके सारख्या भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च सन्मानाने गौरवल्या गेलेल्या तुझ्यासारख्या करोडो चाहत्यांच्या लाडक्या कलाकाराला खरोखर कोणत्या नावाने संबोधित करावे हा प्रश्न पडावा असेच तुझे व्यक्तिमत्व आहे. ऐंशीच्या उंबरठयावर पोहोचलेला असतांनाही तुला एकेरी नावाने हाकारावे इतका आम्हाला आमच्या मित्रासारखा जिंदादिल इन्सान वाटायचास तू.

तुझे नाव निघाले अन रसिक प्रेक्षक मग तो कोणत्याही पिढीचा असो, त्याला दिवार,जब जब फूल खिले किंवा वक्त प्यार किये जा आठवत नाही तो तुझा चाहताच काय पण सिनेप्रेमीही नसावा, असे खुशाल समजावे. तुझा “मेरे पास माँ है” हा दिवार मधला डायलॉग आता सुभाषित बनला आहे.जब जब फूल खिले, आमनेसामने, किंवा प्यार किये जा, शर्मिली, हसिना मान जायेगी मधील तुझे नृत्यातील पदलालित्य आणि नाचताना ओसंडून उतू जाणारा उत्साह, सळसळतं प्रसन्न हसतमुख व्यक्तिमत्व क्षणात अरसिकालाही रसिक बनवते. दुरमुखलेल्याला हसतमुख करते ही सारी किमया तू कुणाकडून घेतलीस असा प्रश्न पडावा इतका तुझा रुपेरी पडद्यावरील सहज वावर, निरागस, भाबडा, तर कधी खोडकर, निष्पाप चेहरा प्रेक्षकांना संमोहित करतो.

तशी तुझी अभिनयाशी ओळख पृथ्वी थिएटर्सच्या नाटकापासून वयाच्या चौथ्या वर्षापासूनच झाली, पृथ्वी थिएटर्स ही पापाजींची (स्व.पृथ्वीराज कपूर) यांची नाटक कंपनी. त्याच्या त्याकाळी गाजलेल्या अनेक नाटकात तू ऐनवेळी वेळ मारुन नेण्यासाठी अभिनयापासून कोणतेही पडेल ते काम केलेस ते आपल्याच घरचं कार्य म्हणून. रंगभूमीवर वावरत असतानाच बाल कलाकार म्हणून तू १९५० पासूनच संग्राम, दानापानी सारख्या व्यावसायिक चित्रपटात कामे केली. अन नंतर आपल्या थोरल्या भावाच्या आग आणि आवारा मध्ये ही उल्लेखनीय कामगिरी केली.बालकलाकार म्हणून तू जवळपास १९ चित्रपटात कामे केली. त्यानंतर मात्र माटुंग्याला आपले शालेय व कॉलेज शिक्षण पूर्ण करत असतानाच. चित्रपटसृष्टीत तू सहाय्यक दिग्दर्शक म्हणून १९५८ च्या पोस्ट बॉक्स नंबर ९९९ पासूनच लोखंडाचे चणे चावायला सुरवात केली होती.

गेस्ट हाऊस, मनोरंजन,दुल्हादुल्हन, श्रीमान सत्यवादी सारख्या आता प्रेक्षकांच्या खिजगणतीतही नसणा-या चित्रपटातून तू सहाय्यक दिग्दर्शक म्हणून तुझी चित्रपट कारकिर्द घडवायला सुरवात केलीस. खरं तर त्यावेळीही तुझे अंतिम ध्येय नायक बनणे हेच होते. १९९१ च्या अजूबा या तुझ्याच फिल्लमवाला प्रॉडक्शनच्या चित्रपटाचे दिग्दर्शन करुन तू या चित्रपटात पूर्ण वेळ पूर्ण तयारी निशी दिग्दर्शक म्हणून उतरलास तरी तो तुझा पहिला आणि अखेरचा प्रयत्न ठरला. निर्माता दिग्दर्शक बी.आर चोप्रा यांनी धर्मपुत्र मध्ये प्रथम तुला नायक म्हणून १९६० मध्ये रुपेरी पडद्यावर चमकवले, तुझे सुरवातीचे प्रेमपुत्र,चार दिवारी किंवा मेहंदी लगे मेरे हाथ सारखे चित्रपट तिकिट खिडकीवर त्याकाळी फारसा प्रभाव न टाकू शकल्याने या चित्रपटात तू जीव ओतून काम करुनही त्याचे चीज झाले नाही पण त्याआधी साठच्या दशकात नायक म्हणून जेंव्हा धर्मपुत्र चित्रपटाद्वारे तू या इंडस्ट्रीत आला तेव्हा कपूर घराण्यातील असूनही अपयश तुझ्या मागे हात धुवून लागले आणि जुआरी, बिरादरी, अशा एक ना दोन ओळीने सर्व चित्रपटात जेंव्हा प्रेक्षकांनी तुला हिरो म्हणून नाकारले तेव्हा तू सरळ ब्रिटीश चित्रपट कंपन्यांच्या इंग्रेजी चित्रपटातून काम करायला सुरवात केली. तू नही और सही असं म्हणत बॉलीवूडच्या नकाराची पर्वा न करता तू हाऊसहोल्डर (१९६३), शेक्सपियरवाला (१९६५) मॅटर ऑफ इनोसन्स (प्रेटी पोली) (१९६७) बॉम्बे टॉकीज (१९७०) सिध्दार्थ (१९७२), वा पत्नी जेनिफरचीसुध्दा भूमिका असलेला हॉट ॲण्ड डस्ट (१९८२), सॅमी ॲण्ड रोझी गेट लेड (१९८७), डिसिव्ही (१९८८) मुहाफिज (१९९४) वा साईड स्ट्रीट (१९९८) असेल. या हॉलीवूड,ब्रिटिश तसेच अमेरिकन चित्रपटातून आपल्या अभिनयाची मोहोर उठवली.

