Home » ‘या’ आईस्क्रीमच्या किंमतीत चारचाकी येईल…

‘या’ आईस्क्रीमच्या किंमतीत चारचाकी येईल…

by Team Gajawaja
0 comment
High Price Icecream
Share

आईस्क्रीम उन्हाळा असो की पावसाळा आईस्क्रीमचं नाव घेतलं की, सर्वांचेच चेहरे खुलतात. त्यात बच्चे कंपनी तर खास खुश होते.  उन्हाळ्यात तर या आईस्क्रीमच्या सर्व फ्लेवरची चव घेतली जाते. कुल्फी, पेप्सीकोलासारखे पदार्थही चाखले जातात. लग्नाच्या पंगतीही आईस्क्रीमशिवाय पूर्ण होत नाहीत. आईस्क्रीमचे अनेक प्रकार आहेत. तशाच त्याच्या किंमतीही कमी जास्त आहेत. अगदी पाच रुपयांपासून ते पाच हजारापर्यत आईस्क्रीम उपलब्ध आहे. काही ठिकाणी या आईस्क्रीमला सोन्या चांदीचा मुलामा लावूनही देण्यात येतो. अशा आईस्क्रीमच्या किंमती या सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत. पण याशिवाय अनेक आईस्क्रीम बाजारात उपलब्ध आहेत. शिवाय घरीही छान आईस्क्रीम तयार करण्यात येतं. त्यामुळे उन्हाळा या आईस्क्रीमच्या संगतीनं गारेगार होतो. पण जर एका अशा आईस्क्रीमच्या किंमतीबाबत सांगितलं तर तुमचे डोळे पांढरे होतील. कारण या आईस्क्रीमची किंमती काही लाखात आहे. या किंमतीमध्ये लाखो लोकांना आईस्क्रीम खाता येतील. अगदी एखादी मोठी चारचाकीही या एका आईस्क्रीमच्या किंमतीमध्ये येऊ शकणार आहे. हे अत्यंत महागडं आईस्क्रीम (High Price Icecream) जपानमध्ये तयार झालं असून आतापर्यतच सर्वात महागडं आईस्क्रीम म्हणून त्याची नोंद केली गेली आहे.   

ऑडिटी सेंट्रल न्यूज वेबसाइटच्या अहवालानुसार जगात एका अत्यंत किंमती अशा आईस्क्रीमची निर्मिती करण्यात आली आहे. या नवीन आईस्क्रीमने जगातील सर्वात महागडे आईस्क्रीम (High Price Icecream) बनण्याचा विक्रम केला आहे. जपानची आईस्क्रीम बनवणारी कंपनी सिलाटोने,  बायकुया नावाचे आईस्क्रीम बाजारात आणले आहे. हे एक नवीन प्रोटीन रिच आईस्क्रीम आहे. जगातील सर्वाधिक महागड्या आईस्क्रीमची मान त्यानं पटकावला आहे. या आईस्क्रीममध्ये दुधाच्यावर येणा-या फेसाळत्या मलईचा वापर करण्यात आला आहे. याशिवाय दोन प्रकारचे चीज, अंड्यातील पिवळे बलक, परमिगियानो चीज, व्हाईट ट्रफल, ट्रफल ऑइल अशा अनेक गोष्टी या आईस्क्रीममध्ये वापरण्यात आल्या आहेत.  अर्थातच हे आईस्क्रीम अत्यंत किंमती आहे आणि त्यामुळेच ते देण्यासाठीही विशेष पॅकींग बनवण्यात आली आहे. हे आईस्क्रीम स्टायलिश ब्लॅक बॉक्समध्ये येते. विशेष म्हणजे, त्याच्यासोबत क्योटोमधील कारागिरांनी मंदिरे बनवण्यासाठी वापरल्या जाणार्‍या तंत्राचा वापर करून हाताने बनवलेला धातूचा चमचाही देण्यात येतो.  या चमच्याची किंमतही काही लाखात असून ती किंमत आईस्क्रीमच्या किंमतीमध्ये समाविष्ट केलेली नाही.  

आईस्क्रीम कंपनीच्या वेबसाइटवर या आईस्क्रीमबाबत सर्व माहिती उपलब्ध आहे. आईस्क्रीमची किंमत 6700 डॉलर्स पेक्षा जास्त म्हणजे 5 लाख रुपयांपेक्षाही जास्त आहे. आईस्क्रीमसोबत येणारा चमचाही आईस्क्रीम इतकाच महाग आहे. ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’ने या चमच्याचा हिशेब न करता आईस्क्रीमची ही किंमत दिली आहे,  हे लक्षात घेतले पाहिजे. हे आईस्क्रीम नुसते खाण्यापेक्षा पांढर्‍या वाइनसोबत त्याची चव चाखवी असे या आईस्क्रीम बनवणा-या कंपनीनं सुचवलं आहे. अर्थात एवढ्या किंमतीचे आईस्क्रीम जो घेईल, त्याला त्याच्या किंमतीचे अप्रूप नसणार.  पण सर्वसामान्य या आईस्क्रीमचा फक्त फोटो बघून त्याच्या चवीचे समाधान मानणार आहेत. (High Price Icecream)  

========

हे देखील वाचा : पहिले पाऊल टाकत भारताची ट्रेन डिप्लोमसी चालू…

========

आतापर्यत काही कंपन्यांनी हजारो रुपये किंमतीची आईस्क्रीम (High Price Icecream) बनवली आहेत.आईस्क्रीमच्या या कंपन्या या क्षेत्रातील मान्यवर कंपन्या आहेत.  या ब्रँडना नवीन नवीन मागणीनुसार सातत्याने चांगली उत्पादने ग्राहकांना पुरवून आणि बाजारपेठ विकसित केली आहे. यातूनच त्या ब्रॅंडी जागतिक क्रमवारी नक्की केली आहे. सध्या आईस्क्रीमच्या बाबतीत बेन अँड जेरी हा जगातील प्रसिद्ध फ्लेवर्ड आईस्क्रीम ब्रँडपैकी एक आहे.  ही कंपनी बेन कोहेन आणि जेरी ग्रीनफिल्ड या दोन मित्रांनी 1978 मध्ये बर्लिंग्टन, येथे सुरू केली. 22 वर्षानंतर त्यांनी त्यांची कंपनी युनिलिव्हर ग्रुपला विकली. सध्या, जगभरातील 38 देशांमध्ये बेन अँड जेरीची  577 भव्य आईस्क्रीम पार्लर आहेत. जाणकारांच्या मते  बेन आणि जेरीने दरवर्षी $280 दशलक्ष कमाई करीत आहे. याशिवाय सर्वसामान्यांना माहित असलेला आईस्क्रीमचा ब्रॅंड म्हणजे, बास्किन रॉबिन्स. ही सर्वात मोठी आईस्क्रीम कंपनी आहे. जगभरातील सुमारे 50 देशांमध्ये 7500 आईस्क्रीम पार्लर आहेत.  या जागतिक कंपनीची स्थापना 1946 मध्ये झाली. सध्या, बास्किन रॉबिन्सचे हजाराहून अधिक फ्लेवर्स असल्याची माहिती आहे. अर्थात या जागतिक दर्जाच्या आईस्क्रीम कंपन्यांवर मात देत जपानच्या सिलाटोने बनवलेले बायकुया नावाचे आईस्क्रीम सध्या चर्चेचा विषय ठरले आहे.  

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.