आज दोन ऑगस्ट. आजच्या दिवशी एका महत्त्वाच्या व्यक्तीची पुण्यतिथी आहे. आज आपण ज्या शास्त्रज्ञाच्या कृपेमुळे, जगाच्या पाठीवर कुठेही असलो तरी एकमेकांना फोन करून एकमेकांशी बोलू शकतो त्या ‘अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल (Alexander Graham Bell)’ यांची पुण्यतिथी आहे.
अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल (Alexander Graham Bell) स्कॉटिश वैज्ञानिक होते. वैज्ञानिक तर होतेच शिवाय इंजिनियर सुद्धा होते. अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल यांनी, आज आपण प्रत्येकजण जे संवाद साधण्याचं, संपर्क करण्याचं साधन वापरतो, त्या ऐतहासिक टेलिफोनचा शोध लावला.
अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल या वैज्ञानिकाचा जन्म ३ मार्च १८४७ साली झाला. अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल यांनी फक्त टेलिफोनचा नाही, तर ग्रामोफोन आणि बऱ्याच इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंचाही शोध लावला होता. पण आपण सगळे खास करून त्यांना ओळखतो ते त्यांनी लावलेल्या टेलिफोनच्या शोधामुळेच.
आता टेलिफोनचा शोध अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल (Alexander Graham Bell) यांनी लावला, हे तर आपल्याला माहीतच आहे. ज्यांना माहीत नव्हतं त्यांना आत्ता कळलंच असेल. पण मग प्रश्न असा पडतो की, फोन लावल्यावर हॅलो म्हणण्याची प्रथा सुद्धा अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल यांनीच सुरू केली का? तर नाही.
मध्यंतरी अशा अनेक अफवा उठल्या होत्या की, अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल यांच्या प्रेयसीचं नाव ‘मार्गरेट हॅलो’ असल्यामुळे अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल तिला फोन लावायचे आणि तिचं नाव फोनवर अनेकदा घेतलं जायचं, म्हणून तेव्हापासूनच फोनवर हॅलो म्हणण्याची प्रथा सुरू झाली. पण मगाशी म्हटलं त्याप्रमाणे ही फक्त एक अफवा होती.(Alexander Graham Bell)
मुळात अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल यांच्या प्रेयसीचं नाव मार्गरेट हॅलो नाही, तर ‘मॅबेल हुबार्ड’ असं होतं. त्यामुळे तिच्या नावावरून रचल्या जाणाऱ्या दंतकथा सपशेल चुकीच्या ठरतात. पण मग टेलिफोनवर ‘हॅलो’ म्हणायला नेमकी सुरवात कोणी केली, तर याचं उत्तर आपल्याला सापडतं डिक्शनरीमध्ये.
====
हे देखील वाचा – ‘मिसाइल मॅन’ला अनोखा सलाम, डॉ. कलाम यांच्या जीवनावर संस्कृत भाषेत महाकाव्य
====
ऑक्सफोर्ड डिक्शनरीमध्ये असं लिहिलं आहे की, फोनवर बोलायला सुरवात करताना ‘हॅलो’ म्हणण्याची प्रथा ज्यांनी लाइट बल्बचा शोध लावला त्यांनी सुरू केली आणि लाइट बल्बचा शोध लावणाऱ्या या थोर शास्त्रज्ञाचं नाव म्हणजे ‘थॉमस एडिसन (Thomas Edison)’.
अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल यांनी जेव्हा टेलिफोनची निर्मिती केली तेव्हा त्यांनी असं म्हटलं होतं की, फोन उचल्यावर सगळे ‘ahoy hoy’ असं म्हणतील, हाच शब्द उच्चारतील. पण काही वर्षांनंतर थॉमस एडिसन यांनी पहिल्यांदा ‘हॅलो’ हा शब्द दुनियेला दिला.
फोन केल्यानंतर संभाषणाची सुरवात ‘हॅलो’ या शब्दापासूनच होईल असा आग्रह थॉमस एडिसन यांचा होता, तर अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल यांचं म्हणणं होतं की, फोन सुरू करताना ‘ahoy hoy’ असंच म्हटलं जाईल. त्याकाळी फोनवर संभाषण सुरू करताना काहीजण अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल यांनी दिलेला ‘ahoy hoy’ शब्द वापरायचे, तर काही थॉमस एडिसन यांनी दिलेला ‘हॅलो’ हा शब्द वापरत असत. शेवटी मात्र वापरायला सोपा आणि लक्षात राहील असा ‘हॅलो’ हा शब्द लोकानी निवडला आणि मग हा शब्द जगभर प्रसिद्ध झाला.
‘हॅलो’ हा शब्द जसजसा प्रचलित होत गेला, तस तसा अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल यांनी दिलेला ‘ahoy hoy’ हा शब्द मागे पडू लागला आणि मग कोणीच तो शब्द फार वापरण्याच्या फंदात कधी पडलं नाही कारण लोकांना हॅलो सारखा छोटा, ठसठशीत आणि लक्षात राहील असा शब्द मिळाला होता.
अर्थात आता ‘हॅलो’ हा शब्द आपल्याला जरी थॉमस एडिसन या वैज्ञानिकाने दिला असला, तरी हॅलो शब्द उच्चारायची संधी मात्र आपल्याला अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल यांनीच दिली हे नाकारून चालत नाही.(Alexander Graham Bell)