Shashi Kapoor

৭९६१-६२ च्या दरम्यान रिलीज झालेल्या चित्रपटांनी तुला नायक म्हणून मान्यता मिळाली नाही तरी १९६५ च्या मुहोबत इसको कहते चा अपवाद वगळता सूरज प्रकाश च्या जब जब फूल खिले चित्रपटाने एकाच वेळी व एका रात्रीत तुझी नि बेबी नंदाची जोडी तिकिटाच्या बारीवर क्लिक झाली. १९६४ च्या या चित्रपटापासून बेबी नंदाशी तुझी जोडी जमली मेहंदी लगे मेरे हाथ, जब जब फूल खिले, निंद हमारी ख्वाब तुम्हारे, जुआरी, राजासाब व रुठा ना करो अशा सात आठ चित्रपटात तुमच्या जोडीने काम केले अन प्रेक्षकांनीही राजेंद्रकुमार-मिनाकुमारी प्रमाणे शशी कपूर-नंदा या जोडीला पसंती दिली होती. बेबी नंदाबरोबर जे तुझे चित्रपट हिट झाले व तुम्हा दोघांची रुपेरी पडद्यावरील यशस्वी  जोडी म्हणून रसिकांनी जी पसंतीची मोहोर उमटवली त्याविषयी एका मुलाखतीत तू सांगितले होतेस की आजवर मी ज्या ज्या नायिकांबरोबर कामे केली त्या सर्व नायिकांमध्ये नंदा ही माझी सर्वाधिक आवडती नायिका होती व आजही आहे. बेबी नंदानेही आपला आवडता नायक तू असल्याचे जाहिररित्या मान्य केले होते हे विशेष,राजकपूर व शम्मी कपूर यांचा धाकटा भाऊ असूनही तुझ्या नृत्यशैलीत त्या काळातील कोणालाही राजकपूर वा शम्मीकपूरची नक्कल आढळली नाही उलट तेंव्हांची आळोखेपिळोखे देत खांदे उडवत तू स्वतःची अशी एक वेगळीच नृत्यशैली प्रस्थापित केली जी तत्कालीन तरुण पिढीने डोक्यावर घेतली. प्यारका मौसम प्यार किये जा, आमने सामने, जब जब फूल खिले, रुठा ना करो सारखे काही चित्रपट व त्यातील गाणी आठवली तर ही गोष्ट कुणालाही सहजी पटावी.

१९६४ नंतर कासव गतीने कां होईना पण तुझा आलेख चढताच होता. विशेषतः सत्तर ऐंशीच्या दशकात तू बॉलीवुडचा सर्वाधिक बिझी स्टार होता. अंदाजे अडीच तीन तासाच्या त्याकाळी तू रोज ४ ते ५ शिफ्ट करत होतास. तुझ्या तारखा मिळणे तेंव्हा कपिलाशष्ठीचा योग समजला जात होता. अन नेमक्या याच वेळी राजकपूरने तुला सत्यम शिवम सुंदरम चा नायक म्हणून निवड केली अन त्यावेळचे ते तुझे अत्यंत धावपळीचे बिझी शेडयूल बघूनच राजकपूरने तुला टॅक्सीची उपमा दिली होती, त्यात काहीच वावगे नव्हते. कारण या काळात तू तत्कालीन झिनत आमान, मौसमी चॅटर्जी, शर्मिला टागोर, आशा पारेख, रेखा, मुमताज, हेमामलिनी,  राखी, बबिता, पासून सुलक्षणा पंडीत, रीना रॉय पर्यन्त जवळपास सर्व नायिकांबरोबर काम केलेस तर सहनायक वा सोलो हिरो म्हणून तू प्राण, धर्मेद्र, संजीवकुमार यांच्याप्रमाणेच अमिताभ बच्चन बरोबरही अनेक सुपरहिट चित्रपट याच काळात दिलेस. पण या काळात तू केलेल्या चित्रपटांचा लसावि काढला तर फारच थोडे चित्रपट दखलपात्र, संस्मरणीय असतील. बाकी सर्व चित्रपट म्हणजे मसाला चित्रपट. आमने सामने सुहाना सफर, पाखंडी, आ गले लग जा, प्रेमकहानी, फांसी, सलाखे फकिरा, पतंगा, रुठा ना करो, अभिनेत्री, पाप और पुण्य, सारख्या गल्लाभरु पण आशयहीन, दर्जाहीन अशा आल्सो रन कॅटेगिरीतील चित्रपटांची नावे देखील आठवू नये तर कभी- कभी, सत्यम शिवम सुंदरम, न्यू दिल्ली टाईम्स, शर्मिली, बसेरा, पिघलता आसमान, उत्सव, सवाल, सिलसिला, दिवार सारखे चित्रपट तुझ्यातील अभिनेत्याला आवाहन करणारे होते. अमिताभबरोबरचे सिलसिला, कभीकभी, सुहाग, इमान-धरम, त्रिशूल, काला पत्थर, शान, नमकहलाल,अकेला हे तुझे सहनायक म्हणून गाजलेले चित्रपट एकीकडे तर प्राण बरोबरचे राहू केतू, मान गये उस्ताद, फासी, चोरी मेरा काम, बिरादरी, शंकरदादा, चक्कर पे चक्कर हे मसाला चित्रपट दुसरीकडे.

Actor Shashi Kapoor
Shashi Kapoor

तुझ्यासारखा अतिशय संवेदनशील अभिनय क्षमता असणारा प्रतिभाशाली कलाकार इतक्या चिल्लर चित्रपटात सुमार स्वरुपाचे काम करताना बघून आम्हा रसिकांना मनस्वी खेद वाटत होता. पण त्यावेळी आम्हाला हे ठाऊक नव्हते की,त्यावेळी तुझी पत्नी जेनीफर दुर्धर आजाराने आजारी असल्याने तू केवळ पैशासाठी हे चित्रपट स्विकारुन तिच्यावर महागडे उपचार करत होतास अन दुसरीकडे तुझ्या मनात स्वतःच्या मनाप्रमाणे चित्रपटनिर्मिती करण्यासाठी स्वतःची चित्रपटकंपनी काढण्याचेही होतेच ज्यासाठी तू समोर येईल त्या चित्रटाचे करार खिशात धालून स्वतःची टॅक्सी करुन घेतली होतीस. जी उणिव तु नंतर आपल्या स्वतःच्या चित्रपटकंपनीतर्फे एकसे बढके एक असे चाकोरीबाहय, क्लासिक चित्रपट बनवून भरुन काढलीस.

तुझ्या चित्रपटांना आणि तुझ्या अभिनयासाठी तुला जितके राष्ट्रीय पुरस्कार मिळाले तितके क्वचितच अन्य कुणा कलाकारांना मिळाले असतील. दादासाहेब फाळकेंसारख्या सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्काराबरोबरच तुझ्याच न्यू दिल्ली टाईम्स चित्रपटातील अभिनयाबददल तुला १९८६ मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून राष्ट्रीय पुरस्काराने तुझ्यातील कलाकाराचा गौरव राष्ट्रीय स्तरावर झाला. त्याशिवाय तुझ्या होम प्रॉडक्शनच्या फिल्मवाला संस्थेच्या पहिल्याच जुनून ला १९७९चा सर्वोत्कृष्ट चित्रपटांचा राष्ट्रीय पुरस्कार देवून तुझ्या निर्मितीक्षमतेवर राजमान्यतेची मोहोर उठवली होती. याशिवाय इस्माईल मर्चन्टच्या मुहाफिज मधील अभिनयाबद्दल तुला स्पेशल ज्युरी ॲवॉर्ड प्रदान करुन तुझ्यातील अभिनेत्याला सलाम केला होता. फिल्मफेअरने सर्वप्रथम १९७९ मध्ये दिवार मधील कामाबद्दल बेस्ट सपोर्टिंग ॲक्टर म्हणून तुझा गौरव केला होता. त्यानंतर जुनून, कलयुगच्या तुझ्या निर्मितीवर सर्वोत्कृष्ट चित्रपटांचा शिक्का राष्ट्रीय पुरस्काराच्या निमित्ताने उठवून तुझ्या निर्मितीमधील वेगळेपणाची दखल घेतली. याशिवाय फिल्मफेअर पुणे व मुंबईचे फिल्म फेस्टिव्हल, बेंगाल फिल्म जर्नलिस्ट असोशियनसारख्या मातब्बर संस्थांनी तुला जीवनगौरव पुरस्काराने सन्मानीत करून तुझ्या कर्तृत्वाला त्रिवार सलाम केला आहे.

जवळपास तू केलेल्या अंदाजे पावणेदोनशे चित्रपटांपैकी ६१ चित्रपटात तू नायक होतास तर ५५ चित्रपट बहुतारांकित (मल्टी स्टारर) होते आणि २१ चित्रपटात सह-नायक तर ७ चित्रपटात तू आम्हाला पाहुणा कलाकार म्हणून दर्शन दिलेस. याशिवाय साठच्या दशकात आणि नव्वदच्या दशकात तू विदेशी चित्रपटात जी अभिनेता म्हणून कामगिरी केली ती वेगळीच. तू अंदाजे १६१ चित्रपटात काम केलेस ज्यापैकी १४८ भारतीय चित्रपट वजा जाता बाकीचे सर्व विदेशीच होते. अन तेही सुरवातीच्या तुझ्या संघर्षाव्या उमेदवारीच्या काळातल्यापासून. तुझ्या कारकिर्दीची सुरवात आणि शेवट विदेशी चित्रपटापासून झाली असं म्हटल तर वावगं ठरु नये कारण १९८८ ते १९९८ अखेर ‘डिसिव्हर’ तर १९९४ मध्ये ‘मुहाफिज’, अन मर्चन्ट आयव्हरीच्या १९९८ च्या ‘साईडस्ट्रीट’ मध्ये कारकिर्दीच्या अखेरीस काम केले होते पृथ्वी थिएटर्स ला जिवंत व क्रीयाशील ठेवण्याचा वसा अखेरपर्यन्त कायम जपून एकप्रकारे तू पुत्र सांगतो चरित पित्याचे याची सगळयांना प्रचितीच दिली आहेस. तुझा हा वारसा आज तुझ्या मुली निष्ठेने पुढे चालवत आहेत.

Shashi Kapoor
Shashi Kapoor

१९७८ च्या जुनून पासून तू अधिकृतरित्या निर्माता झालास ३६ चौरंगी लेन, कलयुग, विजेता, जुनुन, उत्सव, अजूबा सारखे ऑफबिट चित्रपट देऊन तू समिक्षक व रसिकांना आपली असली पहेचान दिलीस उत्तम जाणकारी असणारे क्लासिक सिनेमा काढणारा निर्माता. १९९१ च्या अजूबा या तुझ्याच फिल्लमवाला प्रॉडक्शनच्या चित्रपटाचे दिग्दर्शन करुन तु या चित्रपटात पूर्ण वेळ पूर्ण तयारीनिशी दिग्दर्शक म्हणून उतरलास तरी तो तुझा पहिला आणि अखेरचा प्रयत्न ठरला. याच अजूबा नामक फॅन्टेसीच्या दारुण प्रचंड आर्थिक अपयशाने तुझे मनोधैर्य खच्ची केले. सत्तरऐंशीच्या दशकातील सर्वाधिक बिझी म्हणून खुदद स्व. राजकपूरने ज्याची टॅक्सीशी तुलना केली होती असा हा अवखळ, चंचल चपळ अन सदासर्वकाळ उत्साहाने ओतप्रोत सळसळणारा चैतन्याचा झरा वाटणारा शशीकपूर स्वतःच विस्मृतीच्या अबोध गर्तेत लोटला गेला होता  हे आम्हा रसिक चाहत्यांना बघवत नव्हते रे. सत्तरच्या दशकात बॉक्सऑफिसला जे हवे तेच देणारा व प्रेक्षकांना आपल्या सहजसुंदर अभिनयाने खुलवणारा नायक, दुर्धर आजाराने स्वतःच जाणिवनेणिवेच्या, स्मृति-विस्मृतीच्या अबोध हिंदोळयावर आपले अखेरचे दिवस मोजतांना पाहून आम्हा रसिकांना पाहवले गेले नव्हते.

आणि म्हणूनच आज म्हणावेसे वाटते….

लिखे जो खत तुझे, वो तेरी यादमे हजारो रंगके नजारे बन गये,
सबेरा जब हुवा तो फूल बन गये जो रात आयी तो सितारे बन गये…

तुझ्या रम्य आठवणीतच रमणा-या तुझ्या लाखो चाहत्यांच्या वतीने

दिलीप कुकडे


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